मंत्रालयातल्या त्रिमूर्तीजवळ एक महायज्ञ करून टाका..! 

By अतुल कुलकर्णी | Published: December 4, 2022 09:19 AM2022-12-04T09:19:30+5:302022-12-04T09:21:41+5:30

सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये जाणाऱ्या गोरगरिबांना उपचार मिळाले नाहीत किंवा औषधे मिळाली नाहीत म्हणून ते कुठल्याही पेपरवाल्याकडे, चॅनलवाल्याकडे जाणार नाहीत.

Article on Public health department working and Minister Tanaji Sawant | मंत्रालयातल्या त्रिमूर्तीजवळ एक महायज्ञ करून टाका..! 

मंत्रालयातल्या त्रिमूर्तीजवळ एक महायज्ञ करून टाका..! 

Next

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

प्रिय तानाजी सावंत
नमस्कार 
आपण राज्याचे आरोग्यमंत्री झालात. राज्याचं आरोग्य आपल्या हाती आहे. आपण त्यासाठी भारीतली भारी औषधं विकत घेऊन आरोग्य नीट राखण्याचा प्रयत्न करत आहात. आपल्या औषध खरेदीला उदंड यश मिळो, ही सगळ्यात आधी सदिच्छा. कोरोना गेल्यानंतर त्याच्यापाठोपाठ गोवरची साथ आली आहे. असल्या साथी येत असतात. त्याकडे फार लक्ष देऊ नका. वेळच्या वेळी लस घ्यायला पालकांना कोणी अडवलं होतं..? स्वतः लस घ्यायची नाही आणि पोरा बाळांना गोवर झाला की सरकारच्या नावाने बोटं मोडायची... हे बरोबर नाही. हे त्यांना खडसावून सांगा. उगाच आपण जे मिशन हाती घेतलं आहे, त्यात अशा गोष्टींनी अडथळा आणू देऊ नका.

आपण त्या तुकाराम मुंढे यांची बदली घडवून आणली अशी चर्चा आहे. अशा चर्चांकडे लक्ष देऊ नका. ते उगाच नियमावर बोट ठेवून काम करायचे. सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांच्या ‘आरोग्यम् धनसंपदा’ची काळजी करत काम करणारा अधिकारी आपल्याला पाहिजे. त्यामुळे त्यांची बदली झाली (की केली) ते बरं झालं. आपण आपलं काम करायचं. सार्वजनिक आरोग्य विभागातील दोन माजी अधिकाऱ्यांनी, आपल्या पीएसच्या सोबत राहून त्यांची बदली घडवून आणली, अशी देखील मंत्रालयात दबक्या आवाजात चर्चा आहे. अशा चर्चा होत असतात. आपले मिशन महत्त्वाचे..! जे कोणी माजी अधिकारी आपल्या खासगी सचिवांना मदत करत असतील, त्यांच्याकडून अखंड मदत घ्या. ‘आरोग्यम् धनसंपदा’चा मूलमंत्र त्यांना माहिती आहे. त्यातच काहींनी पीएच.डी. केली आहे. आरोग्य विभागात कोणाला, कुठे, कसे दाबायचे..? ते त्यांना चांगलेच माहिती आहे. त्यातल्या काहींनी ‘मला काही दिवस काम करू द्या, मी लगेच राजीनामा देतो’, अशी विनवणी करत आजवर अनेक सचिवांना गंडवल्याचं आपल्याला सांगितलं जाईल, मात्र अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका. 

त्यातल्याच काहींचा आरोग्य विभागातील औषध खरेदी घोटाळ्यात हात असल्याची चर्चा आहे. अशा चर्चा होत असतात. विनाकारण आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका. त्यांचा अनुभव दांडगा आहे. आजपर्यंत अनेक आरोग्यमंत्री आले आणि गेले. ते सगळे मंत्री अडचणीत आले पण हे अधिकारी कधीही अडचणीत आले नाहीत. त्यातल्या काही अधिकाऱ्यांना कोणीही हात लावू शकले नाही. त्यांचं हे मेरीट लक्षात घ्या. त्यातले काही जण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वकील एक दिवस उभं राहण्यासाठी किती पैसे घेतात, हे सगळ्यांना माहिती आहे. तो खर्च कोण भागवतो?, असे प्रश्न त्यांना विचारून उगाच खजील करू नका. 

तुमच्याकडे आता अनेक तक्रारी येतील. राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये अनेक ठिकाणी औषध ठेवायला साधे फ्रीज नाहीत... डॉक्टर गावात थांबत नाहीत... खासगी प्रॅक्टिस करतात... निष्कारण औषधांची खरेदी करतात... अशा तक्रारींकडे लक्ष देऊ नका. 
परवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई उस्मानाबादला एका आरोग्य केंद्रात गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना साधी कॅल्शियमची गोळी मिळाली नाही, म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्या जर आधीच सांगून तिथं गेल्या असत्या तर, आपल्या कार्यक्षम अधिकाऱ्यांनी त्यांना पाहिजे तेवढ्या गोळ्या दिल्या असत्या. मुळातच केंद्रीय मंत्र्यांनी असं रांगेत उभे राहून गोळ्या कशाला घ्यायच्या..? त्यांनी फोन केला असता तर आपल्या अधिकाऱ्यांनी त्यांना जिथे हव्या तिथे गोळ्या नेऊन दिल्या असत्या. तेव्हा अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका..! आपले अधिकारी चांगलं काम करत आहेत. त्यांना मेमो देऊ नका. उलट ज्या अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना कॅल्शियमची गोळी दिली नाही, त्यांचा मंत्रालयात बोलावून सत्कार करा. असा बाणेदारपणा सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये आला पाहिजे, असं त्यांना सांगा. 

सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये जाणाऱ्या गोरगरिबांना उपचार मिळाले नाहीत किंवा औषधे मिळाली नाहीत म्हणून ते कुठल्याही पेपरवाल्याकडे, चॅनलवाल्याकडे जाणार नाहीत. त्यांच्यात तेवढी हिंमत नाही आणि त्यांचं कोणी ऐकणारही नाही..! त्यामुळे तुम्ही बिनधास्त काम करा. आपल्या अधिकाऱ्यांनाही बिनधास्त काम करायला सांगा. 

जाता जाता एक सल्ला. गेल्या काही वर्षांत जे नेते आरोग्यमंत्री झाले, त्यांचं राजकीय करिअर पुढे फार चाललं नाही, अशी एक आख्यायिका आहे. भाई सावंत, पुष्पाताई हिरे, दौलतराव आहेर, विमल मुंदडा, सुरेश शेट्टी, दीपक सावंत अशी काही नावं तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितली जातील. गोरगरिबांचा तळतळाट लागतो, असंही सांगितलं जाईल...! त्याकडे लक्ष देऊ नका. वाटल्यास एक मोठा महायज्ञ मंत्रालयातल्या त्रिमूर्तीजवळ घालून टाका..! म्हणजे इडा पिडा टळेल आणि आपल्याला जोमात काम करता येईल. औरंगाबाद उच्च न्यायालयात औषध खरेदी घोटाळ्याची जनहित याचिका सुरू आहे. उच्च न्यायालयानं बरीच कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. वेळ मिळाला तर त्याचाही थोडा अभ्यास करता आला तर बघा, कामी येईल. ऑल द बेस्ट. 

- तुमचाच, बाबूराव
 

 

Web Title: Article on Public health department working and Minister Tanaji Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.