भारतात आगमन
By Admin | Published: January 8, 2015 11:32 PM2015-01-08T23:32:37+5:302015-01-08T23:32:37+5:30
महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतले, त्याला आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.त्यानिमित्ताने़़़
मोहनदास करमचंद गांधी आपली पत्नी कस्तूर हिच्यासह आफ्रिकेतून भारतात परतले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी देणाऱ्या या घटनेला आज बरोबर १०० वर्षं पूर्ण होताहेत. इंग्लंडमध्ये बॅरिस्टर झालेला, आफ्रिकेतील वकिलीत लौकिक मिळविलेला हा बॅरिस्टर परंपरागत काठेवाडी पोषाखात मुंबई बंदरात उतरला हे एक आश्चर्य.
पैसे कमविण्याच्या हेतूने हा बॅरिस्टर दक्षिण आफ्रिकेत गेला होता. तिथे भारतीयांना मिळणाऱ्या अन्याय्य आणि अपमानास्पद वागणुकीने याचं संवेदनशील मन कळवळलं. अपमानाचे चटके यानेही सोसले होते. मारिट्सबर्ग स्टेशनवर अनुभवलेला तो जीवघेणा अपमान. मन लज्जा आणि अपमानाने कडू झालं. गप्प न बसता अन्यायाचा प्रतिकार करायचाच या विचाराची एक छोटीशी ठिणगी मनात प्रज्वलित झाली. इतरांच्या दु:खाविषयी कणव आणि सर्वांना कवेत घेणारा स्वभाव यामुळे सर्वच भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा उभारायचा निश्चय हळूहळू आकार देऊ लागला. त्यातून अहिंसक सत्याग्रहाचा लढा साकारला. तसे अहिंसेचे तत्त्वज्ञान जुनेच. मुमुक्षुंसाठी सांगितलेल्या ५ व्रतांमधील अहिंसा हे एक व्रत. या जुन्या व्रतामध्ये नवीन आशय भरून अन्याय्य निवारणासाठी सर्वसामान्यांना बरोबर घेऊन त्यांनी एक यज्ञ आरंभिला. साऱ्या जगाला एक अभिनव साधन दिलं.
आफ्रिकेतील अहिंसक लढ्याची विजयपताका घेऊनच ते भारतात परतले होते. टिळकांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी गांधीजींमुळे भरून निघाली. स्वातंत्र्य आंदोलनाला त्यांनी अहिंसक सत्याग्रहाचं वळण दिले. त्याच्यामुळे लढा व्यापक झाला. शिक्षित-अशिक्षित, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण, श्रमजिवी-बुद्धिजीवी असे सगळेच लढ्यात सामील झाले. प्रामुख्याने गांधीजींनी केलेल्या अहिंसक आंदोलनामुळे शांतपणे सत्तांतर झालं. युनियन जॅक खाली आला आणि तिरंगा डौलाने फडकला. स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी अनेक विधायक उपक्रम त्यांनी देशाला दिले.
भारताशिवाय दुसरा विचारच त्यांच्या ध्यानीमनीस्वप्नी नव्हता. अशा या महात्म्यावर स्तुतिसुमने उधळली गेली, तसे निंदेचे वाक्बाणही. शिकवणारा, अहिंसक, सत्याग्रही सैनिकांचा सेनापती, भारताचा नम्र सेवक, कोट्यवधींच्या दारिद्र्याची जाण ठेवून स्वेच्छादारिद्र्य स्वीकारणारा संत अशा अनेक रूपात त्यांना गौरविलं गेलं. पण त्याचवेळी याच भारतातील काहींनी त्यांना वेगळ्याच रूपात पाहिले. अहिंसेचा उदोउदो करून भारतीयांना भ्याड, निर्विर्य, पराक्रमशून्य करणारा, प्रगती आणि विज्ञानाला विरोध करणारा, चरखा हातात देऊन भारताला १७व्या शतकात लोटणारा, देशाची फाळणी करणारा, भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे यासाठी उपवास करणारा अशा खलनायकाच्या रूपात पाहिलं.
भारतात परतल्यानंतरच्या १०० वर्षांत हे हयात असताना आणि विशिष्ट विचारधारेमुळे एका भारतीयानेच त्यांची हत्त्या केल्यानंतरही स्तुतिनिंदा दोन्ही त्यांच्या वाट्याला येतेच आहे. हा महात्मा मात्र स्तुतिनिंदेच्या पलीकडे पोचलेला आहे.
त्यांचे विचार हद्दपार करण्याच्या हेतूनेच त्यांची हत्त्या झाली. त्यांची हत्त्या करणारे हे विसरले की एखाद्याचे डोके उडवले तरी त्या डोक्यातले विचार मरत नाही. कारण ते अनेकांच्या डोक्यात रुजलेले असतात. आजही गांधीविचारांचा सुगंध साऱ्या जगभर दरवळतो आहे. हिंसेच्या उद्रेकाने त्रस्त झालेल्या जगाला अहिंसेचं मोल कळू लागलंय. अहिंसेच्या शीतल जलाचं शिंपणच हिंसेच्या भडकलेल्या ज्वाला विझवू शकेल. गांधीजींची पर्यावरणस्नेही जीवनशैलीच पर्यावरण विनाशाच्या संकटातून मुक्त करू शकेल हा विश्वास वाढतोय. विचार सुंगध अधिक व्यापक क्षेत्र व्यापतो आहे. पण दुर्दैवाने भारतातील विशिष्ट विचारधारेच्या लोकांना तो सुगंध जाणवतच नाही. गांधी हत्त्येचं समर्थन करणारा हा गट आजही कार्यरत आहे. त्यांचा हिंदुवर्चस्ववाद आजही कायम आहे. नथुराम गोडसेला ते हुतात्मा मानतात. त्याचा मृत्यूदिन श्रद्धापूर्वक साजरा करतात. गांधीजींच्या भारतातील आगमनाला एक शतक पूर्ण होतंय. त्यानिमित्ताने विपरीत विचारांची काजळी झटकून स्वच्छ मनाने गांधी समजून घ्यावा या अपेक्षेने केलाय हा लेखन प्रपंच.
- वासंती सोर
(ज्येष्ठ सर्वोदयी)