बळी : एक शाश्वत मूल्यव्यवस्था...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 08:23 AM2018-11-08T08:23:35+5:302018-11-08T08:29:06+5:30
बळी म्हटलं की शेतकऱ्यांचा एक राजा अशी प्रतिमा आपल्यापुढे उभी रहाते. आपल्या पौराणिक संदर्भात बळीचे जे उल्लेख आढळतात त्यावरून तो कृषक समाजाचा सामूहिक प्रातिनिधित्व करणारा एक विचारवंत म्हणूनही त्याचा विचार करावासा वाटतो.
डॉ. गिरधर पाटील
बळी म्हटलं की शेतकऱ्यांचा एक राजा अशी प्रतिमा आपल्यापुढे उभी रहाते. आपल्या पौराणिक संदर्भात बळीचे जे उल्लेख आढळतात त्यावरून तो कृषक समाजाचा सामूहिक प्रातिनिधित्व करणारा एक विचारवंत म्हणूनही त्याचा विचार करावासा वाटतो. मानवी जीवनाच्या ज्या मूलभूत प्रेरणांबद्दल मार्क्सने केलेले विवेचन ज्या पध्दतीने साऱ्या जगाने एक नवा विचार म्हणून स्वीकारलेले दिसत असले तरी या विचाराची पाळेमुळे बळीराजाच्या तत्वज्ञानात रोवलेली दिसून येतात. त्यात जीवन जगण्याच्याच मूळ प्रेरणा नव्हे तर सामूहिक जीवनातील काय मूल्ये सर्वसमावेशक ठरत एक आदर्श न्याय्य समाज व्यवस्था कशी असावी याचीही उत्तरे मिळतात.
राजा म्हणजे केवळ नियंत्रक वा शासक नसावा तर सा-या रयतेला एक प्रोत्साहनात्मक उर्जा देणारा स्त्रोत असावा असे त्याचे सामूहिक नेतृत्वाचे गुणविशेष मानता येतील. बळी, चार्वाक व नंतर बुध्दाने बुध्दीप्रामाण्य, वस्तुनिष्ठता व अनुभवसिध्दता यावर भर देत मानवी इतिहासाला एक वेगळे वळण दिल्याचे दिसते. तोच धागा पुढे नेत अगदी अलिकडच्या काळातील आयन रँड या तत्ववेत्तीने मांडलेली उदारमतवादी व वस्तुनिष्ठता विचारप्रणाली ही बळीराजा व चार्वाकाच्या संदर्भात आढळून येते. कालानुरु प त्यात पुढे विज्ञानवादही जोडला गेला व आताशा या विचारसरणीला ज्या प्रमाणात साऱ्या जगात मान्यता मिळते आहे त्यावरून ते जीवनाचे एक महत्वाचे तत्वज्ञान ठरू लागले आहे. हे सारे खरे असले तरी मला यातील एक महत्वाचा घागा जो अजूनही विचारवंताच्या चर्चेत फारसा येत नाही तो म्हणजे मानवी जीवनातील शाश्वत मूल्यव्यवस्थेचा. यात प्रमुख संघर्ष आजच्या संदर्भात जोडता येतो तो श्रममूल्यांचा व शोषण प्रवृत्तींचा. म्हणजे स्वत:च्या श्रमातून आपल्या जीवनावश्यक गरजा भागवणे, त्याचवेळी अशा गरजा आपल्या शोषण क्षमतांतून भागवणे या भिन्न प्रवृत्तींच्या संघर्षाचा इतिहासच आपल्याला पूर्णपणे मांडता येतो. आपल्या प्राचीन साहित्यात जी मूल्ये स्थिरस्थावर झालेली वा केलेली दिसतात ती प्रामुख्याने श्रुतींवर आधारलेली दिसतात. तशा श्रुती दोन, एक वैदिकी, म्हणजे वेदांवर आधारलेली व दुसरी म्हणजे तांत्रिक, जी प्रत्यक्ष जीवनाशी निगडीत अशा स्वानुभवाशी जोडलेली दिसते. तसा तांत्रिकचा दुसरा अर्थ हा कृषि वा शेती असा आहे. तो प्रत्यक्ष उत्पादनाशी निगडीत असा श्रममूल्यांशी जोडला गेला आहे.
सिंधू संस्कृती जिचा नेहमी उल्लेख केला जातो ती संस्कृती ही शेतीशी संबंधित होती व त्यातील साऱ्या गोष्टी या जगण्याच्या प्रत्यक्ष अनुभवविश्वाशी प्रामाणिक रहात मांडल्या जात असत. पुढे मात्र या संस्कृतीवर आक्रमणे होत वैदिकी श्रुतीचा प्रवेश झाला व त्यातून एक प्रचंड काल्पनिक वैदिक संकल्पना रुढ करत तत्कालिन जनतेवर असुरिक्षतता व भितीच्या माध्यमातून का होईना जनमानसात स्थिरावलेली दिसते. निसर्गनियमांचा एका काल्पनिक शक्तीशी संबंध जोडत देवधर्म, ऐहिक-पारलौकिक, स्वर्ग-नरक, मोक्ष-जन्म, पाप-पुण्य, देव-दानव अशी मांडणी करत एक नवे भावविश्व उभारण्यात आले. यात वस्तुनिष्ठतेला व बुध्दीप्रामाण्याला मुळीच वाव नसल्याने भितीपोटी जे समाज यात गुरफटले गेले त्यांच्या विचार प्रक्रिया क्षमतेत अत्यंत मूलगामी परिणाम होत एक देवभोळा, निष्क्रिय व स्वतंत्र बुध्दी गमावलेला समाज केवळ उत्पादनाचे एक प्रमुख साधन म्हणून उदयास आला. तो आजचा शेतकरी समाज. या मूळ संस्कृतीचे काही गुणविशेष लक्षात घेतले तर या संस्कृतीची स्वत:ची अशी एक भाषा होती. ती त्याकाळी प्राकृती आर्ष म्हणून ओळखली जात असे. त्याकाळच्या ऋतींच्या वैराज स्त्रीराज्याची भाषा म्हणूनही ती ओळखली जात असे. स्त्रीसत्ताक राज्यपध्दती हे या संस्कृतीचे गमक होते. शेतीचा शोध हा स्त्रीनेच लावला असल्याने तिच्या हातीच सारी निर्णयक्षमता एकवटलेली दिसते. निर्ऋित ही कृषिमायेची आद्यगणमाता. भारतात देवांच्या मंदिरांपेक्षा देवींची मंदिरे जास्त आहेत व या सार्या देवी कृषिला पूरक असणाऱ्या नद्यांची खोरी व सिंचनाच्या प्रदेशातच आढळतात. तुळजापूरची तुळजाभवानी ही शेतमालाच्या उत्पादनाची तुलना म्हणजे आकारमानाच्या मोजमापाशी वा संतुलित वाटपाशी संबंधीत असावी. कोल्हापूरची अंबाबाई, यवतमाळच्या हिवरा संगमची एकवीरा ही सारी त्या काळच्या कृषिसंस्कृतीची प्रतिके आहेत. याच संस्कृतीचे एक वैशिष्ठ्य म्हणजे कृषितंत्राचा अक्षपट. गणतिात अधिकचे चिन्ह असते त्या चार बाजू असलेल्या अक्षपटात प्रत्येक बाजू ही चोवीस घरांची या प्रमाणे शहाण्णव घरांची आखणी केलेली आढळते. ही शेती संबंधीची शहाण्णव कुळे असून आजतागायत त्याचे सारे संदर्भ तसेच जिवंत आहेत. कुळ म्हणजे नांगर व तो वापरणारा कुळवाडी हा संदर्भ महात्मा फुल्यांच्या साहित्यात आढळतो. अशी ही भारतीय मूलवंशीय कृषिसंस्कृती त्याकाळी ग्रामीण जीवनाशी एकरूप होत, खेड्यांची निर्मिती, विकास व शेतउत्पादन याबाबतीत तत्कालिन जगात सर्वाेत्कृष्ट होती.
भारतीय शेतमालाच्या बाजारपेठा अगदी कालपर्यंत साऱ्या जगात नावाजलेल्या होत्या. भारतावरील सारी आक्रमणे या समृध्दीच्या हव्यासा पोटीच होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कालातंराने अतिक्रिमत घटकांमुळे त्यांतील शोषक वृत्तींनी परिपूर्ण अशी वैदिक संस्कृती प्रस्थापित होत या श्रमजीवी संस्कृतीची काही प्रमाणात पिछेहाट झाल्याचे दिसत असले तरी हा संघर्ष कित्येक शतकांपासून तसाच जिवंत असून शिक्षणाची साधने हिरावत वा निरर्थक व वेचक शिक्षणाची बहुजनांना उपलब्ध होत एक मोठा समाज मानवी समाजात होणाऱ्या प्रगती, विकास वा तत्सम उलथापालथीपासून दूर ठेवण्यात आला. आता नियतीची चक्रे परत एकदा श्रमजीवी संस्कृतीच्या बाजूने फिरू लागली असून शेतीच्या शोषणाची नेमकी कारणे व त्याचा प्रचिलत राज्य व्यवस्था म्हणजे सरकार यांच्याशी काय संबंध आहे हे नव्याने मांडत हा सारा दूर्लक्षित व वंचित समाज परत एकदा आपल्या विहित हक्कांसाठी संघर्षाच्या पवित्र्यात उभा ठाकलेला दिसतो. शेतीच्या मागे लागलेली ही शोषक शुक्लकाष्ठे म्हणजे इडा पिडा टळू दे, व बळीचे राज्य येऊ दे असा घोषा या संस्कृतीतील अदिशक्तीचे प्रतिक असलेल्या स्त्री वर्गाकडून केला जातो. आज सा-या जगात शोषणावर आधारित ज्या संस्कृती विकसित झाल्या आहेत त्या तर विनाशाच्या कडेलोटावर उभ्या असलेल्या दिसतात. यात सारी शहरे येतात व त्यात कार्यरत असणाऱ्या राज्य व अर्थ व्यवस्था यांचा समावेश होतो. त्यात होणार्या उलाढाली या साऱ्या जगाला अनिश्चिततेच्या मार्गाने नेण्याऱ्या सिध्द झाल्या आहेत. अगदी अमेरिकेत ज्या आर्थिक अरिष्टांनी त्या देशाला हेलावून सोडले होते त्याच प्रकारच्या संकटात भारतासारखे देश मात्र फारसे इजा न होता तगून राहिले या मागचे खरे कारण या देशाचे सारे तत्वज्ञान काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले आहे व त्याला सांभाळणे, प्रोत्साहित करणे ही आजच्या काळाची गरज आहे एवढे लक्षात ठेवले तरी पुरे !!
(शेती विषयाचे अभ्यासक)