सेना, आलेपाक अन् सीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:16 AM2018-01-30T00:16:14+5:302018-01-30T00:17:00+5:30

स्वित्झर्लंडसारख्या निसर्गसंपन्न देशातील डावोस येथे भरलेल्या वैश्विक आर्थिक परिषदेला हजेरी लावून आलेले सीएम आज भलतेच प्रफुल्लित दिसत होते. अलीकडच्या काळात घडलेल्या काही सामाजिक व राजकीय घटनांमुळे काळवंडलेल्या चेह-यावर आज प्रसन्नता दिसत होती. स्वित्झर्लंडचे शुद्ध हवा-पाणी (अन् बर्फही!) चांगलेच मानवल्याचे जाणवत होते.

Army, Alpak and CM | सेना, आलेपाक अन् सीएम

सेना, आलेपाक अन् सीएम

Next

- नंदकिशोर पाटील 
स्वित्झर्लंडसारख्या निसर्गसंपन्न देशातील डावोस येथे भरलेल्या वैश्विक आर्थिक परिषदेला हजेरी लावून आलेले सीएम आज भलतेच प्रफुल्लित दिसत होते. अलीकडच्या काळात घडलेल्या काही सामाजिक व राजकीय घटनांमुळे काळवंडलेल्या चेह-यावर आज प्रसन्नता दिसत होती. स्वित्झर्लंडचे शुद्ध हवा-पाणी (अन् बर्फही!) चांगलेच मानवल्याचे जाणवत होते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या जागतिक परिषदेला हजेरी लावण्याचा मान मिळाल्यानंतर कोण सुखावणार नाही? शिवाय, भाजपशासित अठरा राज्यातील मुख्यमंत्र्यांमधून फक्त महाराष्ट्राचा नंबर लागला असेल, तर ती मोठीच अ‍ॅचिव्हमेन्ट! मनोमन ते मोदीजींचे लाख लाख आभार मानत असले पाहिजेत. मंत्रिमंडळातील सहकाºयांचा जेवढा भरोसा आहे, त्याहून कैक पटीने मोदीजींचा आपल्यावर विश्वास आहे, ही बाबही दिलासादायक आहे म्हणा. डावोसमध्ये फक्त महाराष्ट्राचा एकमेव स्टॉल लागलेला होता. जगभरातील उद्योगपतींनी या स्टॉलला भेट दिली अन् महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा बोलून दाखवली. राज्यात आता कोट्यवधीची गुंतवणूक येणार, हजारो बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आणि त्यातून राज्याचा जीडीपी उंचावणार, या कल्पनेत सीएम अक्षरश: हरखून गेले होते. आज साहेबांचा मूड चांगला दिसतोय, हे हेरून एका स्वीय सहाय्यकाने एक पार्सल त्यांच्या पुढ्यात आणून ठेवले. न बोलता खुणेनंच सीएमनी विचारलं, ‘काय आहे हे?’ स्वीय सहाय्यक कानाजवळ जात पुटपटले, ‘मातोश्रीवरून आलंय!’
कपाळावर आठ्या आणत साहेबांनी ते पार्सल फोडायला सांगितलं. उघडून बघतो तर काय, आलेपाकाच्या वड्या, शारंगधर काढा अन् स्ट्रेपसीलच्या गोळ्या, अन् एक चिठ्ठी!
सीएमनी चिठ्ठी वाचायला घेतली.
प्रिय मुख्यमंत्री,
जय महाराष्ट्र!

आपल्यापर्यंत वार्ता आलीच असेल की, आपण डावोसला असताना इकडे आमच्या मावळ्यांचा राष्ट्रीय मेळावा झाला. होय, राष्ट्रीयच तो! आता आम्हीही अ.भा. (अर्थात, अखिल भारतीय) होऊ घातलो आहोत आणि त्याचकरिता आम्ही स्वबळाची गर्जना ठोकली आहे. यापुढे आम्हांस्नी कुणाच्या कुबड्यांची गरज नाही. जगदंबेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेच. कमळाबाईसोबत संसार थाटून आम्ही आमच्याच पायावर दगड मारून घेतला, हे बारामतीकरांचे म्हणणे आम्हांस पटले आहे. गेली साडेतीन वर्षे रडतखडत आपला संसार सुरू आहे. अधूनमधून कुरबुरी होतात...भांड्याला भांडे लागते. केवळ आपल्या हसºया चेहºयाकडे बघत आम्ही आलेला दिवस ढकलत आहोत. पण मुलंही आता मोठी झालीत. त्यांना ‘शत प्रतिशत’ मालकीचं घर हवंय. कधीतरी वेगळं व्हायचंच होतं. मग म्हटंल, आताच मुर्हूत काढून ठेवू या. ऐनवेळी धावपळ नको. कमळाबाईचा काही भरोसा नाही. तसा व्यक्तिश: आमचा तुमच्यावर राग नाही. पण ते गुजरातचे ‘शहा’वल्ली कधी आक्रमण करतील, याचा नेम नाही. लोभ आहेच. कायम राहावा.
जय महाराष्ट्र!
ता.क.-डोवोसच्या बर्फामुळं आपला घसा बसल्याचे कळते. सोबत आलेपाक पाठवला आहे. सकाळ-संध्याकाळ तोंडात ठेवत जा!

Web Title: Army, Alpak and CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.