बाबासाहेब, तुमच्या स्वप्नातला भारत कधी निर्माण होईल?
By विजय दर्डा | Published: December 6, 2021 06:56 AM2021-12-06T06:56:55+5:302021-12-06T06:57:33+5:30
जो-तो बाबासाहेबांच्या नावाचा जप करतो; पण त्यांनी दाखवलेल्या मार्गाने कसे जावे हे कोणीही जाणत नाही! आपण बाबासाहेबांचे कर्ज फेडलेले नाही.
विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
स्वर्गात राहणाऱ्या देवी-देवतांना आपला जन्म भारतात का झाला नाही, असा प्रश्न पडतो, अशी या भरतभूमीची महत्ता पुराणात सांगितली आहे. या पावनभूमीवर विविध कालखंडांत अनेक महापुरुष होऊ गेले; पण मी विशेषत: दोघांचा उल्लेख करीन. एक म्हणजे महात्मा गांधी आणि दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. गांधींनी अहिंसेच्या मार्गाने देश स्वतंत्र केला. भगवान बुद्ध आणि महावीरांचे विचार त्यांनी आत्मसात केले. अहिंसा, त्याग, क्षमा, अपरिग्रहाच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाच्या जीवनाला आकार दिला. अनेक देश याच मार्गाने जाऊन स्वतंत्र झाले. स्वातंत्र्याचे महत्त्व काय असते हे ज्यांना अद्याप जाणवले नसेल, त्यांनी चीन, रशियाच्या लोकांना एकदा जाऊन विचारावे.
हे स्वातंत्र्य सामान्य माणसाच्या जीवनात प्रवाहित ठेवण्याचे खूप मोठे काम बाबासाहेबांनी केले. सामान्य माणसाला काय पाहिजे असते याचा जरा विचार करून पाहा. आपला देश स्वतंत्र असावा आणि प्रत्येक नागरिकाचे रक्षण व्हावे इतकीच त्याची इच्छा असते. आपल्याला मोकळ्या हवेत श्वास घेता यावा, निर्भरपणे जगता यावे, निर्भयतेने मनातले विचार मांडता यावेत; एवढेच त्याला वाटते. या सर्व गोष्टी त्याला राज्यघटना देते. नागरिकांच्या जगण्याचा मार्ग प्रशस्त करते आणि त्याला विकासाची दिशा देते, ती राज्यघटना! बाबासाहेबांनी अशी घटना लिहून द्वेषमुक्त समाजाच्या रचनेचा रस्ता दाखवला. जाती, धर्म, भाषेच्या नावावर कोणावर अन्याय होऊ नये असे पहिले.
माणूस मुक्तपणे स्वत:चा विकास करू शकेल, अशी जीवनशैली देशातील नागरिकांसाठी आकाराला आणण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. आज प्रश्न असा आहे की, बाबासाहेबांनी ज्या प्रकारच्या समाजरचनेची बीजे राज्यघटनेमध्येच पेरली, देशासाठी जे स्वप्न पहिले ते आजही अपुरे का आहे? याला जबाबदार कोण? - सरकार, समाज की आपली सर्व व्यवस्था? आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी देशाने पुन्हा एकवार हा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे. देशात आजही डोक्यावरून मैला वाहणाऱ्यांची संख्या ४३,७९७ असून त्यात अनुसूचित जातीचे ४२,५९४ लोक आहेत अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय, अधिकारमंत्री रामदास आठवले यांनी गेल्याच सप्ताहात राज्यसभेत दिली होती. ही प्रथा बंद होण्याच्या मार्गावर आहे, यात शंका नाही; पण एका माणसाला जरी हे काम करावे लागत असेल तरी ती शरमेची गोष्ट होय! पराजय, सामाजिक शोषण वैज्ञानिकतेवर तो कलंक आहे.
जाती व्यवस्था आहे; तोवर देशाचा समग्र विकास होणार नाही, हे बाबासाहेब जाणून होते; पण आजची स्थिती कोणापासून लपून राहिली आहे काय? आजही अत्याचाराच्या बातम्या येतात. हवेत जातीयतेचे विष आहे. राष्ट्रीय अपराध ब्युरोचे अहवाल सांगतात, दररोज देशात दलितांवर अत्याचाराच्या १२० पेक्षा अधिक घटना नोंदवल्या जातात. हे आकडे पोलिसांत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे आहेत. नोंदवले न जाणारे गुन्हे किती असतील? आजही दलितांना सवर्णांच्या विहिरीवर पाणी भरू दिले जात नाही. मंदिर प्रवेशापासून रोखले जाते. दलित समाजाचा एखादा तरुण लग्नात घोड्यावर बसला, तर त्याच्यावर हल्ल्याच्या घटनाही घडतात. ऑनर किलिंगच्या घटना दरवर्षी कितीतरी घडतात. उत्तर भारताच्या ग्रामीण भागात अजूनही जातीय आधारावर गाव वसते. दलितांची वस्ती अर्थातच गावाबाहेर असते.
प्रत्येक राजकीय पक्ष बाबासाहेबांच्या नावाचा जप करत असतो; पण त्यांनी दाखवलेल्या रस्त्याने कसे जायचे, हे कोणीच जाणत नाही. त्यांचे नाव घेऊन राजकारण करणारे अब्जोपती झाले; पण बाबासाहेबांनी ज्याच्या उद्धाराची गोष्ट केली तो माणूस अजून विकासाची वाट पाहतो आहे. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत; परंतु स्वतंत्र भारतातल्या नागरिकांना आपण समतामूलक समाजाचे अमृत पाजू शकलो नाही. बाबासाहेबांच्या नावाने आपण मोठमोठ्या संस्था स्थापन केल्या. रस्त्यांना त्यांचे नाव दिले. त्यांच्या नावे इमारती, सभागृहे बांधली, उद्याने उभारली, मूर्ती स्थापन केल्या आणि त्यांच्या ऋणातून आपण मुक्त झालो, अशी समजूत करून घेतली. हा अत्यंत चुकीचा विचार आहे. आपण बाबासाहेबांचे कर्ज मुळीच फेडलेले नाही.
बाबासाहेबांचे नाव असलेल्या सभागृहात मी जेव्हा जातो, समोर त्यांचे भव्य चित्र पाहतो, तेव्हा मला तेथे जीव घुसमटतोय असे का वाटते? इस्पितळाला बाबासाहेबांचे नाव दिले; पण तिथे लोक पुरेशा सुविधांअभावी जीव सोडताना का दिसतात? बाबासाहेबांच्या नावे उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्थांत जातो तेव्हा तिथल्या कागदांवरची शाई मला ओली का दिसते? संसदेत बाबासाहेबांच्या लेकरांचा आवाज हळू का असतो? बाबासाहेब आंबेडकर विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या विमानात बसण्याचे स्वप्न आजही धूसर का राहते? कुठली, कशा प्रकारची आणि किती उदाहरणे देऊ? या उघड्या डोळ्यांनी मी इतके काही पाहिले आहे की, त्यामुळे मनाचा कोंडमारा होतो.
शेवटी हे अवडंबर, देखावा आणि छळकपटातून सामान्य माणसाची सुटका कधी होणार? बाबासाहेब, तुमच्या स्वप्नातला भारत कधी निर्माण होईल?