दृष्टिकोन: हिब्रूला जमते ते मराठीला का जमू नये?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 04:58 AM2019-06-04T04:58:39+5:302019-06-04T04:58:47+5:30

जगभरातून इस्राईलमध्ये आलेला प्रत्येक ज्यू त्या त्या देशातील भाषा बोलात असायचा. ज्यू लोकांची भाषा एक, धर्मग्रंथही एकच, प्रार्थना पुस्तकेही सारखीच. मात्र, भाषा वेगवेगळी बोलली जायची.

Approach: Why should Marathi not get the as like Heibruu? | दृष्टिकोन: हिब्रूला जमते ते मराठीला का जमू नये?

दृष्टिकोन: हिब्रूला जमते ते मराठीला का जमू नये?

Next

नोहा मस्सील

इस्रायलला १९४८ साली इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर, जगभरातून ज्यू लोक इस्राईलमध्ये स्थायिक होऊ लागले. युरोपियन ज्यू, रशियन ज्यू अशा ७२ देशांमधून आलेल्या लोकांचा इस्रायलमध्ये समावेश होता. मला माझ्या देशात जायचे आहे, अशी प्रत्येक ज्यू प्रार्थना करायचा. ‘आलो नव्हतो आक्रमक म्हणूनी, नव्हतो आलो व्यापारी बनूनी, आलो युद्धात आपला देश गमवूनी, आलो होतो आश्रित म्हणूनी’, अशीच प्रत्येक ज्यूला लहानपणापासून शिकवण मिळाली होती.

जगभरातून इस्राईलमध्ये आलेला प्रत्येक ज्यू त्या त्या देशातील भाषा बोलात असायचा. ज्यू लोकांची भाषा एक, धर्मग्रंथही एकच, प्रार्थना पुस्तकेही सारखीच. मात्र, भाषा वेगवेगळी बोलली जायची. त्यांच्यामध्ये एकत्रितपणा कसा येईल, यासाठी सरकारने प्रयत्न करण्याचे ठरवले. आपली भाषा एकच असेल तर ७२ देशांतून आलेले लोक एकमेकांशी संवाद साधू शकतील, त्यांच्यातील एकोपा वाढेल, असा विचार पुढे आला.

संस्कृतप्रमाणेच हिब्रू भाषाही मृत झाली होती. केवळ पूजा-अर्चेसाठी हिब्रू भाषा वापरली जायची. आम्हाला त्याचा अर्थही माहीत नव्हता. हिब्रू कोणाला वाचताही येत नव्हते. ही मृत भाषा जिवंत करायची, असे इस्रायल देशाने ठरवले. एलियेझेल बेन येहुदा नावाचे एक प्राध्यापक होते. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. मृत भाषा जिवंत करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरु केले. सुरुवातीला सगळे लोक त्यांना हसायला लागले. प्राध्यापकांनी ती थट्टा मनावर न घेता प्रयत्न सुरु केले. दैैनंदिन वापरातील एकेक शब्द ते सोप्या भाषेत प्रसिद्ध करु लागले. विशेषत:, विविध नियम तयार करत, अभ्यास करत त्यांनी व्याकरणाचा ग्रंथ तयार केला.

हिब्रू ती ३००० वर्षांपूर्वीची भाषा. अनेक प्रचलित शब्द हिब्रू भाषेमध्ये अस्तित्वातच नव्हते. येहुदा यांनी काही प्राध्यापक, अभ्यासकांची त्यांनी एक समिती तयार केली. शैैक्षणिक स्तरावर त्यांची नेमणूक करण्यात आली. शासनातर्फे त्यांना वेतन दिले जाऊ लागले. नवीन शब्दांना कोणता पर्यायी हिब्रू शब्द असावा, ते विविध माध्यमांतून प्रसिद्ध केले जाते. त्यामुळे आता सामान्य स्तरावरही एकमेकांशी हिब्रू भाषा बोलली जाते. मुले तीन-चार वर्षाची असल्यापासून त्यांना घरात, बालवाडीमध्ये हिब्रू भाषाच शिकवली जाते, हिब्रू भाषेत त्यांच्याशी बोलले जाते.

वर्तमानपत्रांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये नवीन शब्द प्रसिद्ध होतात. वृत्तनिवेदकांकडून बातम्या सांगताना हिब्रू भाषेतील शब्द जाणीवपूर्वक वापरले जातात. वाचनालयांमध्ये हे शब्द पाठवले जातात. अशाप्रकारे सामान्यांमध्ये हे शब्द रुजतात आणि वापरले जातात. मोबाईलला हिब्रू भाषेमध्ये पेलेफोन म्हणतात. पेले म्हणजे चमत्कार. संगणकाला हिब्रू भाषेमध्ये मक्षेभ म्हणतात. अशा पद्धतीने हिब्रू भाषेचे संवर्धन करणे शक्य झाले आहे. रोमन, रशियन अशा भाषांमध्ये इस्त्राईलला दैैनिक निघायचे. मराठी भाषेमध्ये नवीन कायदे, हक्क याबाबत माहिती दिली जावी, या उद्देशाने ३५ वर्षांपूर्वी आम्ही ‘मायबोली’ या त्रैैमासिकाची सुरुवात केली. मराठी आणि हिब्रू भाषेची तुलना करता येणार नाही. मराठी भाषेतील अभ्यासक, प्राध्यापक, जाणकार भाषेच्या संवर्धनासाठी पुढाकार घेऊ शकतात.

(लेखक इस्रायली साहित्यिक आहेत)

Web Title: Approach: Why should Marathi not get the as like Heibruu?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.