अर्जेंटिनाचं युद्ध आता पोपटांशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2024 08:06 AM2024-10-07T08:06:06+5:302024-10-07T08:06:42+5:30
अर्जेंटिनामध्ये अचानक पोपटांची टोळधाड आली आहे. या हजारो पोपटांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडलं आहे.
रशिया आणि युक्रेन यांचे 'दोन दिवसांत' संपणारे युद्ध अजून सुरूच आहे. इस्रायल आणि हमास युद्धात रोज नवं तेल ओतलं जात आहे इतरही अनेक देशांत छुपा आणि खुला संघर्ष सुरू आहे. आधीच सुरू असलेल्या युद्धांत नवे काही देश सामील होऊ पाहात आहेत. सगळीकडे असं युद्धाचं आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. संपूर्ण जगच त्यामुळे एक गढूळ वातावरण अनुभवत आहे.
त्यात अर्जेंटिनाही आता एका नव्याच युद्धाला सामोरं जातं आहे. या युद्धात केवळ सरकारच नाही, तर सर्वसामान्य जनताही उत्स्फूर्तपणे सामील झाली आहे. संपूर्ण अर्जेंटिनाला या युद्धाची झळ अजून बसली नसली तरी देशाच्या बऱ्याच भागात कमी अधिक प्रमाणात त्याचा त्रास होतो आहे. अर्जेंटिनाच्या पूर्व अटलांटिक किनाऱ्याजवळील परिसरात गेल्या काही काळापासून ही संघर्षजन्य परिस्थिती सुरू आहे. त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे इतर युद्धांप्रमाणे या युद्धाचा त्रास इतर जगाला होणार नाही.
नेमकं हे 'युद्ध' आहे तरी कोणतं आणि कोणता त्रास या देशातल्या नागरिकांना सोसावा लागतो आहे? अर्जेंटिनामध्ये अचानक पोपटांची टोळधाड आली आहे. या हजारो पोपटांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडलं आहे. दिवसभर कलकलाट, त्यांची आरडाओरड, काही ठिकाणी तर लोकांच्या घराच्या, खिडक्या, टेरेस आदी ठिकाणी त्यांनी कब्जा मिळवला आहे. दरवाजे, खिडक्या उघड्या असल्या तर घरातही घुसायला त्यांनी कमी केलेलं नाही. याशिवाय या हजारो पोपटांनी सगळीकडे अक्षरशः घाण करून ठेवली आहे. या पोपटांचं करायचं तरी काय आणि त्यांना हुसकायचं कसं या विवंचनेत हजारो नागरिकांचंही जगणं मुश्कील झालं आहे. हिरव्या, पिवळ्या आणि रंगबिरंगी या पोपटांनी आणि पोपटसदृश पक्ष्यांनी जणू काही या भागांवर हल्ला केला आहे. त्यांचा हा हल्ला कसा परतवून लावावा, त्यांना आपल्या हद्दीत येण्यात कसं रोखावं, या चिंतेनं अर्जेंटिनाचं सरकारही काळजीत पडलं आहे. कारण लोकांच्याही रोषाचा सामना त्यांना करावा लागतोय.
पोपटांचा हा हल्ला परतवून लावण्यात सरकारही फारसं यशस्वी न झाल्यानं नागरिकांनीच आता पुढाकार घेतला असून प्रत्येक जण आता आपापल्या पद्धतीनं या पोपटांचा प्रतिकार करताना त्यांच्यावर पलटवारही करतो आहे. पण काही केल्या हे पोपट कशालाच बधायला तयार नाहीत. ते मागे हटायला तयार नाहीत. पण हे झालं तरी कसं? हजारोंच्या संख्येनं हे पोपट शहरांमध्ये घुसले तरी कसे? शहरी वस्तीतून परत जाण्यास ते तयार का नाहीत? कारण त्यांनाच आता राहायला घर नाही. अर्जेंटिनात अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर झाडं कापली गेली, जंगलंच्या जंगलं नष्ट केली गेली. मोठमोठ्या जंगलांची अल्पावधीत जणू काही ओसाड माळरानं झाली. 'विकासा'साठी ही जंगलं तोडली गेली, अंदाधुंदपणे झाडांवर करवती चालवल्या गेल्या, शंभरपेक्षाही अधिक काळ पाहिलेली अनेक झाडंही त्यात धराशयी पडली.
अचानक आपलं सगळंच उद्ध्वस्त झालेल्या कुठलाही सहारा नसलेल्या, बेघर झालेल्या या पोपटांनी आणि इतर पक्ष्यांनी आपला मोर्चा शहरांकडे वळवला. त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता आणि नाही. त्यांना कितीही हुसकावलं तरी ते जाणार कुठे? त्यामुळे नागरिकांनी अनेक पोपटांना ठार केलं, तरीही आपली जागा सोडण्यास ते तयार नाहीत. कारण अन्न-पाणी आणि आश्रयाच्या शोधात आलेल्या या पक्ष्यांसाठीही ही जीवन-मरणाची लढाई आहे.
माध्यमांच्या माहितीनुसार अर्जेटिनात सध्या हजारोंच्या झुंडीनं हे पक्षी सध्या फिरताहेत. ते घरात घुसताहेत, विजेच्या खांबांवर बसताहेत, विजेच्या तारा कुरतडताहेत. त्यामुळे अनेक ठिकाणची वीज वारंवार गुल होते आहे. एवढंच नाही, फोन आणि इंटरनेटच्या ताराही त्यांनी तोडून ठेवल्या आहेत. आजच्या आधुनिक जगातल्या 'जीवनावश्यक' गोष्टींचाच अचानक तुटवडा निर्माण झाल्यानं नागरिकही हैराण झाले आहेत. दुरुस्ती करत नाही, तोच पुन्हा त्याच परिस्थितीचा सामना करावा लागत असल्यामुळे तिथे खरोखरच 'युद्धजन्य' परिस्थिती निर्माण झाली आहे. चिडलेल्या नागरिकांनी आता सरकारच्या अकार्यक्षमतेवरच कोरडे ओढायला सुरुवात केली आहे.
त्यांना बेघर केलंत, ते घरात घुसतीलच!
पोपटांना मारण्यापासून तर त्यांना पळवण्यापर्यंत नागरिक अनेक उपाय करताहेत. काहींनी पोपटांना घाबरवण्यासाठी तहेत हेचे आवाज काढणारी उपकरणं आपल्या घराजवळ बसवली आहेत. काहींनी लेझर किरणांचा उपयोग केला आहे, पण कोणताही उपाय अजूनतरी यशस्वी झालेला नाही. "शत्रूसाठी खोदलेल्या खड्यात आपणच जाऊन पडावं अशी स्थिती झाली आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, तुम्ही त्यांना बेघर केलंत, ते आता तुमच्या घरात घुसणारच!