विश्वाशी एकरूप झालेले गुरुदेव टागोर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 06:20 AM2022-05-07T06:20:05+5:302022-05-07T06:20:18+5:30

आज संपूर्ण जगातच राजकारणासाठी माणुसकीला तिलांजली देण्यात येत आहे. माणसा-माणसांत द्वेष पसरविण्यात येत आहे. धर्मा-धर्मांत तेढ निर्माण केली जात आहे. अशा परिस्थितीत माणसाला योग्य मार्ग दाखविण्याचे सामर्थ्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या लिखाणातून मिळू शकते. 

artical on Gurudev rabindranath tagore united with faith his writing showing good path | विश्वाशी एकरूप झालेले गुरुदेव टागोर!

विश्वाशी एकरूप झालेले गुरुदेव टागोर!

googlenewsNext

एम. जी. बेग,
लोकमत संदर्भ विभाग, नागपूर

आज संपूर्ण जगातच राजकारणासाठी माणुसकीला तिलांजली देण्यात येत आहे. माणसा-माणसांत द्वेष पसरविण्यात येत आहे. धर्मा-धर्मांत तेढ निर्माण केली जात आहे. अशा परिस्थितीत माणसाला योग्य मार्ग दाखविण्याचे सामर्थ्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या लिखाणातून मिळू शकते. 

गुरुदेव टागोर म्हणतात, मानव हा अखिल विश्वाचा रहिवासी आहे. देशाच्या भौगोलिक सीमा अथवा भाषांची बंधने त्याला जखडून ठेवू शकत नाहीत. देशाच्या सीमा, देशभक्ती, प्रखर राष्ट्रवाद या कल्पना म्हणजे माणसाने केलेल्या चुकाच आहेत.. असे मानवतावादी विचार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या साहित्यातून पदोपदी व्यक्त केले आहेत. 

‘गीतांजली’च्या एका कवितेत ईश्वराकडे याचना करताना ते म्हणतात, ‘जिथे मनाला भीती शिवत नाही आणि मस्तक उन्नत आहे; जिथे ज्ञान मुक्त आहे; जिथे समाज दुभंगलेला नाही, जिथे पूर्णत्व प्राप्तीसाठी अखंड उद्यमशीलता आपले बाहू पसरत आहे; जिथे रूढीचं वाळवंट विचारांचा निर्मळ प्रवाह ग्रासून टाकत नाही; अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात हे ईश्वरा, माझा देश जागृत होऊ दे.’  या महाकवीचे स्वातंत्र्याचे स्वप्न असे मंगल आणि उदात्त होते. त्यांनी संपूर्ण विश्वाला आपला संसार आणि सर्व मानवजातीला आपली जात मानले.
 
रवींद्रनाथ  हे केवळ कल्पनेत रमणारे कवी नव्हते, आपल्या देशातील अभावग्रस्त जनतेच्या भावनांशी ते पूर्णपणे जुळलेले होते. रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली उत्कृष्ट साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. हा मान मिळविणारे आशिया खंडातील ते पहिले साहित्यिक होत. पारितोषिकाच्या रूपाने मिळालेले सव्वा लाख रुपये त्यांनी शांतिनिकेतनला देणगी म्हणून दिले. रवींद्रनाथ मनुष्याच्या सर्वांगीण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. 

रवींद्रनाथांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली. ‘हे विश्वची माझे घर’ अशी जाणीव प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण करणे हे विश्वभारतीचे ध्येय होते. सखोल तत्त्वचिंतन, वैज्ञानिक दृष्टी, संपन्न अभिरुची, मानवतावाद या साऱ्या गोष्टी रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेल्या होत्या. या एकत्वाचा आविष्कार म्हणजेच जन-गण-मन हे त्यांचं गीत. स्वतंत्र भारताने त्याचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला. देश स्वतंत्र झालेला पाहण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले नाही. ७ ऑगस्ट १९४१ रोजी हा महाकवी अनंतात विलीन झाला. आपल्या देशाला धर्मांध राजकारणाच्या दलदलीतून बाहेर काढून जगण्याचा एक आदर्श निर्माण करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.

Web Title: artical on Gurudev rabindranath tagore united with faith his writing showing good path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.