शेअर बाजार ऐंशी हजार पार.. आता पुढे काय ही उत्कंठा !
By पुष्कर कुलकर्णी | Published: July 5, 2024 05:50 AM2024-07-05T05:50:19+5:302024-07-05T05:50:43+5:30
शेअर बाजार सध्या उंचीवर असून, उसळी घेत असल्याने गुंतवणूकदारही खुशीत आहेत. आपला खिसा असाच भरत राहो, या अपेक्षेत ते आहेत.
डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक
शेअर बाजार नवी-नवी उंची गाठत आहे. कालही सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वोत्तम पातळी गाठली. दीर्घकालीन गुंतवणूकदार आनंदात आहेत, कारण ते खऱ्या अर्थाने मालामाल होत आहेत. थोडे इतिहासात जाऊन सेन्सेक्सची वाटचाल कशी झाली हे पाहू. सेन्सेक्स सन २००३ मध्ये ५००० पातळीवर होता. पुढील चार वर्षांत म्हणजेच २००७ मध्ये तो चौपट झाला. याच दरम्यान जागतिक मंदीचे वारे वाहत होते. ही मंदी २००८ मध्ये तीव्र झाली. याची झळ जागतिक पातळीवर सर्वच शेअर बाजारांनी सोसली.
सेन्सेक्सने या दरम्यान मोठी डुबकी घेत ८,३०० ही नीचांकी पातळी पहिली. पुढे पुन्हा २० हजारांची पातळी गाठायला २०१० उजाडले. पुढील पाच वर्षांत ३० हजार आणि २०१९ मध्ये ४० हजारांचा पल्ला सेन्सेक्सने गाठला, तोच कोरोनाने जगाला विळखा घातला. याचा धसका गुंतवणूकदारांनी घेत विक्रीचा सपाटा लावत सेन्सेक्सला ४० हजारांहून २५ हजारांपर्यंत खाली आणले. याच दरम्यान वर्षभरात शेअर्सचे भाव आकर्षक अशा खालच्या पातळीवर आल्याने गुंतवणूकदार पुन्हा आकर्षित होऊ लागले. खरेदी सुरू झाली.
याच दरम्यान विदेशी गुंतवणूकदारही आकर्षित झाले. कॅश मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली आणि बाजार जसा खाली आला तसाच एकतर्फा वर चढला. सन २०२१ नंतर बाजाराची खऱ्या अर्थाने मोठ्या ‘बुल रन’ला सुरुवात झाली. एक वर्षातच सेन्सेक्स दुपटीपेक्षा जास्त वाढून ६० हजारी पोहोचला. कोरोना काळात भारतात डिमॅट अकाउंट चौपट वाढले. म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक वाढली. पुढे २०२२ मध्ये बाजाराने थोडे करेक्शन घेतले; पण त्याची घोडदौड सुरूच राहिली. सेन्सेक्स मागील वर्षी ७० हजारी आणि यावर्षी ८० हजारी पोहोचला.
विदेशी आणि भारतीय गुंतवणूकदार यांची रस्सीखेच विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या दहा वर्षांत भारतीय बाजाराकडे पाठ फिरवली, हे आकडेवारी सिद्ध करते.
२०१५ पासून २०२४ पर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून कॅश मार्केटमधून तब्बल ६ कोटी ५५ लाख रुपये काढले आहेत. यात अपवाद सन २०१९ आणि २० मध्ये. या दोन वर्षांत १ लाख ५ हजार कोटी गुंतविले. भारतीय गुंतवणूकदारांनी गेल्या ९ वर्षांत तब्बल ११ लाख ३७ हजार कोटी गुंतविले. फक्त सन २०२० मध्ये ३५ हजार सहाशे कोटी काढून घेतले. याचाच अर्थ भारतीय शेअर बाजाराने ही जी उत्तुंग भरारी घेतली आहे, ती भारतीय गुंतवणूकदारांच्या जोरावर अन् विश्वासावरच.
म्युच्युअल फंड्समध्ये वाढता ओघ
भारतात म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक गेल्या पाच वर्षांत वाढली. चार कोटींच्या वर गुंतवणूकदार आणि १७ कोटींच्या वर म्युच्युअल फंडमधील खाती एकूण ५० लाख कोटींची ऍसेट अंडर मॅनेजमेंट सांभाळत आहेत. म्युच्युअल फंड्समधील ६९ टक्के गुंतवणूक थेट शेअर बाजारात इक्विटी योजनेत आहे. शेअर बाजारावर भारतीय गुंतवणूकदारांनी दाखविलेला हा विश्वास खूप काही सांगून जातो.
पुढे काय?
विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठ पुन्हा आकर्षित करेल. भारतातील गुंतवणुकीचा ओघही सुरू राहील. अधून-मधून करेक्शन येणे हे बाजाराच्या आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने कायम सकारात्मक असते. येणाऱ्या काळात स्थिर सरकार, जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण, अमेरिकन फेडरल आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने जर शेअर बाजारांना पूरक असे निर्णय घेतले तर येणाऱ्या काळात सेन्सेक्स एक लाखांचा टप्पा सहज पार करेल, यात शंका नाही.
pushkar.kulkarni@lokmat.com