टेकीला आलेल्या पॅलेस्टिनींना चेव चढला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 11:25 AM2023-10-10T11:25:53+5:302023-10-10T11:26:32+5:30
बलाढ्य इस्त्रायलची दादागिरी सोसणारी पॅलेस्टिनी लोकांची ही तिसरी पिढी! सामान्यांच्या सोसण्याचा अंत झाल्यावर जे होतं तेच गाझा पट्टीत झालं आहे!
निळू दामले, ज्येष्ठ पत्रकार -
सात ऑक्टोबरला गाझा पट्टीतून पाचेक हजार रॉकेटं निघाली आणि इस्रायलमध्ये कोसळली. काही शेकडा पॅलेस्टिनी कमांडो पारंपरिक (अत्याधुनिक नसलेल्या) बंदुका घेऊन इस्रायलमधे घुसले. स्थानिक पोलिस आणि सैनिक जीव घेऊन पळत सुटले, लढले नाहीत. काही डझन सैनिक आणि इस्रायली नागरिकांना या कमांडोंनी ओलिस ठेवलं. हँडग्रेनेड आणि आयईडी ओलिसांच्या अंगावर लावलेले होते, असं काही घडेल याची कल्पना कोणी स्वप्नातही केली नव्हती. इस्रायलची मोसाद आणि शिन बेट ही इंटेलिजन्स यंत्रणा जगातली सर्वात कार्यक्षम आणि जय्यत मानली जाते. तिला या महाकाय घटनेचा पत्ता लागला नाही. माणसांच्या, वाहनांच्या, विमानांच्या, तोफगोळ्यांच्या हालचाली वेळीच लक्षात घेऊन रोखण्याची यंत्रणा इस्रायलजवळ आहे. सॅटेलाइट, कॅमेरे, काय न् काय.. ही यंत्रणा रॉकेटं रोखू शकली नाही, कमांडोंना रोखू शकली नाही.
हादरलेल्या इस्रायलनं दणादण गाझावर रॉकेटं सोडायला सुरुवात केली. आजवर माणसं मारण्याचा हिशोब वेगळा होता. कारवाईत पन्नास पॅलेस्टिनी मेले तर फार तर पाच-सात इस्रायली मरत. आता मेलेल्यांची संख्या सारखीच झाल्यागत झालं. इस्रायल आता त्यांच्या जवळची सर्व संहारक शक्ती वापरून पॅलेस्टिन चिरडण्याचा प्रयत्न करेल. सुरक्षा अभ्यासकांना प्रश्न पडला की, हे हमासला कसं जमलं? इस्रायलची सुरक्षा यंत्रणा का फेल गेली?
हमासनं सहा महिने किंवा अधिक काळ या हल्ल्याचं नियोजन केलं होतं म्हणतात. हल्ला केल्यानंतर इस्रायल फार तीव्र प्रतिहल्ला करेल, गाझा पट्टी जमीनदोस्त करेल, याची कल्पना हमासला असणार. तरीही हमासनं हल्ला संघटित केला. का? गाझा आणि वेस्ट बँक दोन भागात पॅलेस्टाइन विभागलेलं आहे. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान होतं तसं. दोन्ही भागांच्या भोवती इस्रायल पसरलेलं आहे. इस्रायलनं या दोन्ही भागांना वेढा घातला आहे. पॅलेस्टिनी माणसं इस्रायली लष्कराच्या परवानगीशिवाय काहीही करू शकत नाहीत. दोन्ही भागांची अर्थव्यवस्था इस्रायलच्या मेहेरबानीवर अवलंबून असते.
पैकी वेस्ट बँकेत इस्रायल आपल्या वसाहती निर्माण करतंय. गावात पॅलेस्टिनींची वस्ती असते. इस्रायली लष्कराचे रणगाडे उगवतात. पॅलेस्टिनींना गावातून हुसकावून लावतात. गावाभोवती संरक्षक भिंत उभी राहते. बेघर झालेले पॅलेस्टिनी देशोधडीला लागतात. इस्रायली वस्ती, सेटलमेंटभोवती ते उघड्यावर जगू लागतात. सेटलमेंटमध्ये इस्त्रायली नागरिक तलावात पोहत असतात, आसपासच्या पॅलेस्टिनींना प्यायला पाणी मिळत नाही.
पूर्व जेरुसलेममध्ये, पॅलेस्टिनी-अरबांच्या घराभोवती इस्रायली गोळा होतात. पॅलेस्टिनींना सांगतात, घर सोडून जा. बाचाबाची होते. पॅलेस्टिनी बेघर होतो, घर इस्रायलीच्या मालकीचं होतं. पॅलेस्टिनी लोकांना इस्रायलनं जगणं अशक्य केलंय. जगायचं असेल तर पॅलेस्टाइन सोडून जाणं एवढाच पर्याय त्यांच्यासमोर उरतो. कुठं जाणार ही माणसं? स्थानिक लोकांना हुसकावून लावून इस्रायल स्थापन झालं आहे. इस्रायलकडं शस्त्रं आहेत, पैसा आहे, अमेरिकेचा पाठिंबा आहे. अरब देश पॅलेस्टीनला केवळ शाब्दिक पाठिंबा देतात, बाकी काहीही करत नाहीत. इस्रायल पॅलेस्टिनींना कुटतं. अरब देश पॅलेस्टिनींना शस्त्रं देत नाहीत. आज पॅलेस्टिनींची तिसरी पिढी सोसतेय. टेकीला आलेल्या पॅलेस्टिनी लोकांनी एक गावठी दहशतवाद शोधला, एक गावठी हिंसा शोधली. आत्मघातकी स्फोट किंवा परवा केला तसा हल्ला. हजारो रॉकेटं सोडली. इतकी रॉकेटं हेरण्याचं तंत्रज्ञान आयरन डोमच्या व्यवस्थेत नव्हतं. आयरन डोम गंडलं.
नेतान्याहू चवताळले. आपण एवढे हुशार आणि शस्त्रसज्ज असूनही एक किडा असलेल्या हमासनं आपल्याला शेंडी लावलीय, हे लक्षात आल्यामुळं
आता त्यांचं भान हरपलं आहे. लढाई करू आणि नागरिकांचंही कांडात काढू, अशी धमकी त्यांनी जाहीरपणे दिली आहे. पुढं काय होईल? इराण आणि लेबनॉन उघडपणे पॅलेस्टाइनच्या बाजूने आहेत. इतर कोणते देश त्यांना मदत करतील? युरोप आणि अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभे आहेत; पण लवकरच चीन, रशिया, सौदी अरेबिया, कतार, अरब अमिरातीही या ना त्या रूपात पॅलेस्टाइनला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे युनोमध्ये खटपट होईल, ठराव होईल आणि संघर्ष थांबेल; पण तोवर इस्रायलनं खूप विध्वंस माजवलेला असेल.
पॅलेस्टिनी टेकीला आहेत. ते आता मरायला तयार आहेत. गेल्याच आठवड्यात कतारमध्ये हमासच्या लोकांना एकत्र आणून कतारी मुत्सद्दी सांगत होते की तुम्ही जरा दमानं घ्या, अतिरेकी उद्योग करू नका. गेल्याच आठवड्यात नेतान्याहूना बायडन यांनी सांगितलं होतं की, पॅलेस्टिनींना काही तरी सवलती द्या, त्यांच्यासाठी काही करा. या दोन घटना एकाचवेळी गेल्या आठवड्यात घडत होत्या. अमेरिकेत आणि कतारमध्ये. डिप्लोमॅट त्यात गुंतलेले होते. सॅटेलाइट असो; गल्लीचा कोपरा असो; चहाची टपरी असो; भाजी मंडई असो; तिथल्या कॅमेऱ्यांना फक्त माणसं दिसत होती; पण या माणसांच्या मनात काय आहे, हे दिसत नव्हतं. कतारमध्ये कतारी आणि हमासचे लोक भेटून काय बोलतात, हे कॅमेऱ्यांना कळत नव्हतं. शिवाय प्रचंड माज होता. करू दे त्यांना काहीही. आम्ही चेचून काढू, असा विश्वास होता. घुसमट होती. काय व्हायचं ते होऊ दे; पण प्रत्युत्तर द्यायचं, असं पॅलेस्टिनींनी ठरवलं. सहा ते बारा महिने तयारी केली. ही तयारी मनाची होती. कॅमेऱ्यांना, कॉम्प्युटरला ती दिसली नाही. बस्स.
damlenilkanth@gmail.com