भारताच्या स्वधर्माची राखण तुम्ही करणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 06:30 AM2022-10-20T06:30:42+5:302022-10-20T06:31:09+5:30
समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही : भारताचा मूलाधार असलेल्या या तीन मूल्यांवर आज एकाचवेळी हल्ले होत आहेत; आपण सगळे काय करणार?
योगेंद्र यादव,
संयुक्त किसान मोर्चाचे नेते
आजच्या परिस्थितीचे मूल्यमापन करायचे तर त्यासाठी एखादे पुस्तक, विचारधारा किंवा एखाद्या व्यक्तीचे विचार हे निकष होऊ शकणार नाहीत. भारताचा स्वधर्म हाच आज देशाची परिस्थिती समजून घेण्याचा निकष होऊ शकतो. करुणा, मैत्री आणि शील यांचा त्रिवेणी संगम भारताच्या स्वधर्माला परिभाषित करतो, हेही आपण पाहिले.
समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या तीन गोष्टी आपल्या संस्कृतीच्या आदर्शांचे आधुनिक रूप आहे. तर मग आज या तीन मूल्यांवर हल्ला होत आहे का? तो हल्ला किती भयंकर आहे? गेल्या ७५ वर्षांत भारताच्या स्वधर्माच्या बाबतीत कधीही न्याय झाला नाही, हे वास्तव आहे. सत्तेवर कुठलाही पक्ष असो, त्याने धर्माच्या नावाने अधर्माचाच प्रसार केला आहे.
फाळणीच्या संकटातून निर्माण झालेल्या या देशासाठी सांप्रदायिक सदभाव, विशेषतः हिंदू मुस्लिम एकता सांभाळणे हे सगळ्यात मोठे आव्हान राहिले आहे. गेल्या ७५ वर्षांत या आदर्शावर वारंवार आघात झाले. हिंदू-मुस्लिम ऐक्याला आव्हान देणाऱ्या सर्व घटना आणि दंगलींच्या व्यतिरिक्त पोलीस, प्रशासन आणि नेते एका बाजूची भूमिका घेऊन उभे राहिले, असे अनेकदा घडले. मग तो १९८४ मध्ये झालेला शिखांचा नरसंहार असो, नेली, मलियाना तसेच गुजरातमधील कत्तली असोत किंवा काश्मिरी पंडितांचे नाईलाजाने झालेले पलायन. या सर्व भारताच्या स्वधर्मावर झालेल्या हल्ल्याच्या घटना आहेत; परंतु गेल्या काही वर्षांत हे हल्ले अधिक घातक होत गेले.
पहिल्यांदा नागरिकता कायद्यात दुरुस्ती करून धर्माच्या आधारावर नागरिकांचा दर्जा ठरवून वाटणी झाली. सार्वजनिक व्यासपीठावरून धर्माच्या नावाने नरसंहाराचे आवाहन केले जाऊ लागले. रस्त्यांवर माणसे ओळखून, ठेचून मारली गेली. धार्मिक भेदभाव इतके दिवस अपवादाने होत असे; तो आता सामान्य नियम केला गेला आहे. सत्तेच्या शीर्षस्थानावरून खुलेआम अल्पसंख्याक समुदायाच्या विरुद्ध जनमत भडकवले जात आहे. ७५ वर्षांनंतरसुद्धा गरिबी भूकबळी आणि कुपोषण असणे हा समतेच्या आदर्शावर कलंक आहे. अलीकडेच जाहीर झालेल्या आकडेवारीवरून असे दिसते की काही दशके कुपोषण आणि भूकबळी कमी झाले होते; परंतु पुन्हा एकदा देशात त्याचे प्रमाण वाढले आहे. बेरोजगारीचा भडका एकीकडे परंतु गेल्या अडीच वर्षांत गौतम अदानी यांची संपत्ती मात्र ६६ हजार कोटी रुपयांनी वाढून १२ लाख कोटी रुपये झाली. समतेच्या घटनात्मक आदर्शांची अशी पायमल्ली या देशाने कधी पाहिली नव्हती.
शील या आदर्शातून सत्तेच्या मर्यादा आणि लोकशाहीचा विचार जन्माला आला. जवाहरलाल नेहरू यांच्या काळात लोकशाहीतील मर्यादा निश्चितीचे पालन झाले; परंतु इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर लोकशाही मूल्यांचा ऱ्हास झाला. आणीबाणीत भारताच्या लोकशाहीवर सर्वात मोठा डाग लागला. त्यानंतरही नागरिकांचे स्वातंत्र्य आणि घटनात्मक मर्यादांचे उल्लंघन होत राहिले. सत्तेचा हात लोकांवर कायम उगारलेलाच राहिला. विशेषतः मागच्या तीन वर्षांत तर सर्व मर्यादा धुडकावल्या गेल्या. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयासारख्या संस्थांचा दुरुपयोग यापूर्वीही झाला होता; परंतु सरळ सरळ राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्याच्या बाबतीत आता कोणताच विधिनिषेध बाळगला जात नाही. निवडणूक आयोगाच्या बाबतीत तर आता एवढाच प्रश्न उरला आहे की ते सत्तेवरच्या सरकारचे कार्यालय आहे की पक्षाचे? न्यायव्यवस्थेनेही स्वतःहून आपल्या मर्यादा आखून घेतल्या आहेत. मुख्य प्रवाहातील माध्यमे कमी-जास्त प्रमाणात सत्तारूढ पक्षाच्या खिशातच आहेत. जो बोलण्याची हिंमत दाखवतो त्याला तुरुंगाचा रस्ता दाखवला जातो.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात स्वधर्मावरचा हा पहिला हल्ला नाही, हे उघडच होय; परंतु आज होत असलेला हल्ला चार प्रकारांनी अभूतपूर्व आणि अत्यंत घातक आहे. पूर्वी एकावेळी तीनपैकी एखाद्या आदर्शावर हल्ला होत असे, आता तिन्हीच्या तिन्ही आदर्शांवर एकाच वेळी हल्ला होत आहे. शिवाय हे हल्ले घटनात्मकरीत्या सत्तेवर आलेल्या शक्तींनी प्रायोजित केलेले आहेत. खूप मोठी संघटनात्मक ताकद आणि बेसुमार पैसा यांनी या हल्ल्याला बळ पुरवले आहे. आज भारतीय संस्कृतीचा गौरवशाली वारसा, भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा इतिहास आणि भारतीय घटनेच्या आदर्शांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा एकच धर्म असू शकतो : तन, मन, धन आणि गरज असेल तर आपल्या प्राणापेक्षा प्रिय अशा भारताच्या स्वधर्माची राखण त्याने करावी.