ऑस्ट्रेलियातील वणवे ही जगासाठी भयघंटा; संपूर्ण जगालाच तो एक इशारा
By विजय दर्डा | Published: January 13, 2020 03:28 AM2020-01-13T03:28:20+5:302020-01-13T03:29:01+5:30
चार महिन्यांच्या अग्निप्रलयात ५० कोटी प्राण्यांचा मृत्यू, अनेक दुर्लभ जीव विनष्ट
विजय दर्डा
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया राज्यांमध्ये सुरू असलेल्या महाभयंकर वणव्यांमध्ये गेल्या चार महिन्यांत ६३ लाख हेक्टर जंगले आणि राष्ट्रीय उद्याने जळून स्वाहा झाली आहेत. यावरून या आपत्तीची भीषणता लक्षात येते. यापूर्वी ऑस्ट्रेलियात एवढे भयंकर वणवे कधीही पेटले नव्हते. गेल्या वर्षीच्या सुरुवातीस ब्राझिलच्या अॅमेझॉन जंगलात लागलेल्या आगींनी असाच कहर केला होता. तेव्हा न्यू साऊथ वेल्समध्येही सुमारे ९ लाख हेक्टरवरील वने खाक झाली होती. त्यावेळी ती आग आटोक्यात आणता आली, पण यावेळी मात्र आगडोंब थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. जोरदार वाऱ्यांमुळे आग आणखी पसरत असल्याने, या जंगलांच्या सभोवतालच्या २६० किमी परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. एका ठिकाणची आग नियंत्रणात आणली की, दुसरीकडे नवा भडका उडत आहे.
सिडनी विद्यापीठाने वर्तविलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आताच्या अग्नितांडवात जंगले आणि राष्ट्रीय उद्यानांमधील ५० कोटींहून अधिक लहान, मोठे प्राणी प्राणास मुकले असावेत. खास ऑस्ट्रेलियाचे वैशिष्ट्य असलेल्या कोआला प्राण्याची या आगीने फार बिकट अवस्था झाली आहे. न्यू साऊथ वेल्सच्या मध्य-उत्तर भागात सर्वाधिक कोआलांचे अधिवास आहेत. खास करून फॅस्कोलार्कटिडाए या प्रजातीचे कोआला विनष्टतेच्या मार्गावर आहेत. असे दुर्लभ कोआला या आगीत कायमचे विनष्ट झाले की, त्यांच्यापैकी काही अद्याप शिल्लक आहेत, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. या प्राण्यांची चाल अत्यंत संथ असते. त्यामुळे वेगाने पसरणाºया आगीतून बचाव करणे त्यांना कठीण ठरले असू शकेल. ऑस्ट्रेलियाच्या जंगलात एकेकाळी कोआला खूप मोठ्या संख्येने होते. परंतु २०व्या शतकात दक्षिण ऑस्ट्रेलियात बहुतांश कोआलांची शिकार केली गेली. ही प्रजाती नष्ट होण्याची भीती निर्माण झाली तेव्हा त्यांना वाचविण्याचे विशेष प्रयत्न सुरू केले गेले.
ऑस्ट्रेलियाने या प्रजातीचे कोआला अनेक देशांना भेटीदाखल दिले होते. या कोआलांवर मूळ देशातच संकट आले आहे!
या वणव्यांमध्ये खूप मोठ्या संख्येने कांगारूही मरण पावले आहेत. ज्यांना संधी व वाट सापडली त्यांनी शहरांकडे धाव घेतली. परंतु शहरांमध्ये आलेले अनेक कांगारूही एवढे होरपळलेले होते की, त्यातून ते वाचणे कठीण आहेत. जंगलांच्या आसपास असलेल्या मानवी वस्त्यांनाही या वणव्यांची धग सोसावी लागली आहे. काही डझन लोकांचे आगींनी बळी घेतले आहेत. तर आणखी हजारोंनी समुद्रकिनाऱ्यांवर धाव घेऊन जीव वाचविला आहे. हजारो घरे जळून गेली आहेत. या आगींच्या दाट धुराचे लोट वाºयाने वाहत येत असल्याने तुलनेने दूर असलेल्या शहरांमध्येही नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. शेकडो किमीचे आकाश धुराने काळवंडून दिवसा रात्र होत असल्याचा अनुभव लोक घेत आहेत. राजधानीच्या कॅनबेरा शहरासही वायुप्रदूषणाचा गंभीर विळखा पडला आहे. या आगीचा प्रभाव न्यूझीलंड या शेजारी देशातही जाणवत आहे. न्यूझीलंडचे आकाश नारिंगी रंगाच्या धुराने व्यापलेले दिसते.
स्वाभाविकच असा प्रश्न पडतो की, हे वणवे कशामुळे लागले असावेत व त्यांचे स्वरूप एवढे विक्राळ कशाने झाले? खरे तर मानवी चुका किंवा निष्काळजीपणानेही अनेक वेळा आग लागत असते. बºयाच वेळा वणव्यांच्या रूपाने नैसर्गिक आपत्ती म्हणून आगीचे स्वरूप पाहायला मिळते. जंगलांतील सुकलेल्या झाडांवर व पालापाचोळ्यांवर आकाशातून वीज पडली तरी असे वणवे लागू शकतात. खूप मोठ्या भागांवर वणवे पेटू लागले की, त्यातून निघणारे धुरांचे लोट ढगांमध्ये अडकतात. त्यातून मग पुन्हा विजांचा कडकडाट होऊ शकतो. मग या विजेने पुन्हा दुसरीकडे आगीची ठिणगी पडते. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियात एकावेळी तब्बल १३० ठिकाणी वणवे पेटले होते. अशा वेळी अग्निशमन कर्मचाºयांना सर्व ठिकाणी एकदम पोहोचणे कठीण होते.
गेल्या शतकात ऑस्ट्रेलियातील सरासरी तापमानात एक अंश सेल्सियसने वाढ झाली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तेथे तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास पोहोचले होते. आग पसरलेले क्षेत्र मर्यादित असेल तर विमानांतून पाण्याचे फवारे मारून ती आटोक्यात आणणे शक्य होते. पण आगीचे क्षेत्र मोठे व तीव्रता अधिक असेल तर फवारलेले पाणी ज्वाळांपर्यंत पोहोचण्याआधीच त्याची वाफ होऊन जाते. सप्टेंबरमध्ये लागलेली आग चार महिन्यांनंतर म्हणजे जानेवारीतही आटोक्यात आलेली नाही. दक्षिण इंग्लंडएवढा भूभाग आगीने जळून गेला आहे. यावरून या संकटाची व्याप्ती लक्षात यावी. हेही लक्षात घ्यायला हवे की, हा भयावह अग्निप्रलय हा केवळ ऑस्ट्रेलियापुरता मर्यादित विषय नाही. संपूर्ण जगालाच तो एक इशारा आहे. आपण ज्या पद्धतीने जमिनी उजाड करत आहोत त्याने तापमान सतत वाढत आहे. हा भयसूचक संकेत आहे. आज हे संकट ऑस्ट्रेलियावर आले आहे. नजीकच्या भविष्यात इतर देशांनाही त्याला तोंड द्यावे लागू शकेल. निसर्गाच्या या इशाºयावरून शहाणपण शिकले नाही तर माणूस स्वत:चाच विनाश करून घेईल.
(लेखक लोकमत समूहाचे एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आहेत)