...तोपर्यंत कोणीही वाचवू शकणार नाही; मुंबई नावाची हत्तीण आणि आंधळे राजकारणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 01:30 AM2020-10-14T01:30:38+5:302020-10-14T06:52:13+5:30

मुंबई राजकारण्यांच्या हातून कधीच निसटली, आता तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवले तरच ती वाचू शकेल!

Article on Mumbai City Development & Town Planning | ...तोपर्यंत कोणीही वाचवू शकणार नाही; मुंबई नावाची हत्तीण आणि आंधळे राजकारणी!

...तोपर्यंत कोणीही वाचवू शकणार नाही; मुंबई नावाची हत्तीण आणि आंधळे राजकारणी!

Next

सुलक्षणा महाजन

मुंबई महानगरी अवाढव्य हत्तिणीसारखी आहे. साठ वर्षात अनेक राजकीय पक्ष, अनेक नेते सत्तेवर आले आणि गेले. सर्वांनी मुंबईच्या अंगाला हात लावून हत्तिणीचा अंदाज घ्यायचा, गोंजारण्याचा, तिला चालविण्याचा प्रयत्न केला. पण कोणालाही तिचे रंगरूप, आकार, स्वभाव समजून घेता आला नाही. दोष हत्तिणीचा नव्हता तर आंधळ्या नेत्यांचा होता आणि आहे. साठ वर्ष झाली तरी राजकारण्यांना प्रगल्भ नागर दृष्टी कमावता आलेली नाही. मुंबईला मिळालेले नेतृत्व निष्प्रभ आहे आणि नेभळटही. त्यामुळे मुंबई दिवसेंदिवस अधिकाधिक बिथरत आहे. माहुताच्या हाताबाहेर गेली आहे. गेले सात महिने मुंबई महानगरी कोरोनाच्या मगरमिठीत तडफडते आहे. कसाबसा जीव वाचवून जगते आहे. काल तर तिला जिवंत ठेवणाऱ्या वीज यंत्रणेनेच मोठा झटका दिला. गाडीतले लोक गाडीत, लिफ्टमधले लोक लिफ्टमध्ये अडकून पडले. वीज नाही म्हणजे पाणी नाही, उजेड नाही, पंखे नाहीत आणि थंडगार हवा देणारी यंत्रेही नाहीत. कोरोनाच्या दाढेमधून वाचलेली, हळूहळू पूर्वपदावर येणारी मुंबई पुन्हा कोलमडली.

Mumbai tops co-living index in India says report
Mumbai tops co-living index in India says report

मुंबईसारख्या प्रचंड हत्तिणीला काबूत ठेवणे किती अवघड आहे याची अंधुक जाणीव कालच्या प्रकाराने सत्ताधारी मंडळींना कदाचित झाली असेल. मुंबई राजकारण्यांच्या हातातून निसटली आहे. तिला कुशल, नागर विज्ञान जाणणाºया बहुविध तज्ज्ञांच्या ताब्यात दिली, देखरेखीखाली ठेवली तर कदाचित तिची देखभाल होऊन तिला वाचविता येईल. परंतु मुंबईची वाटचाल अमेरिकेतील डेटट्रॉइट शहराच्या मार्गाने आधीच सुरू झाली आहे. कोरोनामुळे तिच्या अधोगतीला वेग आला आहे आणि विजेच्या धक्क्याने तो वेग वाढण्याचीच शक्यता आहे.

मुंबई ही एक महानगरी असली तरी तिच्या अंतर्गत अनेक लहानमोठ्या व्यवस्था आहेत. त्या हळूहळू निर्माण होत होत मुंबईची जडण-घडण झाली. एका मुंबईमध्ये असंख्य नगरे सामावलेली आहेत. ती सर्व एकमेकांशी दृश्य-अदृश्य धाग्यांनी जोडलेली आहेत. त्या सर्वांच्या मधून असंख्य प्रवाह सतत वाहत असतात. पाण्याचे, विजेचे, वाहनांचे, माणसांचे आणि माहितीचेही. यापैकी एक प्रवाह खंडित झाला की इतर सर्व प्रवाह बाधित होतात. महानगरी ठप्प होते. ही महानगरी म्हणजे एक मोठी ईको सिस्टिम आहे. अनेक लहान लहान ईको सिस्टिम्स जोडल्या जाऊन बनलेली एक मोठी नागरी इकोसिस्टिम. मानवनिर्मित परिसंस्था. अशा परिसंस्था वास्तवात हत्तीसारख्या सशक्त असतात. यातील एखादी परिसंस्था झीज होऊन नष्ट झाली तर दुसरी परिसंस्था तिची जागा घेते आणि महानगरी कार्यरत राहते. दीर्घायुषी ठरते. मात्र मुंबईच्या अंतर्गत असलेली ऊर्जा आणि जगण्याची ऊर्मी तरी शाबूत आहे का अशी शंका येते. असेच चालू राहिले तर ही नागरी परिसंस्था फार काळ टिकेल असे वाटत नाही. परिसंस्था न टिकण्याची काही कारणे मला दिसतात. पहिले कारण म्हणजे मुंबईला झालेली इगोची- अहंकाराची बाधा. दुसरे कारण म्हणजे अर्थव्यवस्थेची वाताहत आणि तिसरे कारण म्हणजे मुंबईच्या घटक परिसंस्थांच्या स्वास्थ्याकडे सातत्याने झालेले अक्षम्य दुर्लक्ष.

16 Things to Know Before You Go to Mumbai

मराठी माणसाचा अवास्तव अहंकार आज मुंबईच्या अस्तित्वावर उठला आहे. मुंबईमध्ये मराठी नागरिकांची बहुसंख्या नव्हती तरी दादागिरी वाढून सत्ताही मिळाली. पण सत्ता आली तरी शहाणपण आलेले नाही. हक्क मिळाला तरी मराठी माणसांनी मुंबईला कधीच समजून घेतले नाही. मुंबईला असलेले मोक्याचे स्थान निसर्गदत्त होते. सुरक्षित स्थानाचे भांडवल होते म्हणून मुंबईचे बंदर आणि व्यापार वाढला, उद्योग वाढले. अर्थव्यवस्था अनेक दिशांनी वाढली, विविधतापूर्ण झाली. म्हणूनच मुंबई लाखों लोकांना सामावून घेऊ शकली. अनेक देश, वेश, भाषा, आशा सर्वांना सामावून घेत मुंबई बहुसांस्कृतिक झाली. ती मुंबईची खरी शक्ती होती. मुंबईला दिशा देणारे नेतृत्व परकीय असले तरी त्यांनी मुंबईचे संगोपन द्रष्टेपणे केले होते. मुंबईसह स्वतंत्र राज्य मिळाले; पण आधुनिक नागर दृष्टी लुप्त झाली. द्रष्टेपणा हरवला. समाजांचे अहंकार आणि अस्मिता मुंबईपेक्षा मोठ्या झाल्या. हळूहळू मुंबईचे आर्थिक लचके तोडून तिला अशक्त केले गेले. अस्मितांनी आर्थिक व्यवहारांवर दबाव आणावेत आणि वाकवावे ह्या प्रकारांमुळे व्यापार, उद्योग आक्रसले. उद्योग हा मुंबईचा प्राणवायु. उद्योजक त्यांचे निर्माते. मुंबईचे पालक! सामान्य कुवतीच्या अस्मितेच्या राजकारणापुढे तेही हरले. मुंबईवरचा हक्क गमावून बसले.
उद्योग आणि सामाजिक स्वास्थ्य हरवलेली मुंबई आज पर्यावरणाच्या संकटाने बेजार झाली आहे. मुंबईतील निसर्गाची, शहरी समाजाची, अर्थव्यवस्थेची इतकी मोठी लचकेतोड गेली साठ वर्ष राजकीय कारणांसाठी केली गेली आहे की आरे वसाहतीमधील वाचवलेल्या एका लहान तुकड्याने ती भरून येणारी नाही. जोपर्यंत मुंबईसारख्या शहरांच्या परिसंस्थांचे मूलभूत ज्ञान-विज्ञान आणि त्यांचे जतन करण्यासाठी लागणारी प्रगल्भ दृष्टी नसेल तोपर्यंत कोणीही मुंबईला वाचवू शकणार नाही!

(लेखिका ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ आहेत)

Web Title: Article on Mumbai City Development & Town Planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई