दृष्टिकोन: चिमुकल्यांचा आश्वासक ‘वन्स मोअर’ दुर्लक्षू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 04:33 AM2020-01-16T04:33:11+5:302020-01-16T04:33:34+5:30

वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शन्सने मुलांचा बदलता कल लक्षात घेऊन अनेक परीकथा अ‍ॅनिमेटेड किंवा प्रत्यक्ष चित्रीकरणाद्वारे पडद्यावर साकार केल्या.

Approach: Don't miss the promising 'Once More' of lizards | दृष्टिकोन: चिमुकल्यांचा आश्वासक ‘वन्स मोअर’ दुर्लक्षू नका

दृष्टिकोन: चिमुकल्यांचा आश्वासक ‘वन्स मोअर’ दुर्लक्षू नका

Next

संदीप प्रधान

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे जुने समीकरण आहे. त्यामुळे ९३व्या संमेलनातही अध्यक्षांच्या निवडीपासून ठरावांच्या विषयांपर्यंत वादविवाद झडलेच. मात्र, या वादविवादांच्या वावटळीत एक गोष्ट दुर्लक्षित राहिली आणि ती म्हणजे बालकुमार मेळाव्यात बालकविता, गोष्टी यांना लहानग्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद. मोठ्यांच्या वादांचा लवलेश त्या मेळाव्याला नव्हता. अनेक कवितांना छोट्यांनी ‘वन्स मोअर’ दिला आणि कवींनी ही आग्रहाची मागणी अव्हेरली नाही.

आपल्याकडे बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते व त्याचे व्यासपीठ हे बालसाहित्याच्या चर्चेकरिता उपलब्ध असते. मात्र, अखिल भारतीय संमेलनातही एक कोपरा बालसाहित्यिक व बालरसिक यांना लाभला, हे स्वागतार्ह आहे. बालसाहित्याचा विचार केला तर सानेगुरुजी किंवा विंदा करंदीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांचा उल्लेख टाळणे अशक्यच आहे. आजही बालसाहित्याचा विचार करायचा तर राजीव तांबे, माधुरी पुरंदरे, दिलीप प्रभावळकर, विजया वाड, अनंत भावे, एकनाथ आव्हाड यांच्याच साहित्यकृती बालगोपाळांमध्ये लोकप्रिय आहेत. मुळात बालसाहित्य लिहिणे, हे प्रचंड आव्हानात्मक आहे. बालकांच्या मनोव्यापाराचा विचार करून त्यांना भावेल, रुचेल, आवडेल असे लिहिणे हे वाटते तितके सोपे नाही. मुलांकरिता पुस्तके प्रसिद्ध करायची तर ती रंगीबेरंगी चित्रांनी नटलेली, आकर्षक असायला हवी. छपाईचा खर्च आणि पुस्तकांचा खप हे गणित जुळणे गेल्या काही वर्षांत अवघड झाल्याने मोठ्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीवरच सावट असताना लहानग्यांची गुळगुळीत कागदावरील, रंगीत पुस्तके छापणे टाळण्याकडे कल वाढला आहे.

श्यामची आई यांसारखे पुस्तकही एकेकाळी शाळाशाळांमध्ये हेतुत: खपवल्याने खपाचे व लोकप्रियतेचे विक्रम करू शकले. नाटकांची पुस्तके नाटकांचे प्रयोग होतात तेथे किंवा लहान मुलांची पुस्तके शाळाशाळांमध्ये खपवण्याकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. बऱ्याचदा प्रकाशक पुस्तके छापतात, मात्र त्याच्या खपाकरिता प्रयत्न करीत नाहीत. त्याचा फटका लेखकांना व चांगल्या पुस्तकांना बसतो. बालसाहित्याबाबत हेच दुखणे आहे.

गेल्या काही वर्षांत बहुतांश मुले ही टीव्ही, मोबाइल, गेम्स या विश्वात रमलेली दिसतात. अनेकदा मुलांच्या प्रश्नांची सरबत्ती नको किंवा त्यांनी मस्ती करू नये, याकरिता पालकही त्यांच्या हातात मोबाइल देतात किंवा कार्टून्स लावून देतात. त्यामुळे मुलांनी पुस्तके वाचावीत, ही मुळात पालकांचीच मानसिकता नसेल, तर मुलांच्या हाती पुस्तके कशी दिसणार? अनेक उच्चमध्यमवर्गीय मराठी घरांमध्ये मुलांना मराठी बोललेले समजते. मात्र, ती इंग्रजी शाळांमध्ये शिकत असल्याने त्यांना मराठी वाचता येत नाही. किंबहुना, एकेकाळी गणित हा विषय अनेक मुलांचा शत्रू नंबर एक असायचा, तर आता या मराठी मुलांना मराठी हा शत्रू नंबर एक वाटू लागला आहे. त्यामुळे जर अशी परिस्थिती असेल, तर बालसाहित्य कुणी व कुणाकरिता प्रसिद्ध करायचे, असा प्रश्न निर्माण होतो.

शहरात अशी परिस्थिती असली, तरी उस्मानाबादमध्ये बालकुमार मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद आश्वासक आहे. त्यामुळे राज्याच्या अन्य काही भागांत मराठी बालसाहित्याची भूक असलेला एक वर्ग निश्चित आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी ‘वंचितांचा रंगमंच’ ही कल्पना यशस्वीरीत्या राबवली व सध्या वेगवेगळ्या नाटकांचे शेकडो प्रयोग होत आहेत. ज्या मुलांना नाटक म्हणजे काय? ते सादर करण्याकरिता नाट्यगृहे असतात, याची गंधवार्ता नव्हती, अशा मुलांना नाट्य चळवळीशी जोडण्याचे काम या उपक्रमाने केले आहे. वंचित घटकांमधील मुलांना साहित्य, नाट्यविषयक आवड आहे. परंतु, पोटाची भ्रांत त्यांना त्याकडे वळण्यास मज्जाव करते. ज्या वर्गाकडे पोटाची भ्रांत नाही, त्या वर्गाची बालसाहित्याची आवड शुष्क झाली आहे, असा पेच निर्माण झाला आहे. तरीही, वंचितांच्या रंगमंचावरील नाटकांची पुस्तके अलीकडेच प्रकाशित झाली असून त्याला उदंड प्रतिसाद लाभत आहे.

वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शन्सने मुलांचा बदलता कल लक्षात घेऊन अनेक परीकथा अ‍ॅनिमेटेड किंवा प्रत्यक्ष चित्रीकरणाद्वारे पडद्यावर साकार केल्या. मुलांच्या अभिरुचीमधील बदल लक्षात घेऊन बालसाहित्य हे अशा पद्धतीने छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर आणण्याकरिता मातब्बर लेखक, निर्माते यांनी प्रयत्न करायला हवे. तरच, बालगोपाळांना काही दिल्याचा आनंद आपल्याला लाभेल.

(लेखक लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

Web Title: Approach: Don't miss the promising 'Once More' of lizards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.