दृष्टीकोन - त्यांच्याविषयी कृतज्ञ असायला हवं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 03:19 AM2020-04-13T03:19:29+5:302020-04-13T03:20:07+5:30

सध्या कोरोनाच्या जगभर आलेल्या साथीमुळं एकाच बाबतीत का असेना, पण भारताचा भाव वधारला आहे. एरवी विशिष्ट प्रकारचा संधिवात, मलेरिया व एक प्रकारच्या

Approach - We should be grateful to them! | दृष्टीकोन - त्यांच्याविषयी कृतज्ञ असायला हवं!

दृष्टीकोन - त्यांच्याविषयी कृतज्ञ असायला हवं!

Next

 

उदय कुलकर्णी

सध्या कोरोनाच्या जगभर आलेल्या साथीमुळं एकाच बाबतीत का असेना, पण भारताचा भाव वधारला आहे. एरवी विशिष्ट प्रकारचा संधिवात, मलेरिया व एक प्रकारच्या चर्मरोगासाठी उपयुक्त म्हणून विशिष्ट प्रमाणात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन नावाच्या औषधाची निर्मिती भारतात अधिक प्रमाणात होते. सध्या अमेरिकेला कोरोना नियंत्रणासाठी या औषधाचा उपयोग आहे असं जाणवल्यानं ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना या गोळ्यांच्या निर्यातीवरची बंदी उठवण्याचं साकडं घातलं. मोदी प्रसन्न झाले आणि त्यांनी पाच टन औषधसाठा अमेरिकेला रवाना केला. माध्यमांमधून ही सर्व चर्चा ऐकून सर्वसामान्य माणसाच्या मनातदेखील या औषधाविषयी कुतुहल निर्माण झालं, पण मुळात हे औषध भारतात निर्माण होण्यासाठी आवश्यक पाया घालणाºया प्रफुल्लचंद्र राय यांच्याविषयी कितीजणांना माहिती आहे? १८९६ च्या सुमारास आलेली प्लेगची साथ ही तशी गेल्या १००-१२५ वर्षांत भारतानं अनुभवलेली सांसर्गिक रोगाची एक मोठी साथ. ती आटोक्यात आणण्यासाठी रशियातून भारतात येऊन ज्यांनी प्रयत्न केले त्या डॉ. हाफकिन यांच्यासारख्या शास्त्रज्ञाविषयी तरी आपल्याला कुठं माहिती आहे?

खरं तर आज सांसर्गिक रोगांची साथ पसरलेली असताना तरी या दोघांची किमान माहिती प्रत्येक भारतीयानं घ्यायला हवी. आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांचा जन्म २ आॅगस्ट १८६१ चा. अतिशय साधी राहणी असणारा हा देशभक्त वैज्ञानिक! सध्या बांगलादेशात असणाºया जैसोर जिल्ह्यातील ररौली नावाच्या गावात एका जमीनदाराच्या घरी त्यांचा जन्म झाला. लंडनमध्ये १८८५ मध्ये प्रफुल्लचंद्र राय यांनी रसायनशास्त्रात आपलं पीएच.डी.साठीचं संशोधन पूर्ण केलं, तर १८८७ मध्ये तांबं आणि मॅग्नेशियम समूहाच्या संदर्भातील कॉन्ज्युगेटेड सल्फेटविषयक संशोधनासाठी एडिनबरो विद्यापीठानं त्यांना ‘डी.एससी.’ ही सन्मानाची पदवी दिली. त्यांना तेथील रसायनशास्त्रविषयक संस्थेचं उपाध्यक्षपदही बहाल केलं, पण सहा वर्षे लंडनमध्ये काढल्यावर प्रफुल्लचंद्र भारतात परतले. १८८९ साली त्यांना प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. ब्रिटिश सरकारनं त्यांना १९११ साली ‘नाइट’ म्हणून सन्मानित केलं. १९१६ मध्ये ते प्रेसिडेंसी कॉलेजमधून रसायनशास्त्र विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर १९१६ ते १९३६ या कालावधीत ते एमेरिटस् प्रोफेसर म्हणून कार्यरत राहिले. १९३३ मध्ये काशी हिंदू विश्वविद्यालयानेही त्यांना ‘डॉक्टर आॅफ सायन्स’ या पदवीने गौरविले.
एक दिवस काही आम्लांवर प्रयोग करत असताना केलेल्या निरीक्षणांमधून त्यांना काही पिवळे स्फटिक पाहायला मिळाले. ते एकाअर्थी क्षार होते आणि त्याचवेळी त्यामध्ये नायट्रेटचे गुणधर्म होते. यातून अमोनियम नायट्राइटच्या शोधाचं श्रेय प्रफुल्लचंद्र राय यांना मिळालं. राय यांनीच पहिल्यांदा भारतात स्वत: एक कारखाना सुरू करून औषध निर्माण करणं सुरू केलं. नंतर हाच कारखाना ‘बंगाल केमिकल्स आणि फार्मास्युटिकल वर्क्स’ या नावानं प्रसिद्धीला आला. जवळपास दोनशेहून अधिक शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत, तसेच दुर्मीळ भारतीय खनिजांची सूची त्यांनी बनवली. केवळ रसायनशास्त्रात त्यांनी काम केलं असंही नाही. ‘हिस्ट्री आॅफ हिंंदू केमिस्ट्री’ नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. स्वातंत्र्यलढ्यातही महत्त्वाचं योगदान देणाºया व आधुनिक भारतात औषधनिर्मितीचा कारखाना सुरू करून उद्योजकांना नवी दिशा दाखवणाºया राय यांना ‘आधुनिक भारतातील रसायन विज्ञानाचे जनक’ म्हणून आगळा मान आहे. १६ जून १९४४ मध्ये त्यांचं कोलकाता येथे निधन झालं. आधुनिक औषधनिर्मितीसाठी प्रफुल्लचंद्रांनी त्या काळात पहिलं पाऊल उचललं नसतं, तर भारताला आज हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचं उत्पादन करणारा देश म्हणून जे महत्त्व आलं आहे ते आलं असतं का?

डॉ. हाफकिन हे मूळचे रशियातले. डॉ. हाफकिन यांना जगभर ओळख मिळाली ती कॉलरा या आजारावरील लस बनविल्यामुळे. जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉश यांनी कॉलºयाच्या जंतूचा शोध लावला होता, पण लस बनविण्यात त्यांना पुरेसे यश मिळालेले नव्हते. डॉ. हाफकिन यांनी लस बनविली आणि ती स्वत:लाच टोचून घेत प्रयोग केले. त्यांची लस कॉलºयावर परिणामकारक ठरू शकते हे सिद्ध करण्यासाठी कॉलºयाची साथ वारंवार जिथं येते त्या देशात जायला हवं म्हणून ते भारतात आले. दरम्यान, १८९६-९७ मध्ये कॉलºयापाठोपाठ प्लेगची साथ आली. विशेषत: मुंबईत या साथीनं थैमान घातलं. या पार्श्वभूमीवर डॉ. हाफकिन यांनी १८९७च्या जानेवारी महिन्यात प्लेग नियंत्रणावरची लस निर्माण केली. डॉ. हाफकिन यांना प्रयोगशाळा उभारण्यासाठी सर सुलतान शहा म्हणजे तिसरे आगाखान या खोजा मुस्लिम गृहस्थांनी आपला बंगला रिकामा करून दिला होता. यातूनच डॉ. हाफकिन यांना भारतातील आपलं संशोधनकार्य पुढं नेता आलं. भारतात आणि जगातही सांसर्गिक रोग थैमान घालत असताना अशा शास्त्रज्ञांचं स्मरण आपण ठेवायला हवं आणि त्यांच्याविषयी कृतज्ञ असायला हवं.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत )

Web Title: Approach - We should be grateful to them!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.