माणूस! - ते काही चार पायांचे जनावर नव्हे!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 09:47 AM2022-09-26T09:47:14+5:302022-09-26T09:47:27+5:30
सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवाला नुकताच प्रारंभ झाला. स्वातंत्र्य-समता-बंधुता ही मूल्य असलेल्या या चळवळीचा त्या अनुषंगाने परामर्श...
बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर १८७३ रोजी सायंकाळी, दिवे लागणीच्या वेळी पूर्व पुण्यातील बाणेकरांच्या तालमीच्या दक्षिण बाजूच्या चौकात तुकाराम नाईकांचे दुमजली घरातील माडीवर (घर नं ५२७, जुनागंज, फुले पेठ) सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. महात्मा फुले यांचेसह ६० सत्यशोधक सहकारी त्यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी याच वर्षाच्या पावसाळ्यात, याच माडीवर दर रविवारी संध्याकाळी सत्यशोधकांच्या बैठका होत.
या बैठकांना महात्मा फुले, नेऊरगावकर ज्ञान हरी गिरी ऊर्फ ज्ञानगिरीबुवा, भांबुर्डेकर, कृष्णराव भालेकर, त्यांचे वडील बंधू रामचंद्र पांडुरंग भालेकर, दहिवडीकर पंडित धोंडिराम नामदेव कुंभार, रामशेठ बापूशेठ उरवणे, किन्हईकर तुकाराम हनमंत पिंजण, विठ्ठल महादेव गुठाळ, कुशाबा माळी मिस्त्री, ग्यानोबा मल्हारजी झगडे, ब्राह्मणेतर मॅट्रिक असलेले विनायकराव बाबाजी ढेंगळे, बाबाजी मनाजी ढेंगळे आदी मंडळी एकत्र येत. यावेळी वंचित, बहुजन आणि स्त्री समूहांच्या प्राचीन काळापासून हिसकावलेल्या स्वावलंबनावर आणि या घटकांवर सनातनी धर्माने लादलेल्या धार्मिक, सामाजिक बंधनांवर चर्चा होत असे. वंचित- बहुजन- स्त्री घटकांच्या उन्नतीचा मार्ग कसा शोधायचा हा या बैठकांततील मुख्य मुद्दा असे.
‘वंचित- बहुजन- स्त्री’ या घटकांवर लादलेला हा सनातनी कोट उद्ध्वस्त करण्याचे आवाहन नुकत्याच प्रकाशित झालेल्या महात्मा फुले यांच्या ‘गुलामगिरी’ ग्रंथात करण्यात आले होते. काल्पनिक सनातनी धर्माचा पाया उद्ध्वस्त करणारा हा ग्रंथ होय. सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर पक्ष हे या ग्रंथाचे अपत्य होत आणि सर्व प्रबोधनवादी संस्थांची मातृसंस्था म्हणजे सत्यशोधक समाज होय!
स्वातंत्र्य, समता, बंधुता या वैश्विक तत्त्वांचा समावेश असलेल्या सत्यशोधक चळवळीचा पाया हा आद्य सत्यशोधक तथागत गौतम बुद्धांच्या विशुद्ध समतेच्या आणि एक माणूस- एक मूल्य या तत्त्वज्ञानावर आधारलेला आहे. थॉमस पेन यांचे ‘एज ऑफ रिझन’ आणि ‘राईट्स ऑफ मॅन’ हे विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करणारे ग्रंथच या समाजाचे आधारपदर आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे क्रांतिकारी कार्य आणि अभंग या सत्यशोधक समाजासाठी मार्गदर्शक असे तत्त्वज्ञान आहे.
वंचित बहुजन आणि स्त्रियांचे हजारो वर्षांपासूनचे स्वावलंबन हिरावून घेऊन, पुरोहितशाहीने त्यांना चार पायांचे जनावर करून टाकले होते. अशा या भल्या मोठ्या वर्गाच्या स्वातंत्र्यासाठी, स्वावलंबनासाठी सत्यशोधक समाजाने प्रारंभी पुरोहितशाहीवर हल्लाबोल केला. या अज्ञानी, निरक्षर जनसमूहासाठी शिक्षण धोरणाचा एल्गार केला. त्यासाठी पदराला खार लावून, वसतिगृहांची आणि शिक्षण संस्थांची स्थापना केली. पुरोहितशाहीचा गडकिल्ला उद्ध्वस्त करण्याहेतूने ‘स्वत:चे धार्मिक विधी स्वत: करण्याचा’ क्रांतिकारी सामाजिक फॉर्म्युला समाजाने शोधून काढला. त्याबरहुकूम अनेक लग्न समाजाने लावली. पोटावर टाच येताच चिडलेल्या पुरोहितांच्या मुखंडांनी सत्यशोधकांवर दिवाणी दावे केले. या कोर्टकज्जांना सत्यशोधक पुरून उरले.
या स्वावलंबनाच्या प्रक्रियेतून ऊर्जा मिळून सत्यशोधक चळवळीने पुढे जलसा चळवळ उभी केली. या जलशांनी सत्यशोधक समाजाचे मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान अज्ञान- निरक्षर खेडूतांच्या गळी उतरविले. पुढे विसाव्या शतकाच्या दुसऱ्या- तिसऱ्या दशकात अधिवेशन चळवळीने संपूर्ण मराठी मुलुख दणाणून सोडला. प्रसंगी खंडित होऊनही या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षातही वंचित- बहुजन- स्त्री वर्गाची ही स्वावलंबनाची (मध्यस्थांवर विसंबून न राहणारी) चळवळ प्रवाहित आहे. ही स्वावलंबनाची चळवळ पुढेही प्रवाहित राहणारच आहे. सत्यशोधक समाज हा राष्ट्राचा श्वास असल्याने प्रवाहित असणे या चळवळीचा सामाजिक आणि धार्मिक राष्ट्रधर्मच आहे.
जी.ए. उगले,
सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते