तीन ते चार सिगारेट तुम्ही रोज ओढताय; वेळीच यावर योग्य नियंत्रण मिळवणं आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 05:30 IST2025-02-10T05:29:33+5:302025-02-10T05:30:00+5:30

दररोज तीन ते चार सिगारेट ओढण्यासारखाच दुष्परिणाम या धूलिकणांमुळे आपल्या शरीरावर होऊ शकतो व आपले आयुष्यमान कमी होऊ शकते.

Article on pollution in mumbai city can shorten your life expectancy. | तीन ते चार सिगारेट तुम्ही रोज ओढताय; वेळीच यावर योग्य नियंत्रण मिळवणं आवश्यक

तीन ते चार सिगारेट तुम्ही रोज ओढताय; वेळीच यावर योग्य नियंत्रण मिळवणं आवश्यक

डॉ. अविनाश फडके 
प्रख्यात मायक्रोबायोलॉजिस्ट 

सध्या हवेचे प्रदूषण हा एक चर्चेचा विषय झाला आहे. ज्यांना दम्याचा विकार वा फुप्फुसाचे आजार आहेत त्यांना या प्रदूषणाचा त्रास जास्त जाणवतो. लहान मुलांमध्ये सतत घशाचा त्रास होणे, सर्दी, खोकला होणे व दम्याचे प्रमाण आता वाढत चालले आणि त्यामुळे नेब्युलायझर वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे.
सध्या मुंबई व उपनगरांत प्रदूषणाचे प्रमाण ज्याला आपण (एक्यूआय-एअर क्वालिटी इंडेक्स) किंवा हवेची गुणवत्ता मोजण्याचे प्रमाण म्हणतो, ते एक्यूआय १५०-२०० यामध्ये आढळून येते. एक्यूआय १५० ते २०० इतका असणे हे रेड झोनमध्ये येते. २०० च्या वरती ते पर्पल झोनमध्ये म्हणजे धोकादायक समजले जाते. अनेक वेळेला मुंबईमध्ये एक्यूआय २०० पेक्षा जास्त म्हणजे धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. 

एक्यूआय मोजताना हवेतील ओझोनचे प्रमाण, धूलिकणांचे प्रमाण, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड व नायट्रोजन डाय-ऑक्साइडचे प्रमाण असे अनेक मापदंड वापरले जातात. एक्यूआय वाढण्याची मुख्य कारणे म्हणजे बांधकामाचे वाढते प्रमाण, वाहनांमधून होणारे प्रदूषण, हवेतील वाऱ्याचे व आर्द्रतेचे प्रमाण, कचरा जाळण्याचे प्रमाण आणि विविध कारखान्यांतून हवेत जाणारे दूषित वायू! या सर्वांवर योग्य नियंत्रण आवश्यक झाले आहे .

पार्टिकल साइज (धुळीचा कण) दहा मायक्रॉनच्या वर असेल तर सहसा तो आपल्या फुप्फुसांमध्ये जात नाही. दहा मायक्रॉनपेक्षा लहान धूलिकण आपल्याला घशाचा त्रास, खोकला येणे असा त्रास देऊ शकतात; पण सगळ्यात धोकादायक २.५ मायक्रॉनच्या आकारापेक्षा कमी असणारे धूलिकण आहेत. हे धूलिकण आपल्या फुप्फुसांमध्ये सहजपणे जाऊ शकतात व रक्तांपर्यंतसुद्धा पोहोचू शकतात. त्यामुळे दमा, फुप्फुसाचे आजार, हृदयविकार आणि कॅन्सर असे विविध दुष्परिणाम होऊ शकतात.

दररोज तीन ते चार सिगारेट ओढण्यासारखाच दुष्परिणाम या धूलिकणांमुळे आपल्या शरीरावर होऊ शकतो व आपले आयुष्यमान कमी होऊ शकते. काही धूलिकण ज्यांना बॅक्टेरिया, फंगस किंवा इतर जीवित जंतू चिकटले असतील तर हे सजीव धूलिकण न्यूमोनियासारखा आजार पसरवू शकतात. रस्त्यावरचे मलमूत्र, दूषित पाणी किंवा ओला कचरा यामुळे या सजीव धूलिकणांचे प्रमाण वाढते. यामध्ये चीनमधील बीजिंग शहराचे उदाहरण आपल्याला शिकण्यासारखे आहे. त्यांनी २००० सालामध्ये अत्यंत दूषित झालेल्या हवामानावर परिणामकारक उपाय शोधायला सुरुवात केली. कोळसा जाळणे कमी करणे, दूषित वायू तयार करणारे कारखाने बंद करणे व वाहनांची संख्या कमी करणे असे उपाय त्यांनी दहा ते पंधरा वर्षे राबवले. आता तेथील प्रदूषण ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. सर्व नागरिकांचा, उद्योजकांचा, बांधकाम करणाऱ्या बिल्डरचा, वाहने निर्माण करणाऱ्या कारखान्यांचा सहयोग त्यात असणे आवश्यक आहे. 

Web Title: Article on pollution in mumbai city can shorten your life expectancy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.