...तर भाजपा ही संधी सोडणार नाही, हे नक्की; २ मे उजाडण्याची वाट पाहावी लागेल इतकेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 07:12 AM2021-03-25T07:12:14+5:302021-03-25T07:13:49+5:30

पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’, अगदीच अनपेक्षित असा काही राजकीय अपघात घडला नाही, तर भाजप ही संधी सोडणार नाही, हे नक्की! ...फक्त २ मेची वाट पाहावी लागेल इतकेच!

Article on BJP will not miss this opportunity, Just waiting for dawn on May 2 | ...तर भाजपा ही संधी सोडणार नाही, हे नक्की; २ मे उजाडण्याची वाट पाहावी लागेल इतकेच!

...तर भाजपा ही संधी सोडणार नाही, हे नक्की; २ मे उजाडण्याची वाट पाहावी लागेल इतकेच!

googlenewsNext

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत

महाराष्ट्रात दुसऱ्यांदा ‘ऑपरेशन कमळ’साठी मैदान तयार झाले असून बाकी जय्यत तयारी चालू आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न फसला होता. तेंव्हापासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार पडेपर्यंत वाट पाहायचे भाजपने ठरवले होते. आघाडीत पुष्कळच विसंगती असल्याने हे सरकार फार टिकणार नाही असे भाजपचे गणित! वाझे प्रकरण पुढे आल्यावर भाजपला पुन्हा राज्यातील सरकार पडण्याची चिन्हे दिसू लागली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लगेच दिल्लीला धावले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घेतली. शिवसेनेशी युती करून भाजपने निवडणूक जिंकली; पण नंतर शिवसेनेने वेगळा घरोबा केल्याने भाजपला हात चोळत बसावे लागले होते. भाजपची सगळी यंत्रणा सध्या बंगालच्या लढाईत गुंतलेली आहे हे पाहून फडणवीस यांना मुंबईला परतावे लागले. ही लढाई आटपेपर्यंत आता त्यांना वाट पाहावी लागणार आहे. 
दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्था तिचे काम करीत आहे, अंमलबजावणी संचालनालय तयारीत आहे, वाझे प्रकरणात काय करता येईल याचा विचार सीबीआय करीत आहे... आता दैवाने दिलेली ही संधी वाया घालवायची नाही हे मात्र भाजपने नक्की ठरवलेले असणार! अगदीच अनपेक्षित असा काही राजकीय अपघात घडला नाही, तर भाजप ही संधी सोडणार नाही, हे नक्की! ...त्यासाठी २ मे उजाडण्याची वाट पाहावी लागेल इतकेच!

मोदी दोन हजारांची नोट मागे घेणार? 
काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी दोन हजारांची नोट रद्द करण्याचा विचार पंतप्रधानांच्या मनात घोळत असल्याच्या चर्चेला सध्या ऊत आला आहे. रिझर्व बँकेने असा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण, हा निर्णय राजकीय असतो आणि अशा संवेदनशील बाबी बँकेला सर्वांत शेवटी कळतात. मनी लाँडरिंग आणि रोकड साठेबाजीसाठी २००० रुपयांची नोट वापरली जात असल्याचा संशय पंतप्रधानांना असल्याने या नोटेची छपाई बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. इतक्यात निश्चलनीकरणाचा मार्ग न अवलंबता शांतपणे ही नोट चलनातून मागे घेण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. 

दोन हजारच्या ३३६२ दशलक्ष नोटा ३० मार्च २०१८ ला चलनात होत्या. २६ फेब्रुवारी २१ ला ही संख्या २४९९ दशलक्ष वर घसरल्याचे उघड झाले आहे. सोप्या भाषेत याचा अर्थ असा की दोन वर्षांत रिझर्व बँकेने ८६३ दशलक्ष नोटा मागे घेतल्या. टक्केवारीच्या भाषेत सांगायचे तर २०१८ साली जे प्रमाण ३७.२८ टक्के होते ते २०२१ साली १७.७८ वर आले आहे. राज्यातील निवडणुका झाल्यावर सरकार हा निर्णय घेईल काय? मोदी अपेक्षेपेक्षा लवकर हा धक्का देतील काय? - अधिकृतपणे सांगायचे तर सरकारने रिझर्व बँकेला २००० ची नोटा छापण्याची ऑर्डर देणे बंद केले आहे. २०१९-२०२० आणि २०२०-२०२१ मध्ये सरकारने २००० ची नोट छापलेली नाही, असे अधिकृत कागद सांगतात. आता  याचा अर्थ काय, हे तुमचे तुम्हीच ठरवा!

हिमंत सरमा असण्याचे महत्त्व
संघ परिवारात त्यापूर्वी कधीही घडली नसेल, अशीच ही घटना होती.  २०१५ साली काँग्रेस पक्षातून आलेल्या हिमंत सरमा या ‘बाहेरच्या’ माणसाने भाजपतील शक्तिमान अशा सरचिटणिसांची जागा घेतली. जणू हेही पुरेसे नव्हते. राम माधव हे ते सरचिटणीस. नंतर त्यांचे संघात पुनर्वसन झाले. ते संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींच्या  विदेश नीतीचे काम राम माधव हेच सांभाळत असत. नंतर ते भाजपचे सरचिटणीस झाले. ईशान्य भारत आणि जम्मू - काश्मीरचा मुद्दा असेल तर माधव यांचा शब्द अखेरचा मानला जाई. अचानक त्यांचे दिवस फिरले. आसामचे मंत्री हिमंत विश्व सरमा यांच्याशी त्यांचे वितुष्ट आले. या सरमांचे महत्त्व माधव यांना कदाचित  कळले नसावे. सरमा हे गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे. राम माधव यांना  या वितुष्टाची जास्तच किंमत मोजावी लागली. त्यांच्याकडून ईशान्येचा कार्यभार काढून घेण्यात आला, त्यांचे सरचिटणीसपदही काढून घेऊन त्यांची रवानगी संघात करण्यात आली. याआधी संघाचे अनेक प्रचारक भाजपतल्या जबाबदारीतून मुक्त झाले; पण कोणालाही पुन्हा संघात जबाबदारी मिळाली नाही. माधव यांना ती मिळाली. इतक्या मोठ्या प्रचारकाला काय काम द्यायचे, हा प्रश्न संघालाही पडला. आजही तो सतावतो आहे. 

सध्या भाजपच्या दिल्ली गोटात एक कुजबुज सतत ऐकू येत असते. राम  माधव - हेमंत सरमा प्रकरणामागे मोठे काही तरी होते, असे म्हणतात. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळाले तर सरमा आसामचे मुख्यमंत्री होतील, असे आता दिसते आहे. 
२०१५ साली राहुल गांधी यांच्याशी न पटल्याने सरमा काँग्रेसमधून भाजपत आले. ‘तुम्ही काँग्रेसमध्ये राहूनच मुख्यमंत्री व्हाल, भाजपत गेलात तर तुम्हाला ‘बाहेरचे’ म्हणूनच वागविले जाईल आणि मुख्यमंत्रीपद तुम्हाला कधीही मिळणार नाही,’ असे राहुल गांधी सरमा यांना म्हणाले होते. तरीही सरमा यांनी पक्ष सोडला. आता ते भावी मुख्यमंत्री म्हणून विंगेत वाट पाहत उभे आहेत.

 

Web Title: Article on BJP will not miss this opportunity, Just waiting for dawn on May 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.