ज्ञान, करुणा आणि सेवा यांचा त्रिवेणी संगम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 09:46 AM2024-02-21T09:46:01+5:302024-02-21T09:46:41+5:30

‘लोकनीती म्हणजे लोभसंग्रह नव्हे तर लोकसंग्रह आहे’ असा आग्रह धरणाऱ्या संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांना विनम्र श्रद्धांजली!

article on Sant Shiromani Acharya Shri 108 Vidyasagarji Maharaj | ज्ञान, करुणा आणि सेवा यांचा त्रिवेणी संगम

ज्ञान, करुणा आणि सेवा यांचा त्रिवेणी संगम

पंतप्रधान नरेंद्र मोदी

संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांनी समाधी घेतली आणि अवघा देश दुःखात बुडून गेला. त्यांचे आयुष्य म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध असे युग! प्रगाढ ज्ञान, अमर्यादित करुणा आणि मानवतेच्या उद्धारासाठी त्यांची अतूट वचनबद्धता होती. मला अनेकप्रसंगी त्यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. त्यांचे निर्वाण हे माझ्यासाठी व्यक्तिगत नुकसान आहे. त्यांचे वात्सल्य, दयाभाव आणि आशीर्वाद तर ऊर्जस्वल होतेच; पण त्यांच्या आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह त्यांच्या संपर्कात आलेल्या  भाग्यवंतांना एक नवीन प्रेरणा देत असे.

पूज्य आचार्यजी हे नेहमीच ज्ञान, करुणा आणि सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणून ओळखले जातील. त्यांचे जीवन जैन धर्माच्या मूलभूत तत्त्वांचे मूर्तिमंत उदाहरण होते. ते सत्यनिष्ठ जीवन जगले, त्यातून विचार, उच्चार आणि कृतीबाबतचा जैन धर्मातील प्रामाणिकपणा ठळकपणे दिसून येतो. त्यांच्यासारख्या महात्म्यांमुळेच या जगाला  जैन धर्माचे आचरण आणि भगवान महावीर यांच्या आयुष्याचे अनुसरण करण्याची प्रेरणा मिळते. ते जैन समुदायासाठी तर एक प्रेरणास्रोत होतेच; पण त्यांची शिकवण केवळ एका समुदायापुरती मर्यादित नव्हती. सर्व धर्म, पंथ आणि संस्कृतीचे लोक त्यांच्याकडे येत असत आणि आध्यात्मिक जागृतीसाठी ते अविरत कार्य करीत असत.

बालपणातील विद्याधर नावाच्या बुद्धिमान मुलापासून ते आचार्य विद्यासागर होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, त्यांची ज्ञान संपादन करण्याची तहान आणि समाजाचे प्रबोधन करण्याची सखोल बांधिलकी आदर्शवत अशीच आहे. शिक्षण हा न्याय्य आणि प्रबुद्ध समाजाचा पाया आहे, यावर आचार्यजींचा ठाम विश्वास होता. लोकांना सक्षम करण्यासाठी आणि जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी ज्ञान हे सर्वोपरी असल्याचे त्यांनी सांगितले. खऱ्या ज्ञानाचा मार्ग म्हणून  स्व-अध्ययन आणि आत्म-जागरूकतेवर त्यांचा विशेष भर होता. त्यांनी आपल्या अनुयायांना आध्यात्मिक विकासासाठी  अथक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

शिक्षणामध्ये सांस्कृतिक मूल्यांची पाळेमुळे रुजलेली असावीत, याबाबत आचार्यजी आग्रही होते. आपण प्राचीन ज्ञानापासून दूर गेल्याने  वर्तमानातील पाणीटंचाईसारख्या समस्यांवर उपाय शोधणे आपल्याला शक्य होत नाही, असे ते म्हणत. कौशल्यावर आणि नवोन्मेषावर भर देणारे शिक्षण हेच समग्र शिक्षण अशी त्यांची धारणा होती. भारताच्या भाषिक विविधतेचा त्यांना अतिशय अभिमान होता आणि त्यांनी तरुणांना भारतीय भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.  आरोग्याच्या क्षेत्रात देखील आचार्यजींचे योगदान परिवर्तनकारी होते. शारीरिक आरोग्याला त्यांनी आध्यात्मिक निरामयतेची जोड दिली होती. देशातल्या तरुणांनी संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराजजींच्या राष्ट्र उभारणीविषयीच्या बांधिलकीचा सखोल अभ्यास करावा. भेदभावयुक्त विचारसरणीच्या पलीकडे जाऊन देशहितावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन ते नेहमीच करीत असत. लोकशाही प्रक्रियेमधील लोकसहभागाची ‘मतदान’ ही एक अभिव्यक्ती आहे, असा त्यांचा विश्वास होता. त्यांनी सदैव  निरोगी आणि स्वच्छ राजकारणाचा पुरस्कार केला. ‘धोरणे तयार करताना लोकांच्या कल्याणाचा विचार असला पाहिजे, स्वतःच्या स्वार्थाचा नव्हे, लोकनीतीम्हणजे लोभसंग्रह नव्हे, तर लोकसंग्रह आहे,’ असे ते सांगत. 

निसर्गावर अनेक संकटे घोंघावत असतानाच्या आजच्या जगात संत शिरोमणी आचार्यजी यांनी केलेले  मार्गदर्शन खूप उपयुक्त आहे. निसर्गाचा ऱ्हास कमीत कमी होईल, अशा प्रकारची जीवनशैली अवलंबण्याचे आवाहन त्यांनी सतत केले.  शेती आधुनिक त्याचसोबत शाश्वत करण्यावर त्यांचा भर होता. तुरुंगातील कैद्यांच्या सुधारणेसाठी त्यांनी केलेले कार्यही उल्लेखनीय होते.

आपल्या या भूमीने ज्यांनी इतरांना प्रकाशाच्या वाटेवर नेऊन एक चांगला समाज घडवणाऱ्या संत-महात्म्यांना जन्म दिला. या विलक्षण वारशामध्ये पूज्य आचार्यजी यांचे व्यक्तित्व उत्तुंग ठरते.  गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात  मला छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी जैन मंदिराला भेट देण्याची संधी मिळाली. ही भेट पूज्य आचार्यजींसोबतची माझी शेवटची भेट ठरेल, असे वाटले नव्हते.   त्यांनी माझ्याशी बराच वेळ संवाद साधला, देशसेवेच्या माझ्या प्रयत्नांसाठी  आशीर्वाद दिला.  आपला देश घेत असलेले नवे वळण आणि जागतिक स्तरावर भारताला मिळत असलेला आदर, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ते करीत असलेल्या कामाबद्दल त्यांनी मोठ्या उत्साहाने सांगितले. त्यांची प्रेमळ दृष्टी आणि प्रसन्न हास्य  शांत-समाधानाचा  भाव किती सहज निर्माण करू शकत असे, याचा मी अनुभव घेतला. त्यांचा आशीर्वाद आपल्या आत्म्यासाठी चंदनासारखा भासतो,  आपल्या भोवती असलेल्या दैवी अस्तित्वाचे स्मरण करून देतो.

संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराजजी यांची उणीव  त्यांना ओळखणाऱ्या आणि त्यांच्या शिकवणीने आणि त्यांच्या जीवनाने प्रभावित झालेल्या सर्वांनाच जाणवत राहील; मात्र त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या सर्वांच्या हृदयात आणि मनात त्यांची स्मृती सतत राहील.  त्यांच्या स्मृतीच्या सन्मानार्थ त्यांची मूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी वचनबद्ध होणे, हीच आचार्यजींना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल केल्यास  राष्ट्रनिर्माण आणि राष्ट्रकल्याणही साधता येईल.

Web Title: article on Sant Shiromani Acharya Shri 108 Vidyasagarji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.