संवादाच्या माध्यमातून सदुपयोग! जुड़ जाता है देश सारा, जब-जब होती ‘मन की बात’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 09:54 AM2023-05-01T09:54:04+5:302023-05-01T09:55:24+5:30

नेतृत्व आणि जनता यामध्ये नेहमीच एक अंतर असते, ते पार करण्याचे काम ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी केले आहे!

Article on PM Narendra Modi Man ki Baat Programme | संवादाच्या माध्यमातून सदुपयोग! जुड़ जाता है देश सारा, जब-जब होती ‘मन की बात’ 

संवादाच्या माध्यमातून सदुपयोग! जुड़ जाता है देश सारा, जब-जब होती ‘मन की बात’ 

googlenewsNext

प्रसून जोशी, कवी आणि गीतकार

गेल्या काही वर्षांत देशाने अभूतपूर्व बदल पाहिले आहेत आणि या बदलांचे मूळ आहे मातीमध्ये उतरून अथक कष्ट करण्याची आणि कर्म करण्याची भावना. जमा केलेल्या एकेका काडीमधून घरटे तयार होताना दिसते आहे, योजना फायलींमध्येच गुदमरून मान टाकत नाहीत तर त्या परिश्रमाच्या मार्गावर चालताना नव्हे तर धावताना दिसतात. 

चरैवेति - चरैवेति या सिद्धांतावर भारताचा विश्वास आहे. मात्र, अनेकदा मोठमोठी उद्दिष्टे इतकी महाकाय आणि विशाल दिसतात, की ती आपल्या आवाक्यात येणे शक्य नाही, अशी भावना देशभर बळावते. एक प्रकारची असहाय्यता आणि त्यामागोमाग निराशेचा खेळ सुरू होतो. “इथे काहीच बदलू शकत नाही” ही भावना संपूर्ण देशाच्या मानसिकतेचा एक भाग बनू लागते. दुर्दैवाने आपला देशदेखील याच मानसिकतेने ग्रस्त होऊ लागला होता. अशा मानसिकतेवर मुळापासून घाव घातला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. भारताला एका उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पुढे जायचे असेल तर या मानसिकतेमधून मुक्ती  मिळवणे गरजेचे आहे, हे त्यांनी जाणले. नेतृत्व कितीही उर्जावान असू दे, ती उर्जा लोकांनी प्राप्त केली पाहिजे, ते तेज मिळवले पाहिजे. ‘राजा कोणी का असेना, आमचे काय जाते’ या मानसिकतेमधून बाहेर पडून देशाचा विचार केला पाहिजे आणि देशाच्या नवनिर्माणाच्या प्रवासात एका समूहाच्या भावनेने भागीदार बनले पाहिजे. पंतप्रधानांनी गांभीर्याने हे आव्हान स्वीकारले आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये जनतेला सहभागी करण्याच्या मार्गावर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आकाशवाणी या माध्यमाची निवड केली.

रेडिओ हे संवादाचे एक अद्वितीय माध्यम आहे. आपल्या देशामध्ये युगानुयुगे श्रवणाची म्हणजे ऐकण्याची परंपरा आहे. जिथे शब्दाचे महत्त्व अध्यात्माशी आहे, जिथे चेतनच नव्हे तर अवचेतन  आणि अतिचेतनदेखील ऐकू शकतात.  पंतप्रधानांनी हे सामर्थ्य  अचूक ओळखले आणि त्याचा सुयोग्य वापर केला. कोट्यवधी भारतीयांनी पंतप्रधानांसोबत थेट संपर्काचा अनुभव घेतला. नेतृत्व आणि जनता यामध्ये नेहमीच एक अंतर असते ते पार करण्याचे काम ‘मन की बात’ने केले.

देशाचे नेतृत्व नागरिकांच्या विचारांना इतके महत्त्व देत आहे, लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या विषयांवर  चर्चा करत आहे, हे याआधी कधी नागरिकांनी अनुभवलेले नव्हते. ‘मन की बात’ हा देशाला दिशा देण्याबरोबरच लोकांसोबत संवाद साधणारा एक अतुलनीय कार्यक्रम आहे.  ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाने अनेक विषयांवर चर्चा केली आहे, संस्कृती, कला, परीक्षा, जलसंरक्षण, वनसंरक्षण, नैसर्गिक शेती, स्वच्छता, फिट इंडिया, खादीचे पुनरुज्जीवन इत्यादी. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आपल्या मातृभाषेच्या सन्मानाचा संदेश दिला, ‘वोकल फॉर लोकल’चा आग्रह धरला आणि मातीच्या पणत्या पेटवून रोजगार वाढवण्याचे मार्गदर्शन केले.

अगदी भारतीय खेळण्यांबाबतही चर्चा केली.  साध्या सोप्या भाषेत देशाशी संबंधित अनेक विषय सर्वसामान्य लोकांसमोर मांडल्यामुळे अंतर कमी झाले आणि लोकांमध्ये कर्तव्याची भावना जागृत झाली.  ‘बेटी पढ़ाओ’ हे केवळ एक घोषवाक्य बनून राहिले नाही, तर एका संकल्पामध्ये ते परिवर्तित होऊ लागले. पर्यावरण आणि  हवामान बदलासारखे विषय सर्वसामान्य लोकांना समजू लागले, हे विषय आपल्या जीवनाशी संबंधित असल्याची जाणीव होऊ लागली. जी-२० सारख्या कार्यक्रमासोबत जनता जोडली जाणे आणि देशाच्या बहुमानाची जाणीव सर्वसामान्यांना होणे हे अभूतपूर्व आहे. कोविड काळातदेखील ‘मन की बात’ कार्यक्रमाने महत्त्वाची भूमिका बजावली आणि १३० कोटी भारतीयांना एकजुटीने ही लढाई लढण्याची प्रेरणा दिली.

राष्ट्रउभारणीमध्ये आपले योगदान देत असलेल्या देशवासीयांचा परिचयही पंतप्रधानांनी या कार्यक्रमात करून दिला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या कार्यक्रमाने देशाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष एका सुत्रात गुंफण्याचे काम केले आहे. संवादाच्या माध्यमाच्या सदुपयोगाचे एक विलक्षण उदाहरण म्हणून ‘मन की बात’ कायमच सर्वांसमोर राहील.  

मन से हो कर अंतर्मन तक, गुँजे जब सच्चा संवाद 
जुड़ जाता है देश ये सारा जब-जब होती मन की बात..

Web Title: Article on PM Narendra Modi Man ki Baat Programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.