पुस्तके छापली, तरी विकत कोण घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 05:42 AM2021-05-22T05:42:06+5:302021-05-22T05:44:23+5:30

समाजाचे चलनवलन सुरळीत चालू असेल, तरच पुस्तक-व्यवहार नीट चालतो. सध्या या व्यवसायावर कोरोनाच्या दहशतीचे मळभ दाटून आलेले आहे.

Article on Book Publication Business Affected due to Corona, Books printed, but who will buy? | पुस्तके छापली, तरी विकत कोण घेणार?

पुस्तके छापली, तरी विकत कोण घेणार?

Next

राम जगताप, संपादक, ‘अक्षरनामा ’

कोरोनाने गेल्या एक-दीड वर्षांपासून जगभर हाहाकार माजवला आहे. या ‘अभूतपूर्व ’ संकटाच्या परिणामातून. मराठी प्रकाशन व्यवसायही सुटलेला नाही. जवळपास वर्षभर हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प म्हणावा, अशा स्थितीला आलेला आहे.

या काळात मराठी पुस्तकांची विक्री ५० टक्क्यांहूनही कमी झाली. दिवाळी अंकांच्या विक्रीवर तर जवळपास ७५ टक्के परिणाम झाला. या अंकांची खरेदी-विक्री, त्यांचे वाचन आणि त्यावरील चर्चा महाराष्ट्रात जवळपास मार्च-एप्रिलपर्यंत चालू राहतात. यावेळी मात्र त्या जानेवारी पर्यंतही जाऊ शकल्या नाहीत. मराठीतल्या नियतकालिकांवर मात्र २०-२५ टक्केच परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये नियतकालिकांची छपाई, वितरण ठप्प झाले, पण या काळात अनेक नियतकालिकांनी आपापल्या अंकांच्या पीडीएफ फाईल तयार करून, त्या आपल्या वर्गणीदारांना पाठविल्या. अर्थात, त्यांना मिळणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. ज्यांची विक्री पूर्णपणे स्टॉलवरच अवलंबून आहे, त्यांना मात्र लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. नियतकालिकांसाठीची सवलत योजना रद्द करणे, अंकांच्या प्रती पाठविण्यावर मर्यादा घालणे, असे प्रकार करून टपाल सेवेने नियतकालिकांच्या अडचणी अजूनच वाढवल्या आहेत.

पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय धडपणे कॉर्पोरेट नाही, धडपणे छोटा उद्योगही नाही, शिवाय तो अक्षरजुळणीकार, कागद विक्रेते, मुद्रणालये, बाइंडर, पुस्तके विक्रेते आणि वाचक अशा अनेक घटकांवर अवलंबून आहे. गेल्या वर्षी मार्च अखेरीस सुरू झालेले लॉकडाऊन जुलै महिन्यानंतर शिथिल झाले, तोवर प्रकाशन संस्थांची कार्यालये, नव्या पुस्तकांची छपाई, पुस्तक विक्रीही बंद होती. काही प्रमाणात ऑनलाईन पुस्तक विक्री झाली. जुलै नंतर टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू झाले. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात मराठीतल्या मोठ्या प्रकाशन संस्थांनी नव्या पुस्तकांची छपाई केली असली, तरी प्रमाण बरेच कमी होते. वर्तमानपत्रांनी रविवार पुरवण्यांची पाने कमी केल्याने पुस्तकांच्या पानांना कात्री लागली. पुस्तकांच्या जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा उपयोग, ऑनलाईन विक्री असे प्रयत्न झाले असले, तरी पुस्तकांच्या विक्रीला मोठा फटका बसला.

१ ते २५ नोव्हेंबर या काळात मराठीतल्या १० आघाडीच्या प्रकाशन संस्थांनी ‘वाचन जागर महोत्सव’ महाराष्ट्र पातळीवर सुरू केला. २५० पुस्तके २५ टक्के सवलतीत देण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे २६ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान पुन्हा हा महोत्सव त्याच पद्धतीने आयोजित करण्यात आला. पुस्तकांवर ३० टक्के सवलत देण्यात आली, पण तोवर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या बातम्या येऊ लागल्याने, या योजनेला तोटाच सहन करावा लागला. गेल्या दीडेक वर्षांत प्रत्यक्ष पुस्तक विक्रीला ५० टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसला, पण ऑनलाईन विक्रीत मात्र एरवीपेक्षा या काळात २०-२५ टक्क्यांची वाढ झाली. ई-बुक्स काढलेल्या प्रकाशन संस्थांनाही १०-१५ टक्के फायदा झाला. शासनाच्या विविध पुस्तक खरेदी योजना आणि महाराष्ट्रभरातील ग्रंथालयाकडून होणारी पुस्तक खरेदी मात्र पूर्णपणे बंद आहे. या दोन्हींकडून जवळपास ३० टक्के पुस्तकांची खरेदी केली जाते. 

आपला व्यवसाय ज्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे, ते सगळेच घटक जेव्हा अडचणीत येतात आणि आपल्या ग्राहकांची आर्थिक पत खालावते, तेव्हा कुठल्याही व्यावसायिकाचा नाईलाज होतो. त्याला त्यावर मात करता येत नाही. कोरोनाच्या आपत्तीने सर्वांनाच ग्रासून टाकले आहे. प्रकाशन व्यवसाय हा बेभरवशाचाही व्यवसाय आहे. समाजाचे चलनवलन सुरळीत चालू असेल, तरच तो नीट चालतो. अस्थिर वातावरण निर्माण झाले की, प्राथमिकता बदलल्याचा फटका या व्यवसायाला बसतो. पुस्तकांचा ही ‘जीवनावश्यक’ गोष्टींमध्ये समावेश करायला हवा, अशी मागणी कितीही केली जात असली, तरी महाराष्ट्रामध्ये पुस्तके तितकीशी ‘नडीव’ गोष्टीमध्ये मोडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. - तरीही प्रकाशन व्यवसाय आणि नियतकालिकांपुढे जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला आहे, असे अजून तरी म्हणता येणार नाही. या कोरोना कहरावर आज ना उद्या मात करता येईल, या आशेवरच मराठी प्रकाशन व्यवसाय तग धरून आहे.
Jagtap.ram@gmail.com

 

Web Title: Article on Book Publication Business Affected due to Corona, Books printed, but who will buy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.