‘आर्ची-परशा’चे खून पडू नयेत, म्हणून...; राज्यातील पहिले निवारा केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 07:15 AM2024-02-17T07:15:51+5:302024-02-17T07:16:35+5:30
आंतरजातीय/आंतरधर्मीय लग्न केल्याने कुटुंबीयांचा राग ओढवून घेणाऱ्या जोडप्यांसाठी अंनिसने राज्यातले पहिले सुरक्षित निवारा केंद्र उभारले आहे!
डॉ. हमीद दाभोलकर
‘सैराट’ सिनेमाचा शेवट आपल्या सगळ्यांना नीट आठवत असेल. आर्ची आणि परशाचे प्रेम केवळ ते वेगळ्या वेगळ्या जातीतले आहेत म्हणून दोन्ही कुटुंबांकडून नाकारले जाते. त्यांचेच भाऊबंद त्यांचा निर्घृण खून करतात असा तो शेवट आहे. अशा गोष्टी केवळ सिनेमातच घडतात असे नाही. जाती आणि धर्माच्या नावावर स्वत:च्या कुटुंबातील मुलामुलींचा जोडीदार निवडण्याचा हक्क डावलला जाण्याच्या घटना आपल्या आजूबाजूला सर्रास घडत असतात. बहुतांश घटनांमध्ये त्या तरुण मुलामुलींवर जातीच्या किंवा धर्माच्या बाहेर लग्न करू नये म्हणून कुटुंबाकडून आणि भावकीकडून टोकाचा दबाव टाकला जातो. तथाकथित उच्च जातीच्या लोकांनी इतर जाती समूहातील जोडीदाराला दमदाटी आणि मारहाण करणे हे तर अनेक ठिकाणी घडते. पण, काहीवेळा कुटुंबीय टोकाची भूमिका घेतात आणि आपल्या जातीच्या अथवा धर्माच्या खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्याच पोटच्या मुलांचा खून करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. अशा अनेक घटना गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात झालेल्या आहेत.
नातेवाइकांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे अनेक जोडप्यांना लग्नानंतर लगेचच त्यांच्या गावी जाता येत नाही. कुटुंबीय आणि समाजाकडून मारहाणीचा, तसेच जिवाचा धोका उद्भवू शकतो. अशा परिस्थितीत त्या जोडप्याला सुरक्षित निवारा देणाऱ्या केंद्राची गरज असते. अशा घटना वारंवार घडतात, त्या पंजाब-हरयाणासारख्या राज्यांमध्ये तिथल्या उच्च न्यायालयांच्या आदेशाने राज्य शासन अशी ‘सेफ हाउस’ चालवते; पण महाराष्ट्रात अजून तरी अशी सुविधा उपलब्ध नव्हती. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र अंनिसमार्फत ह्या स्वरूपाचे पहिले ‘सेफ हाउस’ सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे.
जात ही एक कुठलाही वैज्ञानिक आधार नसलेली अंधश्रद्धा आहे, असे डॉ. नरेंद्र दाभोलकर सातत्याने मांडत असत. त्यांच्या या भूमिकेला अनुसरून गेली अनेक वर्षे महाराष्ट्र अंनिस आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देण्याचे काम करीत आली आहे. ‘आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न सहायता केंद्र’ चालवताना त्या मुला-मुलींची सविस्तर मुलाखत घेणे, आवश्यक तर पोलिसांची मदत घेऊन लग्न लावण्यास मदत करणे असे हे काम आहे. केवळ प्रेमात पडून लग्न केले असे न होता जोडीदाराची निवड विचारपूर्वक केलेली असणे हे त्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे मानले जाते. पालक आणि मुलांचे समुपदेशनदेखील केले जाते. याच प्रयत्नांचा पुढचा टप्पा म्हणून हे सुरक्षा निवारा केंद्र चालू केले आहे. आंतरजातीय विवाहांच्या माधमातून जाती निर्मूलनाचे प्रयत्न करण्याचा हा एक प्रयत्न!
महाराष्ट्र अंनिस कार्यकर्ते शंकर कणसे यांच्या जागेत त्यांनी स्वत:हून खर्च करून हा सुरक्षा निवारा बांधला आहे. महाराष्ट्र अंनिस आणि ‘स्नेह आधार संस्थे’मार्फत चालवला जाणारा हा उपक्रम पूर्णपणे मोफत आहे. गेली तीन वर्षे अनौपचारिक पातळीवर हे केंद्र चालवले जात असे. आजअखेर आंतरजातीय/आंतरधर्मीय लग्न केलेली पंधरा जोडपी सुरक्षा निवारा घेऊन गेली आहेत. सुरुवातीचा ताणतणावपूर्ण कालावधी मागे सरल्यावर अनेक कुटुंबांनी या जोडप्यांना आता परत स्वीकारले आहे. ही जोडपी आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हे काम पुढे नेण्यात सहभागी होत आहेत हे खूप आश्वासक आहे. आंतरजातीय/आंतरधर्मीय लग्न केलेल्या जोडप्यांना संभाव्य त्रासाला सामोरे जाताना मदत मिळावी म्हणून अंनिसमार्फत एक आधारगटदेखील चालू करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समिती स्थापन करावी, असे निर्देश दिले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती त्यांच्याकडे मदत मागणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरवील, अशी ही व्यवस्था आहे. प्रत्येक जिल्ह्यात अशा जोडप्यांना सुरक्षा निवारा केंद्र उपलब्ध करून द्यावे असे देखील निर्देशित करण्यात आले आहे. ह्या शासन निर्णयामुळे अंनिससारख्या सुरक्षा निवारा केंद्र चालवणाऱ्या संस्थांना मोठे बळ मिळणार आहे. जाती आणि धर्मांच्या मधील ताणतणाव टोकाचे रूप धारण करत असलेल्या ह्या कालखंडात जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन प्रेमाची भाषा समाजात रुजवण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे.
(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख आहेत)
hamid.dabholkar@gmail.com