भाजपाने आधी महात्मा गांधींजींची मूलतत्त्वे समजून घ्यावीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 04:30 AM2020-01-16T04:30:09+5:302020-01-16T04:30:26+5:30
देशासाठी काय चांगले आहे हे फक्त भाजपच ठरवू शकतो. या भूमिकेने संवादच संपुष्टात आला आहे.
पवन के. वर्मा
गेल्या आठवड्यात ‘अहिंसा’ या नावाची महात्मा गांधींवरील डॉक्युमेंटरी पाहण्यात आली. अनेक पुरस्कारांचे विजेते रमेश शर्मा यांची ती निर्मिती होती. ती डॉक्युमेंटरी पाहताना माझ्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ती पाहून झाल्यावर माझ्या मनात विचार आले की, एकीकडे महात्मा गांधींची १५०वी जयंती केंद्र सरकार मोठ्या धूमधडाक्यात साजरी करीत आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष त्या महात्म्याचा वारसा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे उद्ध्वस्त करीत आहे, कसा ते बघू.
महात्मा गांधींनी सर्व धर्मात सद्भाव असावा यावर भर दिला होता. धर्माधर्मांनी परस्परांचा आदर करावा, असे त्यांना वाटत होते. ते अत्यंत धर्मभीरू हिंदू होते, पण प्रत्यक्ष कृतीत त्यांनी सर्वसमावेशक भारताची कल्पना उतरविली होती. त्यांच्या संकल्पनेतील भारतात सर्व धर्मांचे लोक समत्व भावाने एकत्र नांदत असताना, भारताच्या मुख्य प्रवाहाचा भागही असतील, हा विचार होता. पण भाजपची भूमिका याच्या अगदी विरुद्ध आहे. त्यांचे नेते, प्रवक्ते आणि संबंधित संघटनांचे नेते हे सातत्याने हिंदू राष्ट्राविषयी बोलत असतात. त्यांच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्रात हिंदू हाच सार्वभौम, तर मुस्लीम अल्पसंख्यांक हे त्यांच्या दयेवर जगणारे दुय्यम नागरिक असतात.
भाजपची ही भूमिका हिंदू धर्मातील तत्त्वांच्या विरोधातच आहे. ही बाब मुद्दाम सांगावीशी वाटते, कारण महात्माजींनी सर्व धर्मातील जे जे उदात्त आहे त्यासह हिंदू धर्मातील तत्त्वातून प्रेरणा घेतली होती. उपनिषद सांगते की, एकम सत्य: विप्रा बहुधा वदन्ती, म्हणजे सत्य एकमेव आहे, पण विद्वान लोक ते निरनिराळ्या नावांनी ओळखतात. आपल्या पुराण ग्रंथातूनही आडनो भद्रा: वृत्तो यन्तु विश्वत: हाच विचार मांडला आहे. सर्व दिशांनी चांगले विचार आमच्यापर्यंत येवोत, असा त्याचा भावार्थ. आपल्या देशातील ऋषिमुनींनीही उदार चरितानाम वसुधैव कुटुंबकम्ची कल्पना मांडली होती. जे उदार हृदयी असतात त्यांच्यासाठी सारे विश्व हे कुटुंबासारखे असते. आदि शंकराचार्यांनीही सांगितले होते की, ब्रह्म हेच सत्य आहे बाकी सारे जग मिथ्या आहे.
भाजपचे नेते सातत्याने जातीय गरळ ओकत असतात. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेचे ते उदात्तीकरण करतात. भाजपकडून हिंदू धर्माची जी व्याख्या करण्यात येते तिचा महात्मा गांधींनी तिरस्कारच केला असता. सीएए आणि एनआरसी योजनेने महात्माजी स्तंभित झाले असते. कारण त्या योजनेने धार्मिक विभाजनाला एक प्रकारे मान्यताच दिली आहे आणि एका विशिष्ट धर्माला लक्ष्य केले आहे. ही गोष्ट महात्माजींनी पुरस्कारलेल्या सर्वसमावेशक दृष्टीच्या विपरीत आहे. देशाच्या फाळणीला ते आत्मसात करू शकले नव्हते. त्यांनी फाळणीचा विचार अनिच्छेने स्वीकारला होता. पण त्यांच्या कल्पनेतील भारत हे पाकिस्तानप्रमाणे धार्मिक राष्ट्र नव्हते तर सर्वधर्मीयांसाठी त्यात स्थान असेल, ही त्यांची भूमिका होती. याउलट एनआरसीमुळे समाजातील उपेक्षितांना व दुर्बल घटकांना स्वत:चे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करावे लागणार आहेत. हे करणे म्हणजे महात्माजींना नाकारण्यासारखेच आहे, कारण ते स्वत: दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी अथकपणे संघर्ष करीत आले होते. महात्मा गांधींसाठी अहिंसा परमो धर्म: हाच विचार होता.
५ जानेवारीला जेएनयूमध्ये गुंडांनी संघटितपणे विद्यार्थ्यांवर आणि अध्यापकांवर हल्ले केले. भारताच्या राजधानीत देशातील या प्रतिष्ठित विद्यापीठाच्या परिसरात गुंडांनी लाठ्याकाठ्यांसह हैदोस घातला. या गुंडांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पण हे कृत्य जेएनयूमधील डाव्या ‘राष्ट्रद्रोही’ विद्यार्थ्यांना धडा शिकविण्यासाठी उजव्या गटाच्या गुंडांनी केले, याविषयी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. पण त्याविरुद्ध पुरावे कुणी सादर करीत असेल तर मी माझ्या विचारात बदल करायला तयार आहे. या गुन्ह्याला कळत नकळत का होईना पण पोलिसांची कृतिशून्यता, तसेच जेएनयूच्या प्रशासनाची आणि सुरक्षाव्यवस्थेची अकार्यक्षमताच कारणीभूत झाली होती. गांधीजी हे लोकशाहीवादी होते. मतभेद असणे आणि निषेध करणे या गोष्टी लोकशाही परंपरेचाच भाग आहेत, यावर त्यांचा विश्वास होता. परस्पर संवादावर त्यांचा भर असायचा. पण तो करताना मतभिन्नता निर्माण झाली तर भिन्न मतांचा धिक्कार करणे त्यांना मान्य नव्हते. याउलट भाजप भिन्न मतांना नाकारतो. त्यांच्या विचारांशी सहमत न होणारे हे पाकिस्तानचे हस्तक आहेत, यावर भाजपचा विश्वास आहे.
देशासाठी काय चांगले आहे हे फक्त भाजपच ठरवू शकतो. या भूमिकेने संवादच संपुष्टात आला आहे. महात्मा गांधींचे स्मरण त्यांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने करणे हे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आवश्यक आहे. पण जाहीरपणे त्यांचा स्वीकार करणे आणि त्याच वेळी ज्या कल्पनांचा पुरस्कार ते करीत होते त्या कल्पनाच नष्ट करणे हा अत्यंत क्रूर विनोद आहे. अखंड भारत हाच महात्माजींना हवा होता. त्यात सर्व धर्माचे लोक समभावाने शांततेने नांदणार होते. त्यातूनच समृद्ध भारताची निर्मिती होणार होती, हेच त्यांचे कल्पनेतील रामराज्य होते. भाजप जोपर्यंत गांधीजींचे हे मूलभूत विचार समजून घेत नाही, तोपर्यंत त्यांची महात्माजींविषयीची कृती तोंडदेखलीच राहणार आहे.
(लेखक राजकीय विश्लेषक आहेत)