वर्गात ‘स्मार्ट स्क्रीन’ नको; पाटी-पेन्सिल परत आणा! आपल्या शाळा ‘या’ शहाण्या वाटेने जाव्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:15 IST2025-03-25T11:15:03+5:302025-03-25T11:15:21+5:30

स्वीडन या प्रगत देशाने शाळेच्या वर्गातून ‘डिजिटायझेशन’ हद्दपार केलेय. आपल्या शाळांसाठी आपण काय करणार?

Article: Ban smart screens in school classrooms and give students pencils instead | वर्गात ‘स्मार्ट स्क्रीन’ नको; पाटी-पेन्सिल परत आणा! आपल्या शाळा ‘या’ शहाण्या वाटेने जाव्यात!

वर्गात ‘स्मार्ट स्क्रीन’ नको; पाटी-पेन्सिल परत आणा! आपल्या शाळा ‘या’ शहाण्या वाटेने जाव्यात!

डॉ. भूषण शुक्ल, बालमानसोपचार तज्ज्ञ

शिक्षण आणि आयुष्य यांची सांगड असणे अपेक्षित आहे. व्यावसायिक शिक्षणाचा प्रत्यक्ष आयुष्याशी संबंध टिकून आहे; पण शालेय शिक्षणाची मात्र खऱ्या आयुष्यापासून जवळजवळ पूर्णच ताटातूट झालेली आहे, याबद्दल आता कोणाच्या मनात फारशी शंका नसावी. घरापासून शाळेचे अंतर, शाळेमध्ये घालवावा लागणार वेळ, अभ्यासाचा ताण, शिक्षक व इतर लोकांकडून मिळणारी वागणूक या सर्व गोष्टी मुलांचा शालेय अनुभव चांगला की वाईट हे ठरवतात. शाळेमध्ये निदान वाईट सवयी लागू नयेत, अशी पालकांची रास्त अपेक्षा असते.

कोरोनाच्या जागतिक साथीमध्ये घडलेला एक मोठा बदल म्हणजे सर्व गोष्टींचे डिजिटायझेशन करण्याला आलेला वेग. या डिजिटायझेशनचे शालेय शिक्षणावरचे परिणाम आता स्पष्ट दिसू लागले आहेत. यात अनेक गोष्टी येतात:

१. शाळा व पालक यांच्यातील सर्व संवाद हा कोणत्या ना कोणत्या ॲपतर्फे होणे.
२. शाळेचा गृहपाठ ॲपच्या मदतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे.
३. वर्गात शिकवलेल्या गोष्टी आणि नोट्ससुद्धा त्याच ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोहोचविणे.
४. वर्गामध्ये फळ्याबरोबर मोठी स्क्रीन लावून शिक्षकांनी समजावून सांगण्याच्या गोष्टी या पॉवर पॉइंटच्या स्लाइड्स किंवा थेट शैक्षणिक व्हिडीओ याप्रकारे मुलांना दाखविणे.

या साऱ्यांमुळे मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन आणि घरी कॉम्प्युटरची अपेक्षा निर्माण झालेली आहे. प्रत्यक्ष शैक्षणिक दर्जामध्ये कोणताही सुधार झालेला नाही, उलट मुलांची शिक्षण क्षमता कमी होते आहे का? असा प्रश्न अनेक शोधनिबंधांमध्ये उपस्थित केला गेला आहे. सतत स्क्रीन वापरण्याच्या घातक परिणामांचा तपशीलही उपलब्ध आहे.

एवढे सारे असूनही जवळजवळ सर्वच विद्यार्थी शाळेनंतर खासगी शिकवणीसाठी जातात. मुलांचे खरे शिक्षण हे या शिकवण्यांमध्येच होते असा सर्व पालकांचा, मुलांचा आणि शिकवण्या घेणाऱ्या शिक्षकांचा दावा आहे. त्यात तथ्यही असावे. या शिकवण्या मात्र पूर्णपणे जुन्या पद्धतीने घेतल्या जातात. शिक्षक विद्यार्थ्यांना समोर बसवून प्रत्यक्ष शिकवतात. त्यांच्याकडून गणिते, प्रमेय सोडवून घेतात. उत्तरे लिहून घेतात. तोंडी घोकून घेतात. शिकवणीमध्ये डिजिटायझेशन जवळजवळ नसतेच. याउलट शाळेच्या निमित्ताने हातात आलेला फोन आणि कॉम्प्युटरचा उपयोग मुले सतत मनोरंजनात्मक कार्यक्रम बघणे, मित्रांशी २४ तास गप्पा मारणे, अभ्यास व शिक्षणाशी कणभरही संबंध नसलेल्या गोष्टी तासनतास बघणे यासाठी करतात.

मुलांचा वाढता स्क्रीन टाइम, त्यांचे घराशी तुटत असलेला संवाद आणि एकंदरीतच प्रत्यक्ष आयुष्याशी तुटत असलेले नाते हा आता पालकांचा काळजीचा विषय झालेला आहे. मुलाच्या हातात स्क्रीन दिला नाही तर त्याचे शाळेचे काम हे मुळीच होऊ शकत नाही, या नाईलाजाने पालकांना मुलांच्या हातात सतत स्मार्टफोन ठेवावा लागतो. मुलांचा सततचा स्क्रीन टाइम, एकमेकांना सोशल मीडियावर त्रास देणे, विकृत बोलणे-छळणे आणि एकंदरीतच शाळेचा अनुभव नासवणे यावर अनेक देशांमध्ये कमालीची काळजी व्यक्त केली जाते आहे. स्वीडन या अत्यंत प्रगत देशाने ‘आपल्याला आता डी-डिजिटायझेशन ऑफ एज्युकेशन करण्याची गरज आहे’, असा स्वच्छ पवित्रा घेतलेला आहे.

मुलांना शाळेमध्ये फोन वापरायला परवानगी नाही, अभ्यास आणि गृहपाठसुद्धा प्रत्यक्ष कागद-पेन वापरूनच पूर्ण केला जाईल, शिक्षकांचे मुलांबरोबरचे संवाद हे शिक्षणासाठी पोषक असतील. इंटरनेटचा वापर शक्य तेवढा वजा करून प्रत्यक्ष प्रयोग करणे आणि एकमेकांबरोबर शिकणे यावर भर दिला जाईल. मुलांच्या मानसिक-सामाजिक आरोग्यासाठी आणि प्रत्यक्ष शिक्षणासाठी घातक असलेली स्क्रीन निदान शिक्षणातून तरी बंद करण्याचा हा ठाम निर्णय आहे.

आपल्या देशात मात्र सरकारी, निमसरकारी आणि खासगी शाळांमध्ये पूर्ण वेगाने डिजिटायझेशन चालू आहे. प्रगत देशांमध्ये झालेले प्रयोग आणि त्याचे मुलांवर झालेले दुष्परिणाम याचा कुठलाही विचार न करता, प्रत्येक शाळा जास्तीत जास्त गोष्टी या डिजिटाइज करण्याचा प्रयत्न करते आहे.
काही बाबतीमध्ये पालकही जबाबदार आहेत. वर्गामध्ये भला मोठा स्क्रीन आणि त्यावर सतत दाखवले जाणारे व्हिडीओ यालाच उत्तम शिक्षण समजणारा पालकांचा भला मोठा दबाव गट भरमसाठ फी भरायला तयार आहे. त्यांच्या पैशासाठी शाळाही त्याच दिशेने जात आहेत. खासगी शाळांमध्ये चाललेला हा वेडेपणा सरकारी शाळांमध्येसुद्धा करणे म्हणजे सरकारी शिक्षणाचा दर्जा सुधारणे असा सरकारचा समज असावा.
पालक याबद्दल ठाम भूमिका घेण्यास तयार आहेत का? आपल्या मुलांचे खरे शिक्षण व्हावे, यासाठी थोडा त्रास सहन करायला तयार आहेत का? प्रत्येक गोष्टीसाठी ॲप आणि शाळेत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची सतत व्हॉट्सॲपवर माहिती हा दुराग्रह सोडायला तयार आहेत का? शाळेतले डिजिटायझेशन कमी करा आणि शिक्षक व मुलांचा प्रत्यक्ष संवाद वाढवा, असा आग्रह धरायला पालकसभा तयार आहेत का? 

सतत मुलांच्या भवितव्याची चिंता करणारे पालक या सकारात्मक पायऱ्या चढतील का? हट्ट धरून शाळांमध्ये हे बदल घडवून आणतील का?

Web Title: Article: Ban smart screens in school classrooms and give students pencils instead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.