विज्ञानात चूक दुरूस्त करता येते!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 02:08 AM2019-09-14T02:08:05+5:302019-09-14T02:08:35+5:30

विज्ञानाच्या यशाची जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक हे आहे की विज्ञानामध्ये चूक दुरुस्त करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा कार्यरत असते.

Article on Mistakes can be corrected in science! | विज्ञानात चूक दुरूस्त करता येते!

विज्ञानात चूक दुरूस्त करता येते!

googlenewsNext

शिरीष मेढी

विज्ञानाद्वारेच आपण निसर्ग व निसर्गातील घटनांबाबत ज्ञान प्राप्त करू शकतो. तसेच विज्ञान आपणास योग्य विचार पद्धत कोणती आहे हे स्पष्ट करून देते. जेव्हा महत्त्वाच्या उत्पादन क्षेत्रांवर काही थोड्या देशी व परदेशी व्यक्ती वा संस्थांची मालकी प्रस्थापित होते, जेव्हा जनतेच्या नेत्यांची काय घडत आहे याचा बोध घेण्याची पात्रता नसते, जेव्हा लोकांना स्वत:साठी काय योग्य आहे हेच ठरविता येत नाही, किंवा सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे अशक्य होते, जेव्हा जनता जन्मकुंडल्यांमध्ये मग्न होते व त्यांची टीकात्मक राहण्याची क्षमता लोप पावते आणि जेव्हा ज्यामुळे समाधान प्राप्त होते व प्रत्यक्षात वास्तव काय आहे यामध्ये जनता फरक करू शकत नाही तेव्हा आपण नकळत अंधश्रद्धा व भयानक अंधार असलेल्या विश्वात सामील झालेलो असतो.

जग काय आहे हे समजून घेण्यास विज्ञान बहुतांशी यशस्वी झालेले आहे. अनेक बाबी समजून घेण्यास, सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यास विज्ञानाची प्रचंड मदत झाली आहे. काही शतकांपूर्वी स्त्रियांना जाळण्यासाठी समर्थनीय समजलेल्या घटकांबाबत जीवशास्त्र, ग्रह आणि हवामानशास्त्रातील प्रगतीमुळे आपणास योग्य ज्ञान प्राप्त झाले आहे. थॉमस अँडी नावाच्या शास्त्रज्ञाने १६५६ साली लंडन येथे प्रसिद्ध झालेल्या आपल्या ‘कँडल इन द डार्क’ या पुस्तकात लिहून ठेवले आहे की, ज्ञान प्राप्त केले नाही तर राष्ट्रे लयास जातील. टाळता येण्यासारखी दु:खे अनेकदा आपल्या मूर्खपणामुळे निर्माण होत नसतात, तर उलट आपल्या अज्ञानामुळे व विशेषत: स्वत:बद्दलच्या अज्ञानामुळे निर्माण होत असतात.

Image result for विज्ञान

विज्ञानाच्या यशाची जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक हे आहे की विज्ञानामध्ये चूक दुरुस्त करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा कार्यरत असते. जेव्हा जेव्हा आपण विज्ञानातील संकल्पनांची वा मांडणीची पडताळणी बाह्य जगातील बाबींशी जोडून करीत असतो व यासंबंधी टीकात्मक दृष्टीने विचार करतो तेव्हा आपण विज्ञानाचा वापर करीत असतो. शुद्ध गणिताचा अपवाद वगळता विज्ञानाच्या कुठल्याही शाखेबाबत आपण १०० टक्के ठाम नसतो. विज्ञानातील प्रमुख तत्त्वांपैकी एक तत्त्व असे सांगते की, ‘सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विधानांवर विश्वास ठेवू नका.’ (अपवादात्मकपणे काही वैज्ञानिक या तत्त्वाचे पालन करीत नाहीत.) अनेक सत्ताधाºयांची व नोकरशहांची अनेक विधाने खोटी ठरली आहेत.

सत्ताधाºयांनी त्यांचे म्हणणे अन्य माणसांप्रमाणे सिद्ध करणे आवश्यक आहे. पारंपरिक शहाणपण स्वीकारण्यास विज्ञान अनेकदा इच्छुक नसते़ यामुळे ज्या विचारधारा स्वत:बाबत टीकात्मक नसतात व आमचे ज्ञान हेच अंतिम ज्ञान आहे असे मानतात त्यांच्या दृष्टीने विज्ञान धोकादायक बाब आहे. काही व्यक्ती विज्ञानास एकदम शिष्ट व घमेंडखोर समजतात. विशेषत: जेव्हा अनेक पिढ्यांनी स्वीकारलेल्या एखाद्या तत्त्वास वा संकल्पनेस विज्ञानाद्वारे चुकीचे व खोटे ठरविले जाते; तेव्हा विज्ञानास खूपच गर्विष्ठ ठरविले जाते. ज्याप्रमाणे भूकंपाच्या धक्क्यामुळे पायाखालची जमीन हादरून जाते, त्याचप्रमाणे जेव्हा ज्या श्रद्धांच्या आधारावर आपण जगत असतो त्या श्रद्धांना आव्हान दिल्यानंतर आपण अतिशय त्रस्त वा निराधार होतो. तरीसुद्धा मी अतिशय मनापासून सांगतो की, विज्ञान नेहमीच नम्र राहिले आहे. वैज्ञानिक त्यांच्या गरजा वा इच्छा निसर्गावर लादत नाहीत, उलट ते नम्रपणे निसर्गातील घटक तपासण्याचे काम करतात व विज्ञानाकडे अतिशय गांभीर्याने बघतात.

Image result for विज्ञान

अनेक उत्तम उदाहरणांपैकी एकच उदाहरण आपल्या समोर ठेवत आहे. न्यूटन या महान वैज्ञानिकाने ३०० वर्षांपूर्वी गतीचे नियम व गुरुत्वाकर्षणाचा व्यस्त वर्गाचा नियम यांबाबत मांडणी केली. या नियमांचा वापर व्यवहारात अनेक उद्दिष्टांसाठी केला जातो. त्यापैकी एक उपयोग भविष्यातील ग्रहणांबाबत अचूक माहिती मिळवण्यासाठी होत असतो. याशिवाय अनेक वर्षांनंतर व शेकडो कोटी मैल अंतर पार पाडल्यानंतर पृथ्वीवरून पाठविलेले अंतराळयान अपेक्षित ग्रहाच्या कक्षेत कधी पोहोचणार आहे हे न्यूटनच्या शोधाचा उपयोग करून सांगू शकतो. आईनस्टाईन या नंतरच्या महान वैज्ञानिकाने एका विशिष्ट परिस्थितीत न्यूटनचे नियम लागू होत नाहीत हे शोधून न्यूटनच्या नियमांत सुधारणा केली. अशी विशिष्ट परिस्थिती अति अल्प प्रसंगी लक्षात घ्यावी लागते ही बाब अलाहिदा.

विज्ञानाच्या वापरामुळे अनेक वाईट परिणाम होत असतात व पर्यावरणीय विनाशसुद्धा होत असतो. परंतु यास वैज्ञानिकांना दोषी ठरविता येत नाही. समाजातील काही विभाग विज्ञानाचा दुरुपयोग स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी जाणीवपूर्वक करतात. याचा दोष विज्ञानास देणे चुकीचे आहे. विशेषत: गेल्या साठ, सत्तर वर्षांतील पर्यावरण विनाशाबाबतची माहिती वैज्ञानिकांनीच जगाला पुरविली आहे व हा विनाश रोखण्यासाठी काय केले पाहिजे हेसुद्धा स्पष्टपणे सांगितले आहे. (परंतु नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था वैज्ञानिकांच्या इशाºयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.) खोट्या विज्ञानाच्या व अंधश्रद्धेच्या आधारे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकत नाही.

(लेखक पर्यावरणतज्ज्ञ आहेत)

Web Title: Article on Mistakes can be corrected in science!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.