जुन्या जखमा उकरणे शहाणपणाचे नव्हे; सूड हा पर्याय कसा होऊ शकतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 09:35 AM2022-07-06T09:35:58+5:302022-07-06T09:36:17+5:30

अल्पसंख्यकांनी पूर्वी केलेल्या चुकांबद्दल त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार बहुसंख्यकांना आज दिला जात आहे. सूड हा पर्याय कसा होऊ शकतो?

Article on Hindu Muslim violence in india, How can revenge be an option? | जुन्या जखमा उकरणे शहाणपणाचे नव्हे; सूड हा पर्याय कसा होऊ शकतो?

जुन्या जखमा उकरणे शहाणपणाचे नव्हे; सूड हा पर्याय कसा होऊ शकतो?

Next

कपिल सिब्बल, ज्येष्ठ विधिज्ञ 
राज्यसभा खासदार

देशाचा भूतकाळ अनेक बाजूंनी पुन्हा जिवंत करता येतो. ऐतिहासिक घटना या महत्त्वाच्या असतातच, कारण त्या वर्तमानाला भूतकाळाशी जोडण्याचे काम करू शकतात. भविष्यासाठी इतिहास आपल्याला धडे देऊ शकतो. इतिहासाची पुनरावृत्तीही होऊ शकते. भूतकाळ देशाला वैभवाकडे नेण्यासाठी प्रेरणा ठरू शकतो; पण यात काळजीची गोष्ट म्हणजे भूतकाळाचे राक्षसीकरण सहज करता येते. खूप मोठ-मोठ्या चुका, हिंसक कारवायांच्या खुणा किंवा ऐतिहासिकदृष्ट्या लक्षणीय लुटमारीच्या घटना वर्तमान काळातील द्वेषपूर्ण, सुडाच्या कृत्यांना वैधता प्राप्त करून देऊ शकत नाहीत. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याचे भान जिवंत राहायला हवे असेल तर देशाने आपल्या भूतकाळाकडे अत्यंत काळजीपूर्वक, विश्लेषणात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.

१९५४ ते ७५ या काळात अमेरिकेने खुसपट काढून सुरू केलेल्या व्हिएतनाम युद्धात दोन्हीकडचे मिळून सुमारे दहा लाख सैनिक मारले गेले. शिवाय २० लाख नागरिकांना प्राण गमवावे लागले. नंतर अमेरिकेने माघार घेतली आणि सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामची स्थापना झाली. भूतकाळाच्या जखमा भरून निघाल्या. आज व्हिएतनाम अमेरिकेच्या मित्र राष्ट्रात गणला जातो. तिथले लोकमतही या बाजूचे असून भूतकाळ गाडून टाकला गेला आहे. दुसरे उदाहरण दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवटीचे देता येईल. वर्णविद्वेषासाठीच ती ओळखली जाते. नेल्सन मंडेला यांचा त्याग आणि ‘सत्य आणि समेट आयोगा’ने बजावलेली भूमिका यामुळे दक्षिण आफ्रिकेमध्ये लोकशाही आली आणि पिढ्यान्-पिढ्यांच्या जखमा भरल्या जाऊ शकल्या. दक्षिण आफ्रिका सोडून जाण्याची इच्छा नसलेले गोरेही आता कृष्णवर्णीयांबरोबर तेथे सुखाने नांदत आहेत.  भूतकाळात काय झाले यावरून दक्षिण आफ्रिकेत आता हिंसक घटना घडत नाहीत. 

इतिहासात असे अनेक दाखले आहेत. युरोप खंडातही येऊन गेलेल्या वावटळीने केलेल्या मानवी शोकांतिकेच्या जखमा ताज्या आहेत. इस्रायलनेही जर्मनी बरोबर सुखाने राहायचे ठरवले आहे. युरोपचा इतिहास हजारो वर्षांच्या संघर्षाने भरलेला आहे. अँग्लो जर्मन किंवा अँग्लो फ्रेंच संघर्षाने युरोपियन एकतेमध्ये बाधा आणलेली नाही. एक देश म्हणून या प्रांतात भारत सध्या  चुकतो आहे. भाजपच्या एका प्रवक्त्याने अलीकडेच केलेल्या विधानांवरून परिस्थिती किती नाजूक झाली आहे, शांतता राखणे किती कठीण झाले आहे ते आपण अनुभवलेच. 

देशाच्या इतिहासात २०१४ नंतर  पुनरुज्जीवनाचा कालखंड सुरू झाला आहे. जाणूनबुजून अनेक गोष्टी घडवल्या जात आहेत. नव्या व्याख्या तयार केल्या जात आहेत. अल्पसंख्यकांनी पूर्वी ज्या चुका केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार बहुसंख्यकांना आज दिला जात आहे. या सगळ्यात काहीतरी गंभीर चूक होत आहे. इतिहासातले वास्तव वर्तमानाच्या तराजूत असे तोलता येणार नाही. मध्ययुगात तलवारीची ताकद राजांना जगवत किंवा मारत असे. शौर्य आणि विरोधकांचे कोथळे काढण्याची क्षमता यावरच राजे लोक खुश असत. भाऊ भावाची निर्घृण हत्या करत असे. नैतिक मूल्यांची जाण नसलेल्या जगात रक्त पाण्यापेक्षा घट्ट असते, असे कधीच मानले गेले नाही. कारस्थाने आणि हव्यास यांनी तेव्हा सतत धुमाकूळ घातला होता. मध्ययुगातील लुटारूंनी भारतावर हल्ले केले, देवळे लुटली. ही मंदिरे संपत्ती आणि प्रतिष्ठेची  प्रतीके होती. देवळातील देवता ही राजाची शक्ती होती.  राजाचा पराभव करायचा असेल तर त्या देवतेलाही लुटले जात असे. राजा आणि देवता यांच्यातील प्रतीकात्मक नाते नष्ट केले नाही, तर विजय अपुरा मानला जायचा. दोन हिंदू राजे एकमेकांसमोर युद्धाला उभे ठाकत तेव्हाही देवळे आणि देवता यांची लूट झाल्याची असंख्य उदाहरणे इतिहासात आहेत. 

मंदिरे आणि प्रार्थना स्थळांवर हल्ले करणे हे धर्माशी संबंधित नव्हते. त्याचा संबंध संस्कृतीशी जोडला जाऊन ती नष्ट करणे महत्त्वाचे मानले जाई! मानवी जीविताला फारच कमी मूल्य होते. स्त्रियांना हे हल्लेखोर एखादा चषक जिंकून यावा तसे उचलून नेत. आजच्या काळातील मूल्यांच्या संदर्भात आपण अशा घटनांचे मूल्यमापन कसे करणार?  जर एखादा देश आज त्याच जुन्या वाटेने गेला तर तो राष्ट्रीय आपत्तीच्या संकटात सापडेल. कृष्णवर्णीयांना दिलेली अमानुष वागणूक, गुलामगिरीला दिलेली मान्यता यासंदर्भात त्याकाळी अस्तित्वात असलेल्या नैतिक मूल्यांचा विचार करायला हवा. खरेदी केले जाणारे आणि विकले जाणारे गुलाम हे श्वेतवर्णीयांनी उपभोग घ्यावयाच्या एखाद्या मालमत्तेसारखे मानले जात. अत्यंत खोलवर झालेल्या या जखमा असून आज त्याच्यातून काही लाभ मिळवावा म्हटले, तर ते अधोगतीचे कारण होणार नाही का?

ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात पारतंत्र्यातील भारतीयांना ज्या अमानुष वागणुकीला सामोरे जावे लागले त्याच्या यातना फार जुन्या नाहीत.  त्यांनी दिलेली अमानुष वागणूक, केलेली अप्रतिष्ठा यामुळे झालेल्या जखमा कधीही भरून येण्यासारख्या नाहीत तरीही आज आपण ब्रिटिशांबरोबर शांततामय परस्पर संबंध ठेवून आहोत ना? - ते तसेच असले पाहिजे! सूड हा पर्याय होऊ शकत नाही. धर्म हा माणसांना जोडणारा दुवा आहे. पण, तोच फुटीचे मोठे कारणही होऊ शकतो. धर्मगुरू जेव्हा राजकारणाचा धार्मिक व्यवसाय करतात आणि राजकारणी लोक धर्माला राजकीय व्यवसायाचे दुकान बनवतात; तेव्हा या दोघांचे मिश्रण हे लक्षावधी मोलोटोव्ह कॉकटेल्सइतके देशाला कडेलोटाकडे नेणारे घातक रसायन ठरू शकते. भूतकाळातील जखमा पुन्हा उघड्या न करता विचार करण्याची वेळ आली आहे. तसे झाले नाही तर वर्तमान विसरला जाईल आणि भूतकाळ आपल्याला नष्ट करील.

Web Title: Article on Hindu Muslim violence in india, How can revenge be an option?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.