ऑफिसातलं काम तुम्हाला ‘खात’ सुटलं आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 09:41 AM2024-10-05T09:41:22+5:302024-10-05T09:41:44+5:30

कामाचा ताण सहन न होऊन थेट आत्महत्येचं टोक गाठणाऱ्या तरुण स्त्री-पुरुषांच्या कहाण्या अलीकडे सातत्याने बातम्यांमध्ये झळकतात. नेमकं काय चुकतं आहे?

Are you tired of office work, Death Cases increased | ऑफिसातलं काम तुम्हाला ‘खात’ सुटलं आहे का?

ऑफिसातलं काम तुम्हाला ‘खात’ सुटलं आहे का?

- प्राची पाठक, पर्यावरण आणि शाश्वत 
विकासाच्या अभ्यासक
एकीकडे देशभरात बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न दिसत असताना ज्यांच्या हातात काम आहे, त्यांना त्यातला ताण, धावपळ, जाणं-येणं, रस्त्यावरची रहदारी, रस्त्यांची अवस्था आणि अनेक मुद्दे अगदी नकोसे झालेले दिसतात. ‘कशासाठी, पोटासाठी’ अशी कितीही गाणी गात म्हटलं, तरी त्यातलं भयाण वास्तव आणि अपरिहार्यता आपल्याला अस्वस्थ  करते. 

कामाला चांगली माणसं मिळत नाहीत, ही रड एकीकडे आणि दुसरीकडे ठराविक गटाला त्यांचं रोजीरोटीचं काम आणि वैयक्तिक आयुष्य यातला समन्वय साधताना नाकी नऊ येताना दिसत आहेत. कित्येक लोक न आवडणाऱ्या कामात केवळ आर्थिक गरज म्हणून अडकलेले असतात. वयात येताना मुलामुलींना ठरावीकच शिक्षण घेऊन आयुष्यात ‘‘सेटल’’ होण्याच्या स्पर्धेत धावावं लागतं. कुणाला न आवडणारं शिक्षण घेऊन त्यातच आयुष्यभर रोजीरोटी कमवावी लागते. आपल्याला आपल्या कलानुसार मुळात शिक्षण मिळेल का, घेतलं त्या शिक्षणात रोजगार मिळेल का, त्या रोजगारातून होणाऱ्या कमाईत घरदार चालेल का, हे प्रश्नदेखील महत्त्वाचेच आहेत. एकेका नोकरीसाठी हजारो, लाखोंच्या संख्येत जिथे अर्ज येतात, स्पर्धा असते, तिथे नावाजलेल्या ठिकाणी नोकरी लागणे, यातच फार मोठी धन्यता मानली जाते. त्यामुळे पडेल ते काम करण्याकडे कल असतो. विरोध केला, तर हातातली संधी जाईल, आर्थिक नुकसान होईल, करिअरचा खेळखंडोबा होईल, वगैरे अनेक मुद्दे असतात. त्यातूनच मग दबावाला बळी पडायची, अन्याय सहन करायची शक्यता वाढते. पुरेशी झोप न होणं, स्क्रीनला चिकटून बसणं, कामाच्या तासांचं भान न राहणं, जेवणखाण आणि जीवनशैलीत झालेले बदल, असे अनेकानेक मुद्दे कामाच्या ताणाच्या संदर्भात आहेत. 

हे सगळं एकीकडे असताना गरज आणि हाव यातली सीमारेषा धूसर झालेली आहे. अवाजवी आणि अवास्तव टार्गेट्स स्वतःला देऊन त्यापाठी किती धावत सुटायचं, याचं भान सुटत जाताना दिसतं. बाह्य ताणतणाव असतातच. अनेक आकर्षणं, प्रलोभनं, बडेजाव, व्यसनाधीनता, कौटुंबिक आयुष्यातली, नातेसंबंधातली आव्हानं, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ आणि हे सगळं करत असताना हक्काचं आणि सुरक्षित असं ऐकून घेणारं, आधार देणारं कोणी नसणं, हेही गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत. मुळात, ‘चला, आता जाऊन मन मोकळं करू या, ताणविरहित जगायचं कसं, याचं भाषण ऐकू या आणि मग चुटकीसरशी प्रश्न सुटतील’, असं होत नाही. मनमोकळं बोलता येणं, आपली आव्हानं, मनातली खदखद आणि  आंदोलनं नेमकेपणाने सांगता येणं, ही देखील कला आहे. ती सरावाने, त्याबद्दल सजग राहून त्यावर काम केल्यानेच विकसित होऊ शकते. भारतात कामाचे तास आणि अपेक्षा वाढत असताना दिसत आहेत. फॅक्टरी ॲक्टनुसार कामाचे आठ तास दर दिवशी सुचवलेले आहेत. जगभरात, खासकरून युरोपात कामाचे तास दिवसाला सात, सहा असे होत असताना वाढत्या जागतिकीकरणात भारतात आर्थिक वाढीसाठी आणि उद्योगाची भरभराट होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जास्त वेळ काम करणं, हे एकदम सोपं आणि सहजसाध्य ध्येय वाटतं. 

बाह्य गोष्टींवरून आपल्या आयुष्यातील ताणतणाव किती वाढू द्यायचा, किती प्रभावित व्हायचं, किती प्रमाणात नमती भूमिका घ्यायची आणि कुठे अन्यायाला वाचा फोडायची, याबद्दल अधि सजगता येणं, समुपदेशन होणं, ही काळाची गरज आहे. किमान नैतिकता पाळली जाणं महत्त्वाचं आहे. आपल्या भाषेने रोजीरोटीला ‘उपजीविका’ म्हटलं आहे. ‘‘तुम्ही काय करता?’’, या प्रश्नात तुमची ओळख म्हणजे तुमचा व्यवसाय/नोकरी इतकीच ठेवायची की त्यापलीकडे आयुष्य जगायचं, कौशल्य आत्मसात करायचं, ते आपणच ठरवायचं. ‘उप’ असलेल्या गोष्टीला ती गोष्ट म्हणजेच सर्वस्व आणि संपूर्ण आयुष्य, असं समजून जगायचा ताण आपण भिरकावून देऊ शकतो का, ती कला आत्मसात करू शकतो का, हाही विचार ज्याने त्याने स्वतःशी प्रामाणिकपणे करायची वेळ आलेली आहे. 
    prachi333@hotmail.com

Web Title: Are you tired of office work, Death Cases increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.