...तोवर त्याला तिथे काहीही करणे शक्य नाही; एक हजार कोटींचे समुद्रमंथन  

By मनोज गडनीस | Published: February 19, 2023 06:39 AM2023-02-19T06:39:10+5:302023-02-19T06:39:26+5:30

मुळात बंदर असलेल्या मुंबईमध्ये समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या मालाची आयात-निर्यात होते. अवजड, महाकाय बोटींचा हा ट्रॅफिक प्रचंड आहे. एखाद्या बोटीचे टायमिंग हुकले तरी समुद्रात वाहतूक कोंडी होऊ शकते; पण याची एक शिस्तबद्ध व्यवस्था आहे.

Article on Sea business problems | ...तोवर त्याला तिथे काहीही करणे शक्य नाही; एक हजार कोटींचे समुद्रमंथन  

...तोवर त्याला तिथे काहीही करणे शक्य नाही; एक हजार कोटींचे समुद्रमंथन  

googlenewsNext

गेट वे ऑफ इंडियापासून सुटणाऱ्या पर्यटन नौका असोत; त्याच दिशेला पुढे गेल्यानंतर डोळे दिपवणारा बॉम्बे हायचा प्रकल्प असो, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये प्रवेश करण्यासाठी शिस्तबद्धपणे उभी असलेली व्यावसायिक जहाजे असतील किंवा मग, सुमद्रात गस्ती घालणाऱ्या युद्धनौका अन् डोक्यावर भिरभिरत गस्त घालणारी तटरक्षक दलाची हॅलिकॉप्टर असतील, असा सारा संसार समुद्राच्या लाटांवर डोलत उभा असतो. त्यातून वाट काढत जाणाऱ्या मच्छीमारांच्या नौका... अथांगतेवर चालणाऱ्या या साऱ्या खेळातून महिन्याला किमान एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल मुंबईच्या अरबी समुद्रात होते. 

मुळात बंदर असलेल्या मुंबईमध्ये समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या मालाची आयात-निर्यात होते. अवजड, महाकाय बोटींचा हा ट्रॅफिक प्रचंड आहे. एखाद्या बोटीचे टायमिंग हुकले तरी समुद्रात वाहतूक कोंडी होऊ शकते; पण याची एक शिस्तबद्ध व्यवस्था आहे. जेव्हा बोटी मुंबईच्या समुद्रालगत येतात, तेव्हाच त्यांना त्यांचा माल कधी व कोणत्या वेळेला उतरविण्यात येईल आणि तो कोणत्या ट्रॅकवर उतरवला जाईल, याची माहिती दिली जाते. मग या बोटींना तिथवर घेऊन येण्यासाठी पायलट बोटी तैनात असतात. त्यांच्या चालकांना समुद्रातील मार्ग खडान्खडा ठाऊक असतो. त्यांच्यामागून या बोटी नेमून दिलेल्या ट्रॅकवर येऊन सामानाची ने-आण करतात. 

दुसरी गोष्ट म्हणजे, मुंबई हाय किंवा बॉम्बे हाय प्रकल्प. समुद्रातील तेलाचे साठे शोधणे किंवा बाहेरून येणाऱ्या कच्च्या तेलाचे प्रोसेसिंग करणे, खडकात दडलेला गॅस शोधणे असे काम तेथे होते. अतिशय क्लिष्ट, गुंतागुंतीचे हे काम होते. त्यामुळेच व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत व्यस्त असलेल्या मुंबईच्या समुद्राची माहिती जोवर एखाद्याला तळहातासारखी नसते, तोवर त्याला तिथे काहीही करणे शक्य नाही. 

जहाजात एसी महत्त्वाचा...
समुद्रात असलेल्या जहाजाचा वरचा भाग जरी खुला असला तरी खालच्या भागात अनेक प्रणाली असतात. तेथील तापमान व्यवस्थित राखण्यासाठी वातानूकुलित यंत्रणा प्रभावी असणे गरजेचे आहे. यात थोडा जरी बिघाड झाला तरी त्याचा फटका जहाजाच्या प्रवासाला बसू शकतो.

चाचेगिरी अन् खंडणी...
समुद्रातील प्रवास हा विषय निघाला की, आपोआपच तिथे होणारी चाचेगिरी अर्थात दरोडेखोरीच्या अनेक कथा आठवतात. सोनटक्के म्हणाले की, सोमालिया किंवा अन्य काही देशांच्या समुद्रसीमेतून ज्यावेळी जहाजे जात असतात त्यावेळी या बोटी मोठ्या जहाजांपर्यंत येतात. त्यांतील चाचे थेट खंडणीची मागणी करतात. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मग जहाज व्यवस्थापनही निमूटपणे खंडणी देऊन तिथून सुखरूप बाहेर पडण्याचा प्रयत्न करते.

खलाशाची तब्येत महत्त्वाची
जहाजावरून महिनोमहिने समुद्र प्रवास करणारा खलाशी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. या खलाशाची शारीरिक आणि मानसिक तब्येत व्यवस्थित राखणे फार महत्त्वाचे आहे. खलाशांना नियमित वेळेत आणि योग्य प्रमाणात आहार देण्यात येतो. घरापासून दूर असलेल्या या खलाशांचे मानसिक स्वास्थ्य ढळू नये, यासाठी त्यांना प्रेरित ठेवणे महत्त्वाचे असते. जहाज व्यवस्थापनातर्फे याची पुरेपूर दक्षता घेतली जाते.
अलीकडच्या काळात जहाजांवर देखील वाय-फाय सुविधा उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे खलाशांना त्यांच्या कुटुंबीयांशी व्हिडीओ कॉलमार्फत संवाद साधता येतो.

३० वर्षांपासून समुद्राचा वाटाड्या
समुद्राच्या या गूढतेविषयी अन् त्यातील अर्थकारणाविषयी गेल्या तीस वर्षांपासून ज्यांचे आयुष्य समुद्राने व्यापले आहे, अशा संजय सोनटक्के यांच्याशी आम्ही संवाद साधला अन् त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या पोतडीतून दृष्टिआड लपलेल्या या सृष्टीचे अंतरंग उलगडवून दाखविले. संजय सोनटक्के समुद्र या विषयांवर तासन् तास बोलू शकतात आणि ते ऐकल्यावर आपल्याला जाणवते की, त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये एकदाही द्विरुक्ती आढळत नाही.  

एकमेका साहाय्य करू...
एकदा किनारा सोडल्यानंतर जहाजे खोल समुद्रात जातात त्यावेळी त्यांना काही समस्या उद्भवली तर ती तातडीने जवळच्या पोर्टला किंवा बोटीशी संपर्क साधतात. अशा वेळी कोणत्याही देशाची, प्रांताची बोट असली तरी ती प्राधान्याने येऊन संकटग्रस्त बोटीला मदत करते.

Web Title: Article on Sea business problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.