...पण म्हणून असंतोष संपलेला नाही; साम्राज्याचा ‘राजा’ का धास्तावला?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 05:51 AM2022-12-04T05:51:51+5:302022-12-04T05:52:35+5:30
चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांचे निधन झाले. चीनला आर्थिक महासत्ता करणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
संजय आवटे, संपादक, लोकमत, पुणे
चीनमध्ये सध्या जिनपिंग यांच्या विरोधात जी आंदोलने उसळली आहेत, त्यामुळे १९८९च्या तिआनानमेन चौकात झालेल्या आंदोलनाच्या भयंकर आठवणी जाग्या होत आहेत. एकीकडे बर्लिनची भिंत कोसळत होती आणि त्याचवेळी चीनची भिंत आणखी पोलादी होत होती, पण या तिआनानमेन आंदोलनाचा आणि जियांग झेमिन यांचा संबंध फार जवळचा. कारण, हेच ते आंदोलन, जे चीनने चिरडून टाकले. डेंग चीनचे सर्वेसर्वा होते. या कारवाईला विरोध केला म्हणून झाओ यांना पदावरून जावे लागले. झाओ तेव्हा चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख होते. जियांग झेमिन यांना पक्षाचे प्रमुखपद मिळाले ते तेव्हा!
खरे तर, त्यांना हे पद अपघाताने मिळाले. जियांग हे तसे मितभाषी आणि ‘लो प्रोफाइल’. मात्र, बुद्धिमान आणि मुख्य म्हणजे डेंग यांचे विश्वासू असल्याने त्यांना त्या पदापर्यंत पोहोचता आले. पुढे १९९३मध्ये ते चीनचे अध्यक्षही झाले. तो काळ कठीण होता. जग बदलत होते. खुले होत होते आणि तिआनानमेन चौकात शेकडो विद्यार्थ्यांना चिरडणाऱ्या चीनची प्रतिमा ‘खलनायक’ अशी झालेली होती. सोव्हिएत रशिया कोसळल्याने चीनमधील साम्यवादी पक्ष हादरला होता. एकीकडे पोलादी पकड कायम ठेवायची आणि तरीही जगाच्या खुलेपणाला प्रतिसाद द्यायचा, अशी ही कसरत होती.
अशा निर्णायक क्षणी जियांग पक्षप्रमुख झाले होते. त्यांनी बदलणाऱ्या जगाची पावले ओळखली. जागतिक व्यापार संघटनेत चीनला प्रवेश मिळवून दिला. ग्लासनोस्त आणि प्रेरेस्त्राईका अर्थात उदारीकरण आणि फेररचना हाच तेव्हाच्या जगाचा मंत्र होता. ही भाषा जियांग यांना समजली होती. डेंग यांच्या तालमीत तयार झाल्याने त्यांना दरवाजे उघडता आले. चीन आर्थिक सत्ता व्हायला सुरुवात झाली, ती त्याच काळात. त्याच कालावधीत म्हणजे १९९६मध्ये जियांग यांनी भारतालाही भेट दिली. नव्या काळाची आव्हाने समजून घेत जियांग यांनी चीनला सज्ज केले. आज जो काही बलदंड चीन दिसतो आहे, त्याचे श्रेय जियांग यांच्या सुमारे दीड दशकाच्या कार्यकाळाला जाते. अतिशय प्रगल्भतेने त्यांनी चीनला एकविसाव्या शतकात आणून सोडले. ते गेले, तेव्हा ९६ वर्षांचे होते. या वयातही ते कार्यक्षम होते. कम्युनिस्ट पक्षात त्यांच्या शब्दाला वजन होते. जिनपिंग यांना तिसरी टर्म दिली जाऊ नये, असे त्यांनी आक्रमकपणे सांगितले होते. जिनपिंग यांनी पायउतार व्हावे, या मताचे ते होते. अर्थात, जिनपिंग यांनी जियांग अथवा हू जिंताव अशा कोणालाच जुमानले नाही, हा मुद्दा वेगळा, पण म्हणून असंतोष संपलेला नाही.
योगायोग पाहा. तिआनानमेन आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चीनची धुरा हातात घेणाऱ्या जियांग यांना निरोप देतानाही चीनमध्ये हिंसक आंदोलने उसळली आहेत! एका नेत्याच्या मृत्यूनंतर जी संतप्त गर्दी उसळली, त्यातूनच पुढे तिआनानमेन चौकातील आंदोलन प्रचंड पेटले होते. जियांग यांच्या निधनानंतर असे तर काही होणार नाही ना, अशी भीती जिनपिंग यांना असेल, तर ती अवाजवी नाही!