दृष्टिकोन: या संसर्गावर जालीम उपाय शोधला पाहिजे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 12:46 AM2020-07-02T00:46:24+5:302020-07-02T00:46:53+5:30

कोणत्याही साथरोगापेक्षा अफवांची साथ भयंकर असते आणि त्यास बळी पडणारेही अधिक असतात. कॉलराच्या बाबतीतही तो अनुभव आला होता.

Approach: A cure must be found for this infection! | दृष्टिकोन: या संसर्गावर जालीम उपाय शोधला पाहिजे!

दृष्टिकोन: या संसर्गावर जालीम उपाय शोधला पाहिजे!

Next

नंदकिशोर पाटील

वर्ष : १८९७, स्थळ : पुणे
पुण्यात प्लेगची साथ पसरलेली. संपूर्ण शहराला या संसर्गजन्य आजाराचा वेढा पडलेला. माणसं पटापट मरू लागल्यामुळं ब्रिटिश अधिकारी रँडने संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू करून घरोघर झडतीची मोहीम उघडलेली. पण, प्लेगविषयीची अंधश्रद्धा आणि पाश्चात्य वैद्यकीय उपचारांबद्दलच्या अज्ञानापोटी आजारी लोक रुग्णांच्या छावणीतून पळून जाऊ लागले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने लोकांची आरोग्य तपासणी सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यातूनच मग पुढे रँडचा खून... या घटना घडल्या. पण, अशाही परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. समाजमनावर अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्यासाठी त्यांनी जनजागृती केलीच, शिवाय आपल्या डॉक्टर मुलास सोबत घेऊन रुग्णांवर औषधोपचारही केले. रुग्णसेवेसाठी स्वखर्चाने सासणे माळावर रुग्णालय उभारले. हजारो रुग्णांना प्लेगमुक्तकरण्यासाठी या माय-लेकरांनी जिवाचे रान केले. या धावपळीत सावित्रीबार्इंना प्लेगने गाठले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

वर्ष : १८९७, स्थळ : कोल्हापूर
अवघ्या २२-२३ वर्षे वयाच्या राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभार हाती घेऊन उणीपुरी तीन वर्षेही झाली नसतील. प्लेगने करवीर परिसरातही हातपाय पसरले. पटकीच्या साथीने माणसं भयभीत झाली. राज्यकारभार हाकण्याचा कसलाही पूर्वानुभव नसलेल्या महाराजांनी या संसर्गजन्य आजारास अटकाव करण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला. त्यानुसार गावोगावी मदत केंद्रे सुरू केली. दवाखाने उभारले. कोल्हापूरच्या वेशीवर तपासणी नाके उभारून गावात येणाºया प्रत्येक माणसांची तपासणी सुरू केली. या रोगाविषयी लोकांच्या मनात असलेली भीती व अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्यासाठी त्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. गावोगावी चावडीवर त्याचे जाहीर वाचन करवून घेतले. कोल्हापूर संस्थानचे दिवाण रघुनाथराव व्यंकोजी सबनीस यांची प्लेग कमिशनर म्हणून नेमणूक केली. प्लेगवर कोणतंही औषध उपलब्ध नव्हतं आणि प्रतिबंधात्मक लसीचाही शोध लागायचा होता. होमिओपॅथीमध्ये प्लेगवर उपचार असल्याची माहिती कळताच शाहूंनी सार्वजनिक दवाखाना काढला. संसर्ग झालेल्यांंसाठी विलगीकरण कक्ष उभारले. गाव सोडण्यास प्रतिबंध लागू केले. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज जगभरातील सरकारं जे उपाय योजत आहेत, छत्रपती शाहू महाराजांनी ते शंभर वर्षांपूर्वी केले होते!

वर्ष : १८८७, स्थळ : जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरातील कामगारांच्या एका वस्तीत प्लेगचा शिरकाव झाला. याच वस्तीत भारतीय कामगार मोठ्या संख्येने राहात होते. प्लेगने काही कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच बॅरिस्टर मोहन करमचंद गांधी तिथे पोहोचले. गांधीजी आल्याचे कळताच भारतीय कामगारांनी त्यांच्याभोवती वेढा घातला. गांधीजींना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. कसलाही वेळ न दवडता त्यांनी बाजूच्याच एका वस्तीत मित्रांच्या मदतीनं शंभर बेडचं हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला. दानशूरांकडून मदत गोळा केली. शहरातील डॉक्टर्स आणि परिसरातील लोकांना सोबत घेऊन त्यांनी रुग्णालय सुरू केलं आणि एका आठवड्यात कामगारांची वस्ती प्लेगमुक्त करण्यात यश मिळविलं. त्यावेळी गांधीजींना अशा कार्याचा ना पूर्वानुभव होता ना ते महात्मा बनलेले होते.

वर्ष : १८९८, स्थळ : कोलकाता
कोलकात्यातही (तेव्हाचा कलकत्ता) प्लेगची साथ पसरलेली. इतर शहारांच्या तुलनेत कोलकात्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयांची संख्या अधिक असली तरी वैद्यकीय उपचारांबाबत लोकांच्या मनात असलेली अनामिक भीती आणि औषधोपचारांच्या माध्यमातून ‘ख्रिस्तीकरण’ केले जात असल्याच्या अफवेने लोक दवाखान्यात जाणं टाळत होते. ही बातमी कळताच स्वामी विवेकानंद कोलकात्यात दाखल झाले. लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी त्यांनी एक जाहीरनामा काढला. प्लेगपासून स्वत:चा बचाव कसा करायचा, याची शास्त्रशुद्ध माहिती दिली. स्वच्छतेचे धडे दिले.

वरील घटनांचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की, कोणत्याही साथरोगापेक्षा अफवांची साथ भयंकर असते आणि त्यास बळी पडणारेही अधिक असतात. कॉलराच्या बाबतीतही तो अनुभव आला होता. कॉलराच्या लसीने लोक मरतात, अशी अफवा देशभर पसरल्यानंतर वाल्द्मर हाफकीन या सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञास स्वत:वर ती लस टोचून घ्यावी लागली. सध्या कोरोनाविषयी अशाच अफवांचे पीक जोमात आहे. त्यातून कोरोनाग्रस्त आणि कुटुंबीयांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळतेय. कोरोनामुक्त झालेल्यांना वाळीत टाकण्याचे प्रकार घडत असतील तर हा संसर्ग रोखण्यासाठी जालीम उपायच योजले पाहिजेत.

(लेखक लोकमतचे कार्यकारी संपादक आहेत)

Web Title: Approach: A cure must be found for this infection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.