Omicron Variant: ‘ओमायक्रॉन’मुळे भारतात तिसरी लाट येईल? रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 08:46 AM2021-12-07T08:46:03+5:302021-12-07T08:46:38+5:30
भारतात जानेवारीनंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यास सरकारला मुलांसाठी लस आणि ज्येष्ठांसाठी बूस्टर डोसबाबत निर्णय घ्यावा लागेल.
डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ
भारताप्रमाणेच गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरली. दिवसाला साधारणपणे २०० - २५० कोरोनाबाधित रुग्णांचे निदान होत होते. मागील पंधरा - वीस दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेतील रुग्णसंख्या अचानक वाढू लागल्याचे लक्षात आले. एका दिवसाची रुग्णसंख्या २ हजार ते अडीच हजारांवर जाऊन पोहोचली. गाऊटेन प्रोव्हिनन्समधील जोहान्सबर्ग येथे रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली. मागील आठवड्यात तर एका दिवशी १० हजार रुग्णसंख्येची नोंद झाली. रुग्णसंख्या अचानक वाढू लागल्याने जीनोम सिक्वेन्सिंगवर भर देण्यात आला. दक्षिण आफ्रिकेमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगची यंत्रणा खूप मजबूत आहे. जीनोम सिक्वेन्सिंगमधून एक वेगळाच व्हेरियंट विकसित झाल्याचे लक्षात आले. याच व्हेरियंटला ओमायक्रॉन असे नाव देण्यात आले.
ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये जवळपास ५० म्युटेशन्स पाहायला मिळत आहेत. जगभरात याआधी डेल्टा व्हेरियंटने धुमाकूळ घातला होता. भारतात दुसऱ्या लाटेत अनेकांना डेल्टा व्हेरियंटची लागण झाली. दक्षिण आफ्रिकेमध्येही डेल्टामुळेच तिसरी लाट आली होती. नवा ओमायक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटची जागा घेत असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले. याआधी गाऊटेन प्रोव्हिनन्समध्ये जीनोम सिक्वेन्सिंग केल्यावर ९० टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरियंटचे निदान होत होते. सध्या केल्या जाणाऱ्या जीनोम सिक्वेन्सिंमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे निदान होत आहे.
ओमायक्रॉनमध्ये बहुतांश म्युटेशन स्पाईक प्रोटीनवर झालेले आहेत. त्याला रिसेप्टर बाइंडिंग डोमेन म्हटले जाते. लस, मोनोक्लोनल अँटीबॉडी जिथे काम करतात, तिथेच खूप म्युटेशन दिसून आली आहेत. विविध पध्दतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणांमध्ये दिसून आले की, ओमायक्रॉन व्हेरियंट सप्टेंबर - ऑक्टोबरपासून काही प्रमाणात विकसित झाला होता आणि आता त्याचा झपाट्याने प्रसार होत आहे. एचआयव्हीग्रस्त रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळून आला. तो रुग्ण एचआयव्हीसाठी योग्य उपचार घेत नसल्याने त्याची प्रतिकारशक्ती क्षीण झाली होती. प्रतिकारशक्ती क्षीण असताना कोरोना झाल्यास शरीर त्याविरोधात प्रतिकारच करु शकत नाही. त्यामुळे विषाणूला वाढण्यास बळ मिळते. विषाणूच्या वाढीबरोबरच म्युटेशन वाढत जातात. अनेक म्युटेशन एकत्र आल्यामुळे विषाणूला पोषक वातावरण निर्माण होते.
डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा ५ पट वेगाने प्रसार होत आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे एका रुग्णापासून तीन-चार जण बाधित होत असतील, तर ओमायक्रॉनचा एक रुग्ण १५ - २० जणांना बाधित करु शकतो. ओमायक्रॉन व्हेरियंट नवीन असल्याने त्यावर अनेक संशोधने सुरु आहेत. अभ्यासातून अंदाज बांधले जात आहेत. सुरुवातीला ओमायक्रॉन केवळ दक्षिण आफ्रिका आणि बोटस्वाना येथे आढळून आला होता. आता ३८हून अधिक देशांमध्ये या व्हेरियंटने हात-पाय पसरले आहेत. दोन लसी घेतल्या असतील तर युकेमध्ये आरटीपीसीआर चाचणी न करता प्रवाशांना सोडले जाते. त्यामुळे अनेक प्रवाशांच्या माध्यमातून व्हेरियंटचा प्रादुर्भाव झालेला असू शकतो. स्कॉटलंडमध्ये आढळून आलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेला प्रवास केल्याचीही नोंद नाही. याचाच अर्थ स्कॉटलंडमध्ये कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात झाली आहे. नेदरलँडमध्ये आलेल्या ६० नागरिकांची दक्षिण आफ्रिकेत केलेली चाचणी निगेटिव्ह आली होती. नेदरलँडमध्ये गेल्यावर त्यातील १० टक्के लोक पॉझिटिव्ह आढळून आले.
आता भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे. भारतातही तो डेल्टा व्हेरियंटची जागा घेऊ शकतो. आपल्याकडे जानेवारीपर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंटच्या केस वाढू शकतात. दक्षिण आफ्रिकेमध्ये दहा दिवसांपूर्वी ओमायक्रॉनचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट २.१ टक्के इतका होता. आता तो २४.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. व्हेरियंटचा किती वेगाने प्रसार होत आहे, हे यावरुन लक्षात येईल. लसीकरण मोहिमेत भारतात ८५ टक्के नागरिकांचा पहिला डोस, तर ४९ टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. हा नवा व्हेरियंट कोरोना प्रतिबंधक लसीला किती जुमानतो, यावर अभ्यास सुरु आहे. लस स्पाईक प्रोटीनविरुध्द अँटीबॉडी निर्माण करते. स्पाईक प्रोटीनमध्येच ३० म्युटेशन झाली असतील तर कदाचित लसीची परिणामकारकता काहीशी कमी होऊ शकते. त्यामुळे लसीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने लस उत्पादक कंपन्या विचार करत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत भारतात पुढील महिनाभरात लसीकरण ६० टक्क्यांपर्यंत न्यावे लागणार आहे. त्यासाठी दररोज एक ते दीड कोटी लोकांना दुसरा डोस द्यावा लागेल. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ८० टक्के आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या तातडीने वाढणे आवश्यक आहे. असे झाल्यास व्हेरियंटची बाधा झाली तरी ती सौम्य स्वरुपाची असतील. दवाखान्यांमधील रुग्णसंख्या वाढून ताण निर्माण होणार नाही. बऱ्याच पाश्चात्य देशांमध्ये बूस्टर डोसच्या दृष्टीने वेगाने निर्णय घेतले जात आहेत. भारतात बूस्टर डोसची प्रक्रिया अद्याप विचाराधीन आहे. जानेवारीनंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यास भारत सरकारलाही लहान मुलांसाठी लस आणि ज्येष्ठांसाठी बूस्टर डोस याबाबत निर्णय घ्यावा लागेल.
सध्याच्या स्थितीत शाळा सुरू करणे आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे याबाबत फेरविचार करावा लागेल. लहान मुलांचे लसीकरण, विमानतळांवर आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करणे अशी पावले उचलावी लागतील. ओमायक्रॉनबाबत अनेक बाबी अद्याप माहीत नाहीत. त्यामुळे घाबरुन न जाता भविष्यातील धोका लक्षात घेऊन तातडीने पावले उचलावी लागणार आहेत. सध्या तरी लसीकरण हा यावरचा एकमेव मार्ग आहे. त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी, बंदिस्त जागांमध्ये मास्कचा वापर ही सध्याची उत्तम थेरपी आहे.
(शब्दांकन : प्रज्ञा केळकर-सिंग)