15 सेकंदांचं आयुष्य...; एका सेकंदाचा उशीरही त्यांच्या आयुष्याचा अखेर ठरू शकतो

By मनीषा म्हात्रे | Published: November 20, 2022 12:42 PM2022-11-20T12:42:52+5:302022-11-20T12:43:49+5:30

इस्रायल अनेक गोष्टींसाठी जगात प्रसिद्ध; पण तेथे सतत होत असलेल्या रॉकेट्सच्या माऱ्यात कसे जगतात नागरिक... त्याचा ग्राउंड रिपोर्ट!

article on israel lifestyle 15 seconds of life Even a second's delay can be the end of their life | 15 सेकंदांचं आयुष्य...; एका सेकंदाचा उशीरही त्यांच्या आयुष्याचा अखेर ठरू शकतो

15 सेकंदांचं आयुष्य...; एका सेकंदाचा उशीरही त्यांच्या आयुष्याचा अखेर ठरू शकतो

googlenewsNext


एक सायरन वाजतो अन् नागरिक जिवाच्या आकांताने धावू लागतात.  हातात अवघे १५ सेकंद; एका सेकंदाचा उशीरही त्यांच्या आयुष्याचा अखेर ठरू शकतो. कुठल्या तरी सिनेमासारखे वाटले ना? पण जगाच्या एका कोपऱ्यात हजारो लोक रोज असेच मृत्यूशी संघर्ष करीत आहेत; दुसरीकडे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी याच दहशतवादी हल्ल्यांना इस्रायली फौजा कशा प्रकारे हाणून पाडण्याचा प्रयत्न करतात, हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी इस्रायल दौऱ्यादरम्यान मिळाली. इस्रायलमध्ये सत्ताबदल होत असताना इस्रायलच्या वकिलातीतर्फे काही निवडक पत्रकारांच्या शिष्टमंडळाचा ६ दिवसांचा दौरा नुकताच पार पडला. 

गाझापट्टीचे क्षेत्र अवघे ३६५ चौरस किलोमीटर. म्हणजे मुंबईपेक्षाही कमी. गेल्या काही वर्षांत गाझा आणि लेबनॉनमधील हमास आणि हिजबुल्लाह यांच्याकडून होत असलेल्या रॉकेट हल्ल्यांमुळे इस्रायली नागरिक आजही दहशतीत आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा रॉकेट प्रक्षेपित होते, तेव्हा संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजतो आणि लोक बॉम्ब शेल्टर किंवा सुरक्षित घरांकडे धावू लागतात. गाझापट्टी सीमेलगतच्या भागात राहणाऱ्या शेतकरी महिला हिला फेनोन सांगतात, ‘नऊ महिन्यांची गर्भवती असताना पहिले रॉकेट घराजवळच्या शेतात पडले. मी थोडक्यात बचावले. अनेकांसाठी ब्रेकिंग न्यूज, हेडलाइन्सही झाल्या. सगळं नाट्यमयरीत्या घडत होतं. मात्र या घटनेने माझे आयुष्य बदलले. त्यानंतर हजारो रॉकेट पडली आणि आजही पडतात. यामध्ये स्वतःचा जीव वाचवायला बॉम्ब शेल्टरपर्यंत पोहोचण्यासाठी अवघ्या १५ सेकंदांचा वेळ आमच्या हातात असतो. हा सायरन म्हणजे आमच्यासाठी मृत्यूची घंटा असल्याचे त्या नमूद करतात. 

इस्रायलने रॉकेट्स हल्ले रोखण्यासाठी आणि खाली आणण्यासाठी विकसित केलेली आयर्न डोम बॅटरी प्रभावी ठरत आहे. याचा यशाचा दर ९० टक्के आहे. मात्र, अजूनही रॉकेट हल्ल्यांबद्दल चिंचा आहे. एका अंदाजानुसार गाझामध्ये हमाससह ३० हजार, तर लेबनॉनमध्ये सव्वा लाखाहून अधिक रॉकेट आहेत. त्यांना इराणचा पाठिंबा असल्याचा इस्रायलचा दावा आहे. २४ वर्षे आयडीएफमध्ये सेवा बजावलेले निवृत्त लेफ्टनंट कर्नल तसेच आयडीएफचे माजी आंतरराष्ट्रीय प्रवक्ते जोनाथन कुर्निकॉस सांगतात, ‘डोम प्रभावी असला तरी सर्वत्र युद्ध झाल्यास पुरेशा लोखंडी घुमटाच्या बॅटऱ्या नाहीत.’ 

थेट लहान मुलांच्या पलंगाखालून भुयार
हमासकडून दारूगोळा, शस्त्र तसेच दहशतवादी पाठविण्यासाठी भुयारांचा आधार घेणे सुरू झाले. इस्रायल फौजांनी त्यांचा हा प्रयत्न कसा हाणून पाडला, हे दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या लांबीच्या भुयारात जाऊन प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. गाझापट्टी सीमेपासून इस्रायलच्या दिशेने अवघ्या ९०० मीटरवर हे भुयार होते. ५० मीटर खोली व लांबी अडीच किमी होती. ते गाझापट्टीवरील नागरी वसाहतीतून लहान मुलांच्या पलंगाखालून सुरू झाले होते. निवृत्त लेफ्टनंट कर्नल जोनाथन कुर्निकॉस यांनी भुयारी युद्धनीतीचा बीमोड केला होता. 

थोडक्यात बचावले 
घराजवळ रॉकेट पडले. त्यातून वाचलेल्या शेतकरी महिला हिला फेनोन यांनी ते रॉकेट जपून ठेवले आहे.

म्हणून भांड्यांनाही दोन बाजू 
पाण्याची समस्या असल्याने एका बाजूने भांडे खराब झाल्यास त्याचा दुसऱ्या बाजूने वापर व्हावा म्हणून त्याला दोन बाजू दिल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

येथे गायीलाही विमा -
माणसाच्या आतड्यामध्ये शिरून शरीराची अंतर्गत तपासणी करणारी कॅमेराधारक कॅप्सूल, वैमानिकांना चहूबाजूंचे चलत्चित्र देणारे हेल्मेट, पदार्थ शिळे झाल्याची वर्दी देणारा रेफ्रिजरेटर असे अनेक अभिनवतेचे आविष्कार इस्रायलच्या शिमन पेरेस शांतता व अभिनवता संग्रहालयात पाहायला मिळतात. येथील गाईही हायटेक यंत्रणांशी जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येक गाईला स्वतंत्र आरोग्य विमादेखील आहे. इस्रायलने ‘स्टार्टअप नेशन’ असा लौकिक मिळविला आहे. शेतीक्षेत्रातही वेगवेगळे, यशस्वी प्रयोग सुरू आहेत. यामध्ये भारतीय विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. 

विभागप्रमुख डॉ. मोशु त्शुआ यांनी सांगितले की, १०० लिटर समुद्राच्या पाण्यापासून ५ लिटर पिण्यायोग्य पाणी मिळविण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला जातो. त्याकरिता गच्चीवर मोठ्या टाक्या व सौरऊर्जा संग्रहण पट्ट्या लावलेल्या आहेत. याच दरम्यान वेस्टर्न वाल या धार्मिक स्थळी हात धुण्यासाठी ठेवलेल्या भांड्याला पकडण्यासाठी दोन बाजू दिसून आल्या. 

इस्रायलमध्ये नैसर्गिक जलस्रोतांचा तुटवडा आहे. त्यामुळे तेल अवीवमधील अफेका कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात ३२०० विद्यार्थ्यांच्या सहभागाने समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्याच्या प्रकल्पाला सौरऊर्जेची जोड देण्याचा प्रकल्प राबविण्यात आला आहे. 

Web Title: article on israel lifestyle 15 seconds of life Even a second's delay can be the end of their life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.