कलांना सीमा नसते!
By admin | Published: October 12, 2015 10:13 PM2015-10-12T22:13:13+5:302015-10-12T22:13:13+5:30
प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली यांच्या मुंबई-पुण्यातील कार्यक्रमांना विरोध करून व आयोजकांना तो रद्द करायला लावून शिवसेनेने काय साधले?
प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली यांच्या मुंबई-पुण्यातील कार्यक्रमांना विरोध करून व आयोजकांना तो रद्द करायला लावून शिवसेनेने काय साधले? गुलाम अलींना अडवून आम्ही सीमेवर लढणाऱ्या जवानांचा सन्मान वाढविला आणि सीमेवर देह ठेवणाऱ्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली या सेनेच्या दाव्यात काही अर्थ आहे काय? सेनेच्या अशा ‘पराक्रमा’नंतर दिल्लीच्या अरविंद केजरीवालांनी गुलाम अलींना देशाच्या राजधानीत सन्मानपूर्वक आमंत्रित केले. त्यांच्या पाठोपाठ प. बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी त्यांना कोलकात्यात येण्याचे आमंत्रण दिले. तर अखिलेश यादव यांनी लखनौमध्ये स्वागत केले. त्यावर कडी म्हणजे ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सेनेचे मंत्री बसतात त्या फडणवीसांनीही आपण गुलाम अलींचे चाहते असल्याचे जाहीर केले. त्याच वेळी नितीन गडकरी यांनीही ते गुलाम अलींचे फॅन असल्याचे सांगून टाकले. कला आणि कलावंत यांना जातीधर्माच्या, पक्षाच्या किंवा देशाच्या सीमा असतात काय? भारतरत्न बिसमिल्ला खाँ यांना अमेरिकेने कार्यक्रमासाठी बोलविले व तेथेच त्यांना कायमचे स्थायिक होण्याची विनंती केली. त्यासाठी त्यांच्या वाराणसीतील घराभोवती असावे तसे वातावरण निर्माण करण्याचीही त्यांनी तयारी दर्शविली. ती विनंती नाकारताना बिसमिल्ला म्हणाले ‘पण मग येथे माझी गंगा तुम्ही कशी आणाल?’ काशी विश्वेश्वराच्या पायरीवर आपली सेवा नियमितपणे रुजू करणाऱ्या त्या महान कलावंताला आपण मुसलमान ठरवायचे की फक्त हिंदीभाषी? की नुसतेच भारतीय? गांधी किंवा लिंकन ही कोणा एका देशाची वा धर्माची मालमत्ता असते काय? दुसरे महायुद्ध सुरू असताना त्यात गुंतलेल्या शत्रू देशांचे कलावंत परस्परांच्या देशात जात होते व तेथे ते सेवेची रुजवातही करीत होते. पाकिस्तानातून भारतात वैद्यकीय सेवा घ्यायला येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यांच्या येण्यावर बंदी घालून आपण आपल्या शहिदांचा सन्मान करणार आहोत काय? नानकानासाहेब हे गुरु नानक देवांचे जन्मस्थान पाकिस्तानात आहे. त्यांच्या जन्मतिथीला तेथे जाणाऱ्या शीख बांधवांची संख्या कित्येक हजारांची आहे. पाकिस्तान सरकारने त्यांच्या येण्यावर बंदी घालून ‘त्यांच्या’ शहिदांचा सन्मान वाढवायचा असतो काय? सचिन तेंडूलकर हा पाकिस्तानातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. जनरल परवेझ मुशर्रफ हे पाकीस्तानचे अध्यक्ष असताना ‘त्या देशात मुशर्रफ विरुद्ध तेंडूलकर अशी निवडणूक झाली तर तेंडूलकरच विजयी होईल’ असे म्हटले गेले. शिवसेनेने पाकिस्तानचे क्रिकेट खेळाडू रोखले. आता ती तेथील कलावंतांना अडवीत आहे. नेमक्या याच वेळी भारत सरकार मात्र पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांसोबत आपल्या अधिकाऱ्यांच्या सीमेसंबंधीच्या वाटाघाटी सुरू राहाव्या यासाठी प्रयत्नशील राहिले आहे. आपले राजकारण कुठवर आणि कसे ताणावे किंवा किती खालच्या वा बालिश स्तरावर न्यावे याला काही मर्यादा असावी की नाही? क्रिकेटची मैदाने खोदून तो खेळ थांबवू पाहणाऱ्यांकडून एवढ्या तारतम्याची अपेक्षा बाळगण्यात तसा अर्थही नसतो आणि त्यासाठी दु:खही करायचे नसते. खंत आहे ती एकाच गोष्टीची. आपले राजकारण कधी प्रौढ होऊच द्यायचे नाही असे आपल्या राजकीय पक्षांनी ठरविले आहे काय? महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत व पुरोगामी म्हणून ओळखले जाणारे राज्य आहे. संकुचित राजकारण करणारे काहीजण येथेही आहेत. आपल्या राजकारणाला धर्म व राष्ट्र यांची मोठी नावे चिकटवून आपले अस्तित्व उजागर करण्याखेरीज त्यांच्याजवळ दुसरा कार्यक्रम नाही. त्यामुळे क्रिकेट वा संगीत यासारखे समाजाच्या जिव्हाळ््याचे विषय ते ओढूनताणून राजकारणात आणतात आणि त्यात आपली माणसे गुंतून राहतील याची व्यवस्था करतात. त्यांची खरी अडचण त्यांच्याजवळ कोणताही सामाजिक वा राजकीय स्वरुपाचा विधायक कार्यक्रम नसणे ही आहे. त्यामुळे केंद्र व राज्य या दोन्ही ठिकाणी सत्तेत सहभागी होऊनही शिवसेनेला असले उपद््व्याप करण्याची गरज भासत असावी. ज्यांच्याकडे ठोस कार्यक्रम वा कोणत्याही वैचारिक भूमिका नसतात त्या साऱ्याच पक्षांची व संघटनांची ही शोकांतिका आहे. निवडणुका लढविणे आणि त्या जिंकण्यासाठी जात, धर्म, मंदीर, मशीद वा एखादा ईश्वर हाताशी धरणे एवढेच मग अशा पक्षांच्या व संघटनांच्या जवळ शिल्लक राहते. विकासाची आश्वासने देऊन सत्तेवर येणाऱ्या राष्ट्रीय पक्षांची व सरकारांची समाजकारणातली भिस्त अशाच गोष्टींवर राहत असलेली आज आपण पाहत आहोत. या स्थितीत शिवसेनेसारख्या प्रथम भाषिक व नंतर धर्माच्या नावाने राजकारणाची गुढी उभारणाऱ्या पक्षांकडून वेगळे काही अपेक्षितही नसते. कारण आपला आडदांडपणा हाच त्यांच्या स्वत्वाचा विषय असतो. तथापि महाराष्ट्रात बंदी घातल्यामुळे गुलाम अली यांची कला लहान होत नाही. त्यांचे चाहते त्यांच्या देशाएवढेच याही देशात आहेत व राहणार आहेत. वास्तव हे की संस्कृती वा धर्म यासारख्याच कलेलाही सीमा नसतात. खरे तर महाराष्ट्राच्या मोठेपणाला व देशाच्या सांस्कृतिक थोरवीला बाधित करणारा हा प्रकार आहे आणि त्याकडे तसेच पाहणे आवश्यक आहे.