सेन्सर्स आता परस्पर बोलावतील ॲम्ब्युलन्स !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 08:19 AM2022-07-09T08:19:56+5:302022-07-09T08:20:35+5:30
आपल्या शरीरात, घरात, गाडीत, कंपनीत, रस्त्यांवर... अगदी सगळीकडे सेन्सर्स दिसायला लागतील तेव्हा एक मोठाच धुमाकूळ होईल !
अच्युत गोडबोले, ख्यातनाम लेखक
आसावरी निफाडकर, सहलेखिका
‘सेन्सर्स’ म्हणजे कुठलीही गोष्ट ओळखण्याची किंवा मोजण्याची म्हणजेच ‘सेन्स’ करण्याची’ यंत्रणा. आपल्या शरीरात अनेक सेन्सर्स असतात, हे आपल्याला माहीत आहेच. आपल्याला स्पर्शाची किंवा उष्णता/थंडी यांची जाणीव होते; भाजलं, जखम झाली की दुखण्याची जाणीव होते ती सेन्सर्समुळेच.
आपल्या नाकातही शेकडो (काहींच्या मते ३८८) सेन्सर्स असतात, असं म्हटलं जातं. या सगळ्या सेन्सर्सचं काम अविरत आणि आपोआप चालू असतं. यासाठी ते चक्क डेटाही गोळा करत असतात आणि निर्णय घेऊन कृतीही करतात. पदार्थांच्या चवी आपल्याला आपल्या जिभेवरून कळतात. एखादा पदार्थ जर जास्त तिखट असेल, तर तशी जाणीव आपल्या जिभेचे सेन्सर्स आपल्याला करून देतात आणि ताबडतोब आपल्या मेंदूतले सेन्सर्स हाताला पाण्याचा ग्लास उचलून ते पाणी प्यायची सूचना करतात. यासाठी त्यांना कुठल्याही बाह्य पद्धतीनं सूचना मिळत नसतात. ते सतत आपल्या शरीराचा अभ्यास करत असतात.
‘डेटा’ गोळा करत असतात आणि एकमेकांच्या संपर्कात राहून हा डेटा गरजेनुसार शेअरही करत असतात. उन्हाळ्यात आपल्याला प्रचंड उष्णता जाणवते. बाहेर ऊन वाढायला लागलं की ती उष्णता सर्वात आधी त्वचेला जाणवायला लागते. मग हा ‘डेटा’ त्वचेतले सेन्सर्स शरीरातल्या सेन्सर्सना पाठवतात. आतल्या सेन्सर्सना सूचना मिळाल्यावर शरीराला थंडावा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होतात आणि म्हणून आपल्याला घाम येतो. हे सगळं सेन्सर्सच्या देवाण-घेवाणीतून होत असतं !
‘उद्याच्या जगात कोट्यवधी कृत्रिम सेन्सर्स प्रचंड धुमाकूळ घालतील’ असं प्रसिद्ध भविष्यवेत्ता पॉल सॅफो म्हणतो. खरंतर ते आजही आपल्या रोजच्या जीवनात आहेतच. कॉम्प्युटरच्या माऊसमध्ये, रेफ्रिजरेटरमध्ये, कारमध्ये, विमानांमध्ये, कित्येक ऑफिसेसमध्ये, हॉटेल्समध्ये किंवा मॉल्समध्ये (आपोआप उघडझाप करणारे दरवाजे) अशा अनेक ठिकाणी हे सेन्सर्स आपल्या नकळतपणे काम करत असतात. तापमान, वजन, हवेचा दाब, एखाद्या द्रव्याची पातळी, प्रकाश, विजेचा प्रवाह किंवा त्याचा रेझिस्टन्स किंवा एखाद्या वायूचं किंवा इंधनाचं प्रमाण यांची मोजमापं ती सतत करत असतात. यापैकी कशातही थोडासाही बदल झाला तरी लगेच त्यांना समजतं. असा बदल ठरावीक पूर्वनियोजित पातळीपेक्षा कमी किंवा जास्त झाला तर ते सेन्सर्स आपल्या कंट्रोलरला योग्य त्या सूचना पाठवतात आणि मग त्यातला कंट्रोलर योग्य ती पावलं उचलतो.
बायोलॉजिकल, केमिकल, इलेक्ट्रिक, रेडिओॲक्टिव्ह, फोटोइलेक्ट्रिक, थर्मोइलेक्ट्रिक, थर्मोस्टॅटिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इलेक्ट्रोकेमिकल असे असंख्य प्रकारचे सेन्सर्स बाजारात उपलब्ध आहेत. अगदी आताआतापर्यंत हे सेन्सर्स वायर्ड होते. पण आता मात्र वायरलेस सेन्सर्स अनेक उपकरणांमध्ये दिसायला लागले आहेत. आता तर नॅनोमटेरिअल्स वापरून सेन्सर्स बनवले जाताहेत. अलीकडे सकाळी व्यायामाच्या वेळी काही लोक ‘पेडोमीटर’ नावाचं एक उपकरण वापरतात. त्यात आपला हार्टरेट, हृदयाचे ठोके याबरोबरच आपण किती अंतर किती वेळात चाललो, आपण किती पावलं टाकली, त्यामुळे आपल्या किती कॅलरीज जळाल्या हे सगळं त्या उपकरणात असलेल्या सेन्सर्समुळेच नोंदवलं जातं.
पूर्वीचे सेन्सर्स ‘डंब’ म्हणजेच मेकॅनिकल होते. नंतर ते ‘स्मार्ट’ झाले आणि त्यांना दिलेल्या ठरावीक सूचनांप्रमाणे ते वागायला लागले. आता मात्र आपल्या शरीरातल्या सेन्सर्सप्रमाणे स्वत:चं ‘डोकं’ चालवून कुठलाही निर्णय कुणाच्याही मदतीशिवाय घेतात, तसं काहीसं करण्याच्या नादात आता सेन्सर्सही ‘स्मार्ट’ आणि ‘इंटेलिजंट’ झाले आहेत. यामुळे ते फक्त डेटा गोळा करायचंच काम करणार नाहीत, तर ते चक्क निर्णय घ्यायचंही काम करतील. उद्या हे सगळे सेन्सर्स आपल्या शरीराप्रमाणेच एकत्रितपणे काम करतील. याला ‘सेन्सर्स फ्युजन’ असं म्हणतात. उदा. आपण वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावले आहेत.
मशीनचा ड्रायर ॲलेक्सासारख्या उपकरणाला बाह्य वातावरणात आर्द्रता किती आहे, असं विचारेल. समजा ती जास्त असली तर कपडे लवकर वाळणार नाहीत. म्हणूनच ड्रायर मशीनमधले कपडे अधिक जास्त ड्राय करायचा प्रयत्न करेल. हे झालं साधं उदाहरण. पण असे अनेक प्रकारचे सेन्सर्स आपल्या घरात, कारखान्यांमध्ये, ऑफिसेसमध्ये अगदी सगळीकडे मिळून-मिसळून आणि स्वत:चं ‘डोकं’ वापरून काम करतील.
अस्थमा, हृदयविकार आणि पार्किन्सन्स असलेल्या रुग्णांमध्ये होणारे बारीक बदलही जीवघेणं रूप धारण करू शकतात. अशा वेळी त्यांना खिशात मावू शकणारं किंवा हातावर घडाळ्यासारखं बांधता येऊ शकणारं किंवा डोक्याला बांधता येण्यासारखं त्यात सेन्सर्स असलेलं उपकरण दिलं तर सुरुवातीला हे सेन्सर्स त्या माणसाचा आधी अभ्यास करतील (तो माणूस नॉर्मल असल्यावर त्याचं बीपी किती असतं, रक्तातली साखर किती असते, हृदयाचे ठोके कसे असतात वगैरे).
त्यानंतर त्याच्या हालचालीतून त्या माणसात होणारे बदल टिपले जाऊन वेळप्रसंगी ते थेट डॉक्टरपर्यंत पाठवून ॲलेक्सासारख्या उपकरणाला सांगून चक्क ॲम्ब्युलन्सही बोलावण्याची सोय केली जाईल. यामुळे हार्ट ॲटॅक येण्याआधीच ते डॉक्टरांना कळेल आणि वेळीच उपचार देता येतील!
सेन्सर्स भविष्यात काय कामगिरी बजावू शकतील, याचा तर आपण अंदाजच बांधू शकत नाही. तज्ज्ञांच्या मते भविष्यातले सेन्सर्स इतके लहान असतील की ते आपल्याला डोळ्यांना सहजासहजी दिसणारच नाहीत. यापुढेही जाऊन हे सेन्सर्स आता इंटरनेटच्या मदतीनं जोडले जाताहेत. असे सेन्सर्स आपल्या घरात, कंपन्यांमध्ये, रस्त्यांवर, वाहनांमध्ये अगदी सगळीकडे दिसायला लागतील तेव्हा तर धुमाकूळच होईल ! थोडक्यात उद्याचं जग सेन्सर्स व्यापून टाकतील यात शंका नाही !!
godbole.nifadkar@gmail.com