Thergaon queen: ‘मोठी हस्ती आपन, किरकोळ थोडीये?’; ‘मेरा ब्रँड अलग है, झुकेगा नहीं साला..’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 08:07 AM2022-02-12T08:07:07+5:302022-02-12T08:07:45+5:30

वडीलधाऱ्यांना चिंता की, आपली पोरं इन्स्टाग्राम इन्फ्ल्यूअन्सर्सच्या मागे, इतकी कशी वाहवत चालली?- पण या पोरांचं म्हणणं वेगळं आहे!

Article on Social Media Influncer about youth content | Thergaon queen: ‘मोठी हस्ती आपन, किरकोळ थोडीये?’; ‘मेरा ब्रँड अलग है, झुकेगा नहीं साला..’

Thergaon queen: ‘मोठी हस्ती आपन, किरकोळ थोडीये?’; ‘मेरा ब्रँड अलग है, झुकेगा नहीं साला..’

Next

थेरगाव क्वीन म्हणून गाजणाऱ्या मुलीची कमाल पाहा, पोलीस अटक करून नेत असतानाही तिनं ‘रील’ केलं. त्यातले शब्द असे.. ‘मोठी हस्ती आपन, किरकोळ थोडीये?’ १८ वर्षांची, किरकोळच दिसणारी  निमशहरी मुलगी. साडेतीन सेकंदांच्या रील्सच्या लोकप्रियतेच्या जोरावर स्वत:ला ‘क्वीन’-‘डॉन’ म्हणवून घेऊ लागली. दोस्तीत दगाबिगा केला तर बघा म्हणत ती दम देते, अर्वाच्य शिव्या देत  ‘ॲटिट्यूड- डेअरिंग’च्या नावाखाली फाॅलोअर्सची संख्या वाढवते. तिच्या वयाच्या मुलांच्या भाषेत सांगायचं तर ती जे करते ते ‘फुल क्रॅप’ आहे. पण इन्स्टा रील्सच्या दुनियेत आज ती ‘अशी’ एकटीच आहे का? - तर नाही! ‘आपण लई भारी आहोत, दुनिया गेली खड्ड्यात’ म्हणणारे इथे चिक्कार आहेत.

गेले काही दिवस वडीलधाऱ्या जगाला चिंता लागलीय की इन्स्टाग्राम इन्फ्ल्यूअन्सर्सच्या मागे  तारुण्य का लागतंय? आपली पोरं इतकी कशी बिघडली, वाया गेली?  -या चिंतेचा तरुण मुलांना पत्ताच नाही, कारण ही मुलं आपल्याबद्दल कोण काय म्हणतंय हे  मोजत नाहीत. मग या मुलांच्या जगात महत्त्वाचं काय आहे? - विषय कोणताही असो - व्यक्तिगत की जागतिक, राजकीय की वैयक्तिक,  विगतवारी फक्त दोनच प्रकारात केली जाते : ‘कंटेंट’ आणि ‘क्रॅप’. विषय  चांगला वाटला, आवडला, त्यातून काही उत्तम  मिळालं तर तो ‘कंटेंट!’ आणि  उल्लू, बकवास मनोरंजन  ते सगळं  ‘क्रॅप!’ जे जे ‘फॉलो’ करायला आवडतं त्या सगळ्याची वर्गवारी या दोनच गटांत!  या तारुण्याला हे पक्कं माहिती आहे की, ऑनलाइन जगात आपण जे पाहतो, ते ‘कंटेंट’ आहे की ‘क्रॅप’ आहे. थातूरमातूर, अश्लील, भडकाऊ रील्स करणाऱ्यांनाही उदंड फॉलोअर्स असतात; पण त्या फॉलोअर्सनाही माहिती असतं की, यात ‘व्हॅल्यू’ काही नाही. त्याउलट  फॅशन- मोटिव्हेशन- प्रवास- करिअर- सेल्फ हेल्प हे विषय म्हणजे या पिढीसाठी कंटेंट.  

वेगळं जग किंवा त्या जगाचा अनुभव देणारे सेलेब्रिटी, खेळाडू, सेल्फ हेल्प कोच, भटके यापैकी कुणी जे आपल्या चाहत्यांशी ‘कनेक्ट’ करतात, त्यांचे रील्स कंटेंट म्हणून फॉलो केले जातात. क्रॅप काय आणि कंटेंट काय हे मात्र हे तरुण स्वत:च स्वत:साठी ठरवतात. वडीलधाऱ्या पिढ्यांना जे आदर्श वाटतात, ते या मुलांना क्रॅप वाटू शकतात.  समाजमाध्यमात फॉलोअर्स, व्ह्यूज, लाइक्स यांचे वरकरणी आकडे मोजून त्याप्रमाणेच ट्रेंडचं वारं वाहतं आहे अशी मांडणी अनेकदा पोकळ असते. कारण फॉलोअर्सची संख्या ‘क्रॅप आणि कंटेंट’ची वर्गवारी सांगत नाही.  आकडा थेरगाव क्वीनचा दिसतो, हिंदुस्थानी भाऊंचा दिसतो, आणि विराट कोहलीचाही; पण फॉलो करणारे त्यांना क्रॅप समजतात की कंटेंट हे या तारुण्याशी व्यक्तिगत संवाद असल्याशिवाय कळणं अशक्य आहे.

आदर्श-आयकॉन्सचा जमाना आता गेला, आजच्या तरुण जगात ‘इन्फ्लूएन्सर’ क्रॅप असोत, वा कंटेंट;  तरुण मुलं  त्यांना आदर्श मानून त्यांच्याप्रमाणे आपलं आयुष्य बेतत नाही. आपणच ‘आपल्यासारखे’ भारी असं वाटणारी, बाकी कुणालाही सहजी न मोजणारी ही नवीन मानसिकता आहे.  ट्रेंडच्या लाटा येतात -जातात. जसं ‘पुष्पा’, त्यानं अनेकांना वेड लावलं आहे, कारण तो  म्हणतो, ‘मेरा ब्रँड अलग है, झुकेगा नहीं साला..’ हा पुष्पा अनेकांना क्रॅप वाटत असला तरी इन्स्टा पिढीसाठी तो कंटेंट ठरतो आहे. धास्तावणारा भाग म्हणजे  ही साडेतीन सेकंदांची फेम अनेकांना हवीशी झाली आहे. त्यासाठी पोरं जीव काढतात.   त्यासाठी फिल्टर आणि रील्समधून अखंड धडपडतात. त्यापायी येणारं नैराश्य सोसतात. 

कोरोना काळात सर्व बाजूनं घुसमट झालेली असताना, शिक्षण खोळंबलेलं असताना, भविष्यात नोकरी-रोजगार आहेत का, याचीच भ्रांत असलेल्या तारुण्यानं हे सारे विषय ‘क्रॅप’ नावाच्या चाैकटीच्याही बाहेर ढकलले आहेत आणि आता ते कंटेंट भलतीकडेच शोधू लागलेत - हा खरा प्रश्न आहे.

- मेघना ढोके, संपादक, लोकमत सखी डिजिटल
meghana.dhoke@lokmat.com

Web Title: Article on Social Media Influncer about youth content

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.