दृष्टिकोन: कोरोनाचा मुकाबला आणि महाराष्ट्राची मानसिकता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 05:29 AM2020-03-13T05:29:57+5:302020-03-13T05:30:36+5:30
आता अधिकाऱ्यांनी कारणे न देता, वेळप्रसंगी रजा रद्द करून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले पाहिजे.
अतुल कुलकर्णी
वरिष्ठ सहायक संपादक
महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केला आहे. ११ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. ४० रुग्ण वेगळे ठेवले आहेत. काळजी घेण्यासाठी ज्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यात खोकणाऱ्यांपासून किमान ३ फूट अंतर ठेवा, असे सांगितले जात आहे. मात्र मुंबईत दररोज लोकल ट्रेनमध्ये ६० लाखांहून अधिक लोक दाटीवाटीने प्रवास करतात, तेथे दोन व्यक्तींमध्ये तीन फुटांचे अंतर कसे राखणार? अशा कारणांची यादी खूप मोठी होईल. पण या आपत्तीकडे इष्टापत्ती म्हणून पाहिले तर राज्याला साथीच्या आजारापासून कोसो दूर नेता येईल. ते दाखवण्याची हीच ती वेळ. आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांची कामे करणे सुरू केले आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २० तारखेपर्यंत चालवण्याचा आग्रह धरला जात होता. ज्यांचा अधिवेशनाशी काडीचाही संबंध नाही असे अधिकारी अधिवेशन चालू आहे, नंतर या, असे म्हणत छोट्या छोट्या शहरांतील लोकांची बोळवण करतात, तर ज्यांचा या कामकाजाशी संबंध आहे असे अनेक अधिकारी प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, चर्चा यानिमित्ताने आपले कामधाम सोडून याच कामात गुंतून जातात. अशी जागतिक आपत्ती घोषित झाल्यावर अधिवेशन शनिवारपर्यंत संपवण्याचा निर्णय घेतला गेला हे योग्यच झाले आहे. वास्तविक ते शुक्रवारीही संपवता आले असते. असो.
आता अधिकाऱ्यांनी कारणे न देता, वेळप्रसंगी रजा रद्द करून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले पाहिजे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गावांचे सरपंच या सगळ्यांनी आता कंबर कसून गावोगावी, गल्लोगल्ली स्वच्छता मोहीम हाती घेतली पाहिजे. कचरा हटविण्याची मोहीम गतिमान केली पाहिजे. वॉर्डावॉर्डात, गावागावांत स्पर्धा निर्माण करून कचरा हटवला पाहिजे. असंख्य रोगांचे मूळ ज्या कचºयात आहे तोच नष्ट करण्याची मोठी राज्यव्यापी मोहीम हाती घेण्याची हीच वेळ आहे.
आपल्याकडची लोकसंख्या, गावोगावी पसरलेले कचºयाचे ढिगारे, सार्वजनिक आरोग्याविषयीची कमालीची अनास्था, वाट्टेल तेथे पान खाऊन पिचकाºया मारणाºयांपासून ते उघड्यावर प्रातर्विधी करण्यापर्यंत कसलीही भीडभाड न ठेवणारी जनता आपल्या चोहोबाजूस आहे. आपण परदेशात गेल्यावर कागदाचे बोळे किंवा कचरा खिशात, जवळच्या पिशवीत ठेवण्याचे सौजन्य दाखवतो, आपल्या देशात आल्यावर मात्र ते सौजन्य कुठे जाते? पुणे-मुंबई महामार्गावरील सुलभ शौचालयांमध्ये नजर टाकली तर तेथील वॉशबेसिनवर फक्त आंघोळ करणेच बाकी ठेवले जाते, एवढ्या वाईट पद्धतीने आपण या गोष्टी वापरतो. ‘मला काय त्याचे’ ही बेफिकिरी ठिकठिकाणी जाणवत राहते. अशा वेळी जर का कोरोनाने राज्यात हातपाय पसरले आणि त्यातून अन्य साथीचे रोग वाढीस लागले तर लोक स्वत:च्या नातेवाइकांपासूनच दूर जाऊ लागल्यास आश्चर्य नाही.
आपण प्लेग, स्वाइन फ्लू यांसारख्या साथींचे दुष्परिणाम पाहिलेले आहेत. हा रोग तर या सगळ्यापेक्षा जास्त भयंकर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने त्यास ‘जागतिक महामारी’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे यानिमित्ताने चला; आपले घर, आपला परिसर स्वच्छ करू, अशी भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे. सुदैवाने सध्या उन्हाळा सुरू होणार आहे. मे महिन्यापर्यंत असे विषाणू फार टिकाव धरत नाहीत, असे सांगितले जाते. मात्र नंतरही आपण असेच वागत राहिलो तर येणारा पावसाळा, हिवाळा साथीच्या रोगांसाठी खुले आमंत्रण ठरेल. आपत्तीवर मात करण्याची ही संधी आहे. ती घ्यायची की, नाही याचा निर्णय प्रत्येकाने स्वत: घ्यायचा आहे.
जाता जाता : महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मंत्रालय असो की अधिवेशन. गर्दी हटण्याचे नाव घेत नाही. प्रत्येक मंत्र्याच्या दालनापुढे तोबा गर्दी आहे. या गर्दीवर वेळीच नियंत्रण आणण्याची गरज आहे. आमदारांनी, मंत्र्यांनी मतदारसंघातील लोकांना जर मतदारसंघातच भेटायचे ठरवले तर गर्दीवर सहज नियंत्रण येऊ शकेल. पण त्यासाठी मंत्र्यांना मोह टाळावे लागतील आणि आमदारांना स्वत:सोबतची गर्दी कमी करावी लागेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पास देऊ नका, जर दिले तर त्या अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करू, असे स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगूनही गुरुवारी विधानभवनात गर्दी होतीच. या लोकांना कोण पास देतो, हे लोक कसे आत येतात आणि ते कोठून येतात, दिसेल त्या मंत्र्यांसोबत, नेत्यांसोबत फोटो कसे काढून घेऊ शकतात? या गोष्टी विधिमंडळाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाºया आहेत.