मुडदे उकरून काढायची इतकी खुमखुमी का येते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 06:54 IST2025-03-14T06:54:01+5:302025-03-14T06:54:09+5:30

सत्तापक्षाचे आमदार, मंत्रीच धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा का चालवतात? दोन शंका : एकतर त्यांचा वैयक्तिक हेतू किंवा उचकवणारी भाषा बोलण्याचा 'आदेश'!

Article on Why are ruling party MLAs and ministers driving the agenda of religious polarization | मुडदे उकरून काढायची इतकी खुमखुमी का येते?

मुडदे उकरून काढायची इतकी खुमखुमी का येते?

यदु जोशी 

धार्मिक तेढ निर्माण होईल अशा विषयांनी महाराष्ट्रात काही दिवसांपासून डोके वर काढले आहे. कुठे झटका-हलाल वाद, तर कुठे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम नव्हतेच हा निराधार वाद उकरणे... हे विषय सहज आलेले नाहीत. समाजाचे ज्याने काहीही अडत नाही असे मुद्दे कोणीही काढले तर समजून जायचे, की अजेंडा दुसराच आहे. नॉन इश्युजना इश्युज बनवून त्यावर गदारोळ करण्याचे सध्याचे दिवस आहेत. औरंगजेबाचे कोडकौतुक अबू आझमी यांनी सहजासहजी केले नाही. एका समाजाचा रोष पत्करण्याची तयारी ठेवत दुसऱ्या समाजात लोकप्रियता मिळविण्याचा हा फंडा आहे. 

लोकसभेचे मुद्दे विधानसभेला चालले नाहीत. आता विधानसभेचे मुद्दे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चालणार नाहीत, हे चाणाक्ष राजकारण्यांना लगेच कळते. मग अशी पेरणी सुरू होते. मुडदे उकरून काढल्याने महाराष्ट्राचे सामाजिक, धार्मिक सौहार्द टिकणार नाही याचे भान कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना नाही. सत्तापक्षाचे आमदार, मंत्रीच जेव्हा धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा चालवतात तेव्हा दोन प्रकारच्या शंका येतात. एकतर त्यात त्यांचा वैयक्तिक हेतू असावा किंवा अशी उचकवणारी भाषा
बोलण्यास त्यांना सांगितले असावे. प्रार्थना स्थळावरील भोंग्याचा विषय समोर आला आहे. हिंदुत्वावर फोकस करून पुढचे राजकारण करण्याची भाजपची भूमिका दिसते. अजीर्ण होणारे बहुमत मिळालेले असताना राज्याच्या विकासावर फोकस करण्याऐवजी पेटवापेटवी का केली जात आहे? फक्त सत्ताधारीच नव्हेत, विरोधकही तसेच आहेत. जग कुठे चालले आहे, याचे भान तरी या लोकांना आहे का?

वाटण्यात किती जातात? 

पारदर्शक कारभाराची आश्वासक सुरुवात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. त्यासाठी ते अनेक उपाय योजत आहेत. विविध विभागांमध्ये कंत्राटदारांना वरपासून खालपर्यंत द्यावी लागणारी टक्केवारी हा भ्रष्टाचाराच्या मुळाशी असलेला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. 'एकूण कामाच्या ८ पासून २० टक्क्यांपर्यतची रक्कम वाटण्यातच जाते', असे काही कंत्राटदार सांगतात. वेगवेगळ्या विभागाचे अदृश्य रेटकार्ड वेगवेगळे आहे. अर्थात हा पुराव्यापलीकडचा भ्रष्टाचार आहे. तो वरवर दिसत नाही, खोल खाली गेले की त्याची पाळेमुळे कळतात. वाटपाची एक साखळी असते त्यातील प्रत्येक कडीला सुखवावे लागते. आदिवासी विकास, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण, जलसंपदा अशी बरीच खाती आहेत जिथे व्यवहार चालतात. वाटपाचा हा ट्रेल एका कागदावर काढून एकेक करून तो मोडून काढता नाही का येणार?

फुके हे काय बोलले? 

विधानसभेत प्रश्न, लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार होत असल्याचा आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात ऑडिओ, व्हिडिओ क्लिप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्या आहेत. एक आमदारच असे आरोप करत असतील तर ती गंभीर बाब आहे. असे कोणते रॅकेट खरेच असेल का? राईस मिल मालकांना धमकावल्याच्या क्लिप्स फुके यांच्याकडे आहेत. त्यांचा निशाणा कोणावर असावा? असे म्हणतात की काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचा संबंध या प्रकरणाशी जोडला जावू शकतो. धान घोटाळे करणाऱ्यांना सोडणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत म्हणाले होते. ते हेच प्रकरण आहे.

विधान परिषदेचे काय? 

विधान परिषदेवरील पाच जागांची निवडणूक २७मार्चला होणार आहे. विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या या जागा आहेत. भाजपला त्यातील तीन जागा मिळतील. माहिती अशी आहे की प्रदेश भाजपने तब्बल २० जणांची नावे सुचवून ती दिल्लीला निर्णयार्थ पाठविली आहेत. कोणाला राग नको म्हणून वीस जणांची यादी वर पाठवून प्रदेश भाजपने अंग झटकले आहे. उद्या त्यातील तीन नावे दिल्लीहून आली की 'आम्ही तर तुमचेही नाव पाठविले होते', असे प्रत्येकाला सांगायला मोकळे. भाजपच्या प्रत्येक आमदाराला दीडदोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. तरीही खूप स्पर्धा आहे. एक इच्छुक म्हणाले, 'दीड वर्ष तर दीड वर्ष, माजी आमदार हा ठप्पा तर नावासमोर लागतो ना?' भाजपमध्ये पूर्वी संघटनेतील माणसे संघटनेतच वर्षानुवर्षे राहायची; पण आता संघटनेत असलेल्यांनाही सत्तेची पदे हवी आहेत. आपल्यामागून आलेले विधान परिषदेतर गेले आणि आपण हात हलवत बसलो, अशी नाराजी असलेले पाच-सहा जण आहेत, यावेळी त्यांच्यापैकी किती जणांची नाराजी दूर होते ते पहायचे.

जयंत पाटील यांची नाराजी? 

शरद पवार गटात धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे. जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असा हा सुप्त संघर्ष आहे. त्यातच सुप्रियाताईचे जयंतरावांशी फारसे पटत नसल्याची चर्चादेखील आहे. पक्षात आपल्याला पुरेसे स्वातंत्र्य नाही, अशी जयंतरावांची भावना झाली आहे म्हणतात. ते अजित पवार गटात जात असल्याचा दावा शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट करत आहेत. 'माझे मन कशात लागत नाही', असे ते आपल्याला म्हणाल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे. इकडे अजितदादांचे एक मंत्रिपद रिकामे आहे, म्हणून चर्चेला अधिकच पेव फुटले आहे.

जाता जाता

बाळा नांदगावकर यांनी कुंभमेळ्यातून मोठ्या श्रद्धेने राजसाहेबांसाठी गंगाजल आणले अन् राजसाहेब तरी काय? नांदगावकरांना चक्क 'हुड' म्हणाले. नागपुरात एका भागाचे नाव आहे हुडकेश्वर. नांद‌गावकर हे मनसेतले नते 'हुड'केश्वर आहेत.

yadu.joshi@lokmat.com
 

Web Title: Article on Why are ruling party MLAs and ministers driving the agenda of religious polarization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.