‘वजनदार’ आहात? - मग उतरा विमानातून!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 05:29 AM2021-05-26T05:29:36+5:302021-05-26T05:30:22+5:30

Health News: . जगभरात; त्यातही तरुण आणि लहान मुलांमध्ये आधीच लठ्ठपणाची समस्या होती. त्यात कोरोनानं भर घातली. कोरोना काळात जगभरात लठ्ठ लोकांची संख्या वाढली आणि त्यांचं वजनही नियंत्रणाबाहेर गेलं. 

Are you overweight? - Then get off the plane! | ‘वजनदार’ आहात? - मग उतरा विमानातून!

‘वजनदार’ आहात? - मग उतरा विमानातून!

Next

आधुनिक तंत्रज्ञान आलं, नवनवे  शोेध लागले. आपले शारीरिक कष्ट कमी होऊन बरीच कामं यंत्रे करू लागली. दिवसेंदिवस यात भरच पडत चालली आहे. त्यामुळे चैनीचं जीवन जगायला आपण सारेच चटावलो आहोत. आपली लाइफस्टाइलही त्यामुळे खूपच बदलली आहे. शारीरिक कष्ट दिवसेंदिवस कमी होत आहेत. सुखासीन जीवनाची आपल्याला चटक लागली, त्यात कोरोनानं आणखी भर घातली. जगभरातल्या कोट्यवधी लोकांना कोरोनानं सक्तीनं ‘घरी’ बसवलं. लोकांचं चलनवलन बंद झालं. त्यामुळे जे व्हायचं तेच झालं. जगभरात; त्यातही तरुण आणि लहान मुलांमध्ये आधीच लठ्ठपणाची समस्या होती. त्यात कोरोनानं भर घातली. कोरोना काळात जगभरात लठ्ठ लोकांची संख्या वाढली आणि त्यांचं वजनही नियंत्रणाबाहेर गेलं. 

अमेरिकेत तर ही समस्या आता जास्तच उग्र झाली आहे. गेली अनेक वर्षे अमेरिकेतील संशोधक आणि अभ्यासक याबाबत चिंता व्यक्त करताहेत. त्याबाबत त्यांनी वेळोवेळी दक्षतेचे इशारेही दिले आहेत. त्यावर तातडीनं पावलं उचलण्याची कार्यवाही आता सुरू होण्याची शक्यता आहे. पहिला बदल होण्याची शक्यता आहे, ती विमान प्रवासाबाबत. आता अमेरिकेत विमान प्रवासाला निघताना विमानात बसण्यापूर्वीच प्रवाशाचं वजन केलं जाण्याची शक्यता आहे आणि प्रवासी जर प्रमाणापेक्षा जास्त ‘वजनदार’ असेल, तर  विमानात बसण्यास नकार दिला जाण्याचीही शक्यता आहे. अर्थातच प्रत्येकाचं वजन केलं जाणार नाही. प्रवासी ‘वजनदार’ व्यक्ती आहे की नाही, हे बऱ्याचदा ‘पाहून’च कळतं. त्यामुळे प्रवाशाकडे पाहून त्याचं वजन करायचं की नाही आणि त्यानंतर  विमानात बसू द्यायचं की नाही, हे ठरवलं जाईल. विमान प्रवासाआधी सुमारे १५ ते २० टक्के प्रवाशांचं वजन होण्याची शक्यता आहे. 
यासाठी अमेरिकेतील सर्व विमान कंपन्या एकत्र आल्या आहेत आणि त्यावर विचारविनिमय सुरू आहे. लोकांनी आपली लाइफस्टाइल सुधारून आपलं वजन नियंत्रणात ठेवावं हा हेतू तर त्यामागे आहेच; पण विमान संतुलित राहावं, (एका बाजूला जास्त झुकू, कलंडू नये) आणि प्रत्येकाचा विमान प्रवास सुरक्षित व्हावा, अपघात टळावेत हे त्यामागचं सर्वांत महत्त्वाचं कारण आहे. विमान ‘ओव्हरलोड’ होऊन, विमानाचा तोल जाऊन याआधीही काही अपघात झाले आहेत. त्यामुळे ही खबरदारी घेण्यात येणार आहे. 

लठ्ठ प्रवाशांमुळे विमानातील अंतर्गत रचना आणि आसनव्यवस्था बदलली जाणार आहे. ‘मोठ्या’ प्रवाशांनुसार आसनांची संख्या आणि आकार बदलण्यात येईल. लठ्ठपणा वेगाने वाढत असल्याने वजनाशी संबंधित जुनी मानकं निष्प्रभ ठरताहेत. त्यामुळे विमान अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. ‘फेडरल एव्हिएशन’नं यासंदर्भात दोन वर्षांपूर्वीच इशारा दिला होता आणि खबरदारीचे उपाय योजण्याचं आवाहन विमान कंपन्यांना केलं होतं. विमान ओव्हरलोड होणं आणि विमानाचं संतुलन बिघडणं या समस्यांकडे सर्व विमान कंपन्यांनी जातीनं लक्ष द्यावं, असं आवाहन या परिपत्रकात करण्यात आलं होतं. 
विमान कंपन्या प्रवाशांसाठी अगोदर सरासरी वजन प्रमाण मानत असत; पण अमेरिकेत लठ्ठपणाची समस्या जसजशी वाढत गेली, तसतशी सगळी प्रमाणं आणि मानकं बदलत गेली. अमेरिकेत लठ्ठपणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून ते आता तब्बल ४३ टक्क्यांवर गेलं आहे. म्हणजेच दर दहा लोकांपैकी सरासरी चार जणांनी आपल्या वजनावरचं ‘नियंत्रण’ गमावलेलं असतं. विमान प्रवासासाठी हे घातक ठरू शकतं. त्यामुळे लवकरच याबाबत उपाययोजना केल्या जाणार आहेत. वाढीव वजनामुळे विमानातून उतरवणं किंवा विमानात बसूच न देणं ही गोष्ट खूपच अपमानकारक असल्यानं असा नियम करू नये, असं मत काही नागरिकांनी व्यक्त केलं आहे. अर्थात त्यात लठ्ठ लोकांचा समावेश अधिक आहे. अतिलठ्ठ लोकांना विमान प्रवास नाकारणं या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली, तरी त्या प्रवाशांची नावं मात्र जाहीर केली जाणार नाहीत, ती गुप्त ठेवण्यात येतील, असंही विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे; पण हा निर्णय अमलात आलाच तर काय, या प्रश्नानं अनेक ‘वजनदार’ लोकांना आताच घाम फुटला आहे. त्यातले काही जण वजन घटवण्याच्या आणि ‘तब्येतीत’ राहण्याच्या प्रयत्नांनाही लागले आहेत. अर्थात प्रत्येक वेळी या नियमांत बदलही करण्यात आले आहेत, वजनात ‘सूट’ दिली जाईल या अपेक्षेत अजूनही बरेच जण आहेत.

उन्हाळ्यातलं आणि हिवाळ्यातलं वजन! 
पूर्वीच्या नियमांनुसार कोणत्याही प्रौढ विमान प्रवाशाचं वजन उन्हाळ्यात जास्तीत जास्त ७७ किलो आणि हिवाळ्यात जास्तीत जास्त ७९ किलो असावं, असा सरासरी अंदाज नियम होता.  तो अंदाज ९० किलो आणि ९५ किलो  असा बदलण्यात आला, तरीही अनेकांनी ही मर्यादा ओलांडली. त्याचा विमान प्रवासावरच गंभीर परिणाम होऊ लागल्यानं वजनाबाबतचे नियम दर तीन वर्षांनी बदलले जाण्याचेही संकेत आहेत. हे नियम केव्हा लागू केले जातील याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी केव्हा ना केव्हा ते लागू होतीलच, असंही विमान अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title: Are you overweight? - Then get off the plane!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.