आज जेल... कल बेल... फिर वही खेल...!
By अतुल कुलकर्णी | Published: August 25, 2024 06:36 AM2024-08-25T06:36:59+5:302024-08-25T06:37:18+5:30
“आज जेल... कल बेल... फिर वही खेल...” तुम्हाला पुन्हा हाच खेळ नको असेल तर आजूबाजूला जे चालू आहे ते बघा आणि थंड बसा...
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई|
पालकांनो, हल्ली सरकारकडून तुमच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. सगळ्या गोष्टी सरकारनेच कराव्यात... तुम्हाला सगळ्या सोयी-सुविधा मोफत मिळाव्यात... अशी अपेक्षा कशी करता? तशी ती असेलच तर काही गोष्टींत लक्ष द्यायला सरकारला वेळ मिळाला नाही, म्हणून उगाच आरडाओरड करू नका. आपले नेते किती सहनशील आणि हळव्या मनाचे आहेत हे तुमच्या लक्षातच येत नाही. “तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे...” असे एका नेत्याने महिला पत्रकाराला काळजीपोटी विचारणेदेखील हल्ली कोणाला सहन होत नाही. त्या नेत्यांनी काय करणे अपेक्षित होते..? त्याच्यावरच सगळ्यांनी आगपाखड केल्यामुळे ‘मी असे बोललोच नाही,’ असे त्या बिचाऱ्याला सांगावे लागले... अशा नेत्यांमुळेच पोलिसांना काळजीपूर्वक गुन्हा दाखल करून घेण्यासाठी दहा-बारा तास लागतात...
ज्या मुलीवर अत्याचार झाला, तिचे पालक मेडिकल रिपोर्ट घेऊन शाळेत गेले, तर तिथल्या मुख्याध्यापिकेने, त्या जखमा सायकल चालविल्यामुळे झाल्या असतील, असे उत्तर दिले... त्यात काय चुकले..? तुमच्या मुलांना शिकवायचे.. त्यांच्यावर लक्ष ठेवायचे आणि तुम्ही कशाही तक्रारी घेऊन गेलात, तर तुम्हाला हवे ते उत्तरही द्यायचे... शाळेकडून तुम्ही आणखी किती अपेक्षा करणार..? त्यांना तुमच्या पोराबाळांपेक्षा स्वत:ची प्रतिमा जास्त महत्त्वाची आहे हे कळत नाही का तुम्हाला..?
पोलिसात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलीच्या गरोदर आईला पोलिसांनी दहा-बारा तास बसवून ठेवले. १२ तासांनंतर गुन्हा दाखल करून घेतला. त्यावरूनही तुम्ही आरडाओरड करता... पोलिसांनी धमकावल्याचा, छळ केल्याचा आरोप करता... पोलिसांनी तरी काय काय करायचे..? संस्थाचालक सांगतात, “लक्ष देऊ नका... पालकांना फार महत्त्व देऊ नका...” नेते सांगतात, “तक्रार दाखल करून घेऊ नका...” अशा वेळी पोलिसांनी तरी काय करायचे..? त्यांनाही त्यांच्या खुर्च्या सांभाळायच्या आहेत... मिळणाऱ्या वरकमाईत त्यांच्या पोराबाळांना भारी शाळेत पाठवायचे असते...
तुम्हाला तुमचेच दुःख मोठे वाटते, पण संस्था चालकांना शाळा कशी चालवायची? त्यातून नफा कसा कमवायचा? सरकारच्या ढीगभर योजनांची पूर्तता कशी करायची? याची केवढी काळजी पडलेली असते... शिवाय गावातला प्रमुख नेता वर्षाला दहा-पाच ॲडमिशन करून घेतो. त्याला नाही म्हणता येत नाही, तो शाळेच्या दहा चुकांकडे दुर्लक्ष करतो... त्याची पोहोच वरपर्यंत असते.. त्याने सांगितलेलेही ऐकावे लागते. पोलिसही अनेकदा शाळेत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर, संस्था चालकांच्या मनमानीवर पांघरून घालतात. त्यामुळे अशा पोलिसांचेही ऐकावे लागते... पोलिसांनी काही चुकीचे केले, तर नेते त्यांना पाठीशी घालतात... त्यामुळे पोलिसांना नेत्यांचे ऐकावे लागते... नेत्यांच्या जिवावर मंत्री होता येते, म्हणून मंत्री अशा नेत्यांकडे दुर्लक्ष करतात... या सगळ्या एकात एक अडकलेल्या गोष्टी तुम्हाला कधी कळणार? तुम्ही आपले एकच एक घेऊन बसता, हे काही बरोबर नाही..!
न्यायालयानेही एवढ्या केसेस पेंडिंग असताना बदलापूरची केस घेऊन पोलिसांना जबाबदारीचा विसर पडल्याची जाणीव करून दिली... आपली जबाबदारी पोलिसांना माहिती नाही का..? बदलापूरच्या प्रकरणात चौकशी करणाऱ्या महिला पोलिस अधिकारी होत्या. त्या महिला जरी असल्या, तरी पोलिस अधिकारी आहेत. त्यांनाही त्यांचे पद, प्रमोशन, खुर्ची या गोष्टींची काळजी आहे. म्हणून त्यांनी काळजीपूर्वक गुन्हा दाखल करण्यासाठी दहा-बारा तास घेतले असतील, तर त्यात त्यांची काय चूक..? त्यांना ज्या नेत्याने सांगितले, त्या नेत्याला कोणी काही बोलत नाही. उगाच त्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबन, बदली अशा गोष्टींना सामोरे जावे लागले... हे काही बरोबर नाही...
या अशा गोष्टी घडणार हे लक्षात ठेवा. स्वतःची मानसिक तयारी करीत जा... विनाकारण दुसऱ्यांना दोष देऊ नका... सरकार तुम्हाला लाडकी बहीण म्हणून दीड हजार रुपये देत आहे... लाडका भाऊ म्हणून पैसे देत आहे... वीजबिल माफ करीत आहे... शेतीचे कर्ज माफ करीत आहे... पुरामुळे घरात पाणी घुसले तर बिना पंचनाम्याचा निधी देत आहे... तुम्ही तोंडातून शब्द काढायचा अवकाश, तुम्हाला सरकार जिथे जिथे शक्य आहे, तिथे तिथे भरघोस पैसे देत आहे... निवडणुका आल्या की, हेच नेते तुम्हाला पाच वर्षांचे केबलचे बिल भरून देतात... तुमच्या सोसायटीला रंगरंगोटी करून देतात... प्रत्येक मतामागे पाच-पाच हजार रुपयेही देतात... तुमची एकगठ्ठा मतं नेऊन देणाऱ्यांना काही लाख, काही कोटी दिल्याच्याही बातम्या येतात... एवढं सगळं तुमच्यासाठी जर नेतेमंडळी करीत असतील, तर त्यांच्या काही चुकांकडे तुम्ही दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे.
तसेही तुम्ही काहीही करू शकत नाही. अन्याय झाला म्हणून फार आंदोलने करण्याच्या भानगडीत पडू नका. उगाच छोट्या छोट्या गोष्टींवरून आरडाओरड करणे, गोंधळ घालण्यामुळे हाती काहीही येणार नाही. हे पक्के लक्षात ठेवा. जर जास्ती आरडाओरड केली तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील... तुम्हाला कोर्टाच्या चकरा माराव्या लागतील... वेळप्रसंगी जामीन करून घेण्यासाठी पैसे भरावे लागतील... छत्रपती संभाजीनगरला एका मुलीला त्रास देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले. तेव्हा तो काय म्हणाला हे लक्षात ठेवा... तो म्हणाला, “आज जेल... कल बेल... फिर वही खेल...” तुम्हाला पुन्हा हाच खेळ नको असेल तर आजूबाजूला जे चालू आहे ते बघा आणि थंड बसा... वाद घालण्यापेक्षा कोणी गांधीजींचे फोटो छापलेले रंगीत कागद देत असेल तर घ्या आणि गपगुमान आपलं इमान आपल्या मतांसारखं विकून मोकळे व्हा...
- तुमचाच बाबूराव