लष्करी कारवाईने पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला उजाळा

By admin | Published: October 4, 2016 12:32 AM2016-10-04T00:32:15+5:302016-10-04T00:32:15+5:30

थेट लष्करी कारवाईला परवानगी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या आगळिकीवर आजवर भारत ज्या पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त करीत आला

Army action shocks Prime Minister Modi's image | लष्करी कारवाईने पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला उजाळा

लष्करी कारवाईने पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला उजाळा

Next

हरिष गुप्ता, (‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर )
थेट लष्करी कारवाईला परवानगी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या आगळिकीवर आजवर भारत ज्या पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त करीत आला, तिला एकदमच कलाटणी देऊन टाकली आणि अनेक दिवसांपासून भारताच्या दडपून राहिलेल्या रागाला वाचा फोडली. सर्जिकल स्ट््राईकचे पाऊल उचलून भारताने दहशतवादविरोधी लढ्यातील आपली व्यूहरचना नि:संदिग्ध स्वरुपात स्पष्ट केली आहे. भारतीय लष्कराच्या विशेष तुकडीने ही कारवाई करतांना काही दहशतवादी आणि त्यांच्या मदतीला आलेल्या दोन पाकिस्तानी सैनिकांनाही ठार केले आहे. नियंत्रण रेषा ओलांडण्याचे प्रकार याही आधी होत होते पण भारताने त्याचा कधी गाजावाजा केला नव्हता. २००२चे ‘आॅपरेशन पराक्रम’ किंवा २०१३मध्ये एका सैनिकाचे शीर कापून नेल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाई नंतरही तत्कालीन सरकारने सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडल्याचा दावा केला नव्हता. लष्करी कारवाई हा भारताने नेहमीच अखेरचा पर्याय ठेवला आहे. जवळपास २४ वर्र्षे वाट बघितल्यानंतर १९९८ साली भारताने अणू चाचणी केली. २००८ साली पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला आणि १६४ नागरिकांचे प्राण घेतले, तेव्हां या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार केला जावा अशी मागणी जनतेत होऊ लागल्यानंतरही भारताने संयम सोडला नव्हता.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी वारंवार जे सांगत असत त्यानुसार त्यांनी पाकिस्तानला ठोस आणि कठोर उत्तर दिले आहे. गुरुदासपूर येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि अलीकडच्या उरी हल्ल्यानंतर मोदींना त्यांच्याच वक्तव्यांची चिंता ग्रासू लागली असणार. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असताना व बेरोजगारीचा मुद्दाही तीव्र होत असताना मोदींनी ही जोखीम उचलली आहे. त्यांचे निकटवर्ती व भाजपा अध्यक्ष अमित शाह सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असतात आणि सर्व राजकीय निर्णयांमध्ये महत्वाची भूमिका निभावत असतात. निवडणुकांच्या राजकारणापलीकडे जाऊन बघितले तर उरी हल्ल्यानंतरही सरकारने निष्क्रियता दाखवली असती तर आपण शांततावदी नेहरु विचारसरणीपेक्षा वेगळे आहोत अशी जी काही ओळख मोदींनी निर्माण करुन ठेवली आहे तिला तडा गेला असता. तितकेच नव्हे तर कारगिल सारख्या कठीण युद्धात पाकिस्तानला खडे चारुन वाजपेयी यांची लोहपुरुष म्हणून जी प्रतिमा तयार झाली होती तिच्याहीपेक्षा मोदींची प्रतिमा घसरली असती.
मोदींनी उचललेले कठोर पाऊल हा कदाचित त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सुचवलेला पर्याय असावा. डोवाल हे संयमित धोरणाला अत्यंत हुशारीने आक्रमक बचावात परावर्तीत करणारे अधिकारी आहेत. २०१४च्या आॅक्टोबरमध्ये त्यांनीच सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांना सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारास शक्य तितके कठोर उत्तर देण्याचा सल्ला दिला होता. गोळीबारानंतर पाकिस्तानी सैनिकी अधिकाऱ्यांसमवेत फ्लॅग मिटिंग करायची नाही, असेही त्यांनीच सीमा सुरक्षा दलास सांगितले होते. अर्थात भारताच्या धोरणात झालेल्या बदलांचे फळ आता दिसू लागले आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या कारवायाबाबत राजकारण्यांकडून फक्त वक्तव्ये केली जात होती, मात्र आता प्रत्यक्ष कृती केल्याने सैन्याचे मनोबल उंचावले आहे. तसेही पाकिस्तानकडून होत असलेल्या सततच्या दंडेली व घुसखोरीच्या विरोधात देशात जी निराशा पसरली होती तिच्यातून बाहेर येण्याची भारताला गरजच होती. संयुक्त राष्ट्र संघात बोलताना भारताच्या प्रतिनिधी एनाम गंभीर यांनी या दंडेलीला व घुसखोरीला दहशतवादाची वाढती वेल असे म्हटले होते. अर्थात भूतकाळातही अशी प्रभावी भाषा वापरली जात असे, पण प्रत्यक्ष कृती मात्र शून्य होती. पण २९ सप्टेंबरच्या धडक कृतीची प्रसिद्धी प्रथमच लष्करी कारवाई महासंचलकांनी स्वत: केल्याने भारताला जे हवे होते ते गवसले आहे.
पाकिस्तानने मात्र अशी काही कारवाई झालीच नसल्याचे म्हटले असून मूळ स्वभावधर्मानुसार या प्रकरणावर पडदा टाकायचा प्रयत्न केला आहे. पण त्यामागे भारताच्या संभाव्य कारवाईला तोंड देण्यासाठी पुरेसा वेळ मिळविण्याचा हेतू असू शकतो. एकंदर जे दिसते ते असे आहे की पंतप्रधान मोदी व त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी पाकिस्तानकडून येणाऱ्या लष्करी तसेच अणू प्रयोगाच्या धमक्यांना फारशी भीक न घालण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानकडून नेहमीप्रमाणे दर्पोक्ती केली जात असली तरी भारतानेही सैन्याला आणि इतर संबंधित विभागाना युद्धसज्ज ठेवले आहे. भारताच्या कारवाईने हे स्पष्टपणे दाखवून दिले आहे की पाकिस्तान आता फार काळ दहशतवाद्यांशी असलेले आपले संबंध लपवू शकत नाही. यापुढे प्रत्येक दहशतवादी कारवाईला लष्करी प्रत्त्युत्तर मिळण्यासाठी तयार रहा असा संदेशही पाकिस्तानला दिला गेला आहे. परिणामी दहशतवाद्यांना मदत करणे, आश्रय देणे व शस्त्र पुरवणे फार काळ चालू दिले जाणार नाही. दिल्लीतल्या एका सुरक्षा तज्ज्ञाने मला सांगितले की जर आता मुंबईवर पाकिस्तानकडून हल्ला झालाच तर प्रत्त्युत्तर म्हणून कराचीवर नौदल आणि हवाई दल यांच्याकरवी हल्ला केला जाऊ शकतो.
पाकिस्तानच्या आत्मविश्वासाचे दोन स्त्रोत आहेत. एक म्हणजे चीन. पाकला वाटते की चीन त्यांचा अगदी निकटचा साथीदार आहे आणि तो भारताच्या उत्तर व पूर्व सीमेवर दबाव निर्माण करून भारताला नमते घ्यायला लावू शकतो. दुसरे म्हणजे तणाव निवळावा आणि भारताने अणुबॉम्बचा वापर करु नये म्हणून अमेरिका मध्यस्थी करेल. पण बीजिंग आणि वॉशिंग्टन येथून आलेल्या प्रतिक्रिया पाकिस्तानसाठी निराशाजनक आहेत. चीनने दोहोतील संघर्षावर चिंता व्यक्त करुन दोघाना संयम ठेवायला सांगितले आहे. तर अमेरिकेने उरी येथील दहशतवादी हल्ला हेच वाद वाढण्याचे कारण असल्याचे स्पष्टपणे सांगून पाकिस्तानने आता दहशतवादी गटांना थारा देणे बंद करावे, असे बजावले आहे. शिवाय पाकिस्तान दक्षिण आशियात नवे मित्र शोधत आहे, कारण नोव्हेंबरमध्ये इस्लामाबादेत होणारी सार्क परिषद रद्द करण्याची नामुष्की पाकवर आली आहे.
मोदी नि:संशय वादग्रस्त नेते आहेत. पण त्यांच्या कारभाराच्या तिसऱ्या वर्षातील त्यांचे राजकीय आणि लष्करी निर्णय त्यांना लाभदायक ठरत आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने दुर्बल झालेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि ममता बॅनर्जी यांच्यासारखे राजकारणी अल्पसंख्यकांच्या मतांवर भिस्त ठेवतात. पण ते सोडले तर अगदी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षनेत्याने मोदींच्या धैर्याचे कौतुक केले आहे.

Web Title: Army action shocks Prime Minister Modi's image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.