‘तुम्हाला चित्रं महत्त्वाची वाटतात, पृथ्वी नाही का?’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:26 AM2022-10-18T10:26:32+5:302022-10-18T10:26:50+5:30

खनिज तेलांच्या बेसुमार वापराबद्दल जगाला भानावर आणू इच्छिणाऱ्या पर्यावरण कार्यकर्त्यांनी व्हॅन गॉच्या चित्रावर टोमॅटो सूप फेकलं, पुढे?

article on Oil protesters appear in court after throwing soup at Van Gogh painting | ‘तुम्हाला चित्रं महत्त्वाची वाटतात, पृथ्वी नाही का?’

‘तुम्हाला चित्रं महत्त्वाची वाटतात, पृथ्वी नाही का?’

googlenewsNext

गौरी पटवर्धन
लिटिल प्लॅनेट फाउंडेशन

“जास्त महत्त्वाचं काय आहे? कला की आयुष्य? कला अन्नापेक्षा जास्त महत्त्वाची आहे का? न्यायापेक्षा जास्त महत्त्वाची आहे का? तुम्हाला एखाद्या चित्राचं रक्षण करणं जास्त महत्त्वाचं वाटतं की आपल्या पृथ्वीचं आणि माणसांचं रक्षण करणं जास्त महत्त्वाचं वाटतं? साधं जिवंत राहण्यासाठी जास्त जास्त पैसे मोजावे लागतायत आणि तो इंधन संकटाचा एक भाग आहे. लाखो कुटुंबांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठी जेवढं इंधन लागतं तेवढंही परवडत नाही. त्यांना सूपच्या डब्यातलं तयार सूप गरम करून घेणंसुद्धा परवडत नाहीये. आणि तुम्ही इथे हे काय करत बसला आहात?”

 हे असले कळीचे प्रश्न विचारणारे लोक कोण आहेत?  हे कोणी राजकीय नेते नाहीत, ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते नाहीत, लेखक अगर विचारवंतही नाहीत, तर ही ग्रेट ब्रिटनमध्ये “जस्ट स्टॉप ऑइल” नावाची चळवळ चालवणारी तरुण मुलं आहेत. या मुलांनी त्यांच्या चळवळीचा एक भाग म्हणून, आपल्या म्हणण्याकडे जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी लंडनमधील नॅशनल गॅलरीत ठेवलेल्या एका पेंटिंगवर टोमॅटो सूप फेकलं. बरं हे पेंटिंग काही साधंसुधं नव्हतं. तर ते व्हिन्सेंट व्हॅन गॉ या जगप्रसिद्ध चित्रकाराच्या ‘सनफ्लॉवर्स’ नावाच्या अजरामर चित्र-मालिकेतलं, जवळजवळ आठ कोटी डॉलर्स किमतीचं जगप्रसिद्ध चित्र होतं.

“जस्ट स्टॉप ऑइल” चळवळीच्या कार्यकर्त्या असलेल्या दोन तरुण मुली म्युझियममध्ये गेल्या आणि त्यांनी या चित्रावर टोमॅटो सूप फेकलं, इतकंच नव्हे तर त्यानंतर त्यांनी डिंकाने आपले हात शेजारच्या भिंतीला चिकटवून घेतले. शिवाय त्या  दोघीही पोलीस येऊन त्यांना अटक करण्याची वाट बघत तिथे थांबून राहिल्या. नॅशनल गॅलरीच्या व्यवस्थापनाने नंतर सांगितलं की व्हॅन गॉच्या त्या चित्राचं काही नुकसान झालेलं नाही, कारण ते चित्र फ्रेम केलेलं होतं आणि वरच्या काचेवरच फक्त डाग पडले. ते लगेच स्वच्छ करता आले, चित्र होतं त्या जागी पुन्हा लावण्यात आलं.

कदाचित चित्राचं नुकसान करणं हा त्या मुलींचा उद्देश मुळात नसेलच. त्यांना फक्त त्यांच्या मुद्द्याकडे जगाचं लक्ष वेधून घ्यायचं होतं. 
- पण त्यांचा मुद्दा काय आहे? स्वतःला अटक झाली तरी चालेल, असं वाटण्याइतका कुठला मुद्दा या मुलांना महत्त्वाचा वाटतोय? कोण आहेत ही मुलं? तर ही मुलं “जस्ट स्टॉप ऑइल” नावाची चळवळ चालवतायत. खनिज तेलांचा बेसुमार वापर, त्याने निर्माण होणारा हवामानबदलाचा प्रश्न, त्यातून निर्माण होणारा पराकोटीचा सामाजिक अन्याय याबद्दल ही मुलं प्रश्न उपस्थित करतायत. ग्रेट ब्रिटनमध्ये ही संघटना गेले दोन आठवडे शांततापूर्ण आंदोलन करत होती. मात्र ब्रिटिश सरकारने त्यांच्या म्हणण्याची कुठलीही दखल न घेतल्याने त्यांना नाईलाजाने हे कृत्य करावं लागलं, असं त्यांचं म्हणणं आहे.

ही मुलं जरी संख्येने कमी वाटत असली, तरी ती काही एकटी नाहीत. जगभरात अनेक देशात तरुण मुलं एकत्र येऊन हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ या विषयांवर आवाज उठवतायत. ग्रेटा थुनबर्ग नावाची तरुण स्वीडिश मुलगी ऑगस्ट २०१८ पासून दर शुक्रवारी शाळा बुडवून संसदेबाहेर आंदोलन करते आहे. बघता बघता तिला जगभरातील शाळकरी मुलं येऊन मिळाली आहेत. आणि आज या लहान आणि तरुण मुलांचं ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ नावाचं आंतरराष्ट्रीय आंदोलन उभं राहिलं आहे. जगभर ही मुलं त्यांच्या त्यांच्या देशाच्या सरकारांना फक्त एकच प्रश्न विचारतायत, “जागतिक हवामानबदलाची घातक प्रक्रिया थांबवण्यासाठी, निदान या संकटाचा वेग कमी होण्यासाठी तुम्ही काय करता आहात?” 

हवामान बदलाच्या विरोधात उभ्या राहात  असलेल्या जागतिक आंदोलनाला या अशा “स्ट्ंट”मुळे एक विचित्र रूप येऊ घातलं आहे, अशा कृतींमुळे विषयाचं गांभीर्य अधोरेखित होण्याऐवजी सगळा विषयच चेष्टेच्या पातळीवर घसरेल असा सूर जगभरातील काही विचारवंतांनी लावला आहे. अर्थात त्यांना हे असे प्रयत्न करणाऱ्या तरुण मुलांच्या मूळ उद्दिष्टाबाबत शंका नाहीये, त्यांचा विरोध आहे तो कृती कोणत्या दिशेने असावी याला! पण पर्यावरणासाठी झगडणारे तरुण कार्यकर्ते म्हणतात, जगाला जरा स्टंटची भाषाच कळत असेल, तर आम्हीही तिचा वापर करू ! 

आम्ही जेव्हा मोठे होऊ त्यावेळी ही पृथ्वी आम्हाला, आमच्या पुढल्या पिढ्यांना जगण्यासाठी योग्य अवस्थेत असेल का? यापुढल्या प्रत्येक पिढीला फक्त जिवंत राहण्यासाठीच सगळा संघर्ष करावा लागणार असेल तर आम्ही इतर कुठलंही शिक्षण घेऊन काय उपयोग होणार आहे? पृथ्वीवर माणूस जगू शकला पाहिजे आणि त्याबरोबर इतर जीवसृष्टीसुद्धा जगली पाहिजे यापेक्षा मोठा कुठला विषय असू शकतो? कुठलीही अर्थव्यवस्था, व्यवसाय, पैसे, नफा-तोटा, विचारसरणी हे माणसांच्या जिवापेक्षा मोठं आहे का?” - ही मुलं थेट प्रश्न विचारतायत. त्यांचा आवाज दिवसेंदिवस मोठा होतोय आणि हवामानबदलाचा प्रश्न जटिल होत चालला आहे. जागतिक नेतृत्व या मुलांकडे अजून किती दिवस दुर्लक्ष करू शकणार आहे? व्हिन्सेंट व्हॅनच्या अजरामर चित्रावर सूप फेकणाऱ्या मुलींनी जगाला विचारलेला प्रश्न  फार थेट आहे, “तुम्हाला चित्रं महत्त्वाची वाटतात, पृथ्वी नाही का?”

Web Title: article on Oil protesters appear in court after throwing soup at Van Gogh painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthपृथ्वी