फक्त सव्वाआठ मिनिटांत कापा तब्बल दोन किलोमीटर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 06:05 AM2021-01-29T06:05:52+5:302021-01-29T06:06:30+5:30

गंमत अशी की सौरव गांगुली स्वत: खेळत होता तेव्हा स्वत:ची धावही न धावण्यासाठी तो प्रसिद्ध होता. ‘बीसीसीआय’ने तंदुरूस्तीचा ‘बार’ आता मात्र आणखी उंचावलाय.

Article on Sports fitness, Cut two kilometers in just 8.15 minutes! | फक्त सव्वाआठ मिनिटांत कापा तब्बल दोन किलोमीटर!

फक्त सव्वाआठ मिनिटांत कापा तब्बल दोन किलोमीटर!

Next

सुकृत करंदीकर, सहसंपादक, लोकमत

तग धरण्याची दीर्घ क्षमता, वेग, ताकद, लवचीकता, सहनशक्ती, शक्ती या ‘षटकारा’ची साथ कोणत्याही खेळात दमदार होण्यासाठी आवश्यक असते.  ऊर्जावान शरीराला बुद्धिमान मेंदूची आणि ताण सोसणाऱ्या करारी, विजिगीषू मनाची साथ असावी लागते. तेवढ्यावरही भागत नाही. या सगळ्या गुणांचा गुच्छ जुळला तरी खेळाबद्दलची तीव्र ओढ, आसक्ती ही मुळात आतूनच असावी लागते. तर आणि तरच खेळातली अशी काही कौशल्यं अंगात येतात की जग तोंडात बोट घालतं. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून मग तो खेळाडू  ‘दैवी’, ‘आउट ऑफ द वर्ल्ड’, ‘अमानवी’ वगैरे वाटू लागतो. ‘पोटातूनच शिकून आला किंवा आली’ असे लोक बोलू लागतात. खरंतर, असं काहीही नसतं. आई-वडिलांकडून, आधीच्या पिढ्यांकडून मिळालेल्या गुणसूत्रांमुळं काही शारीरिक गुणवैशिष्ट्यं जरूर जन्मजात असतात, पण त्यालाही आकार द्यावा लागतो. कोणत्याही महान खेळाडूकडे त्या-त्या खेळातली जन्मजात कौशल्यं, दैवी देणगी असला काहीही प्रकार नसतो. असतो तो प्रचंड त्याग, जबरदस्त चिकाटी. टोकाचं समर्पण. तासन् तास गाळलेला घाम.

यशापयशाचा विचार न करता सरावात राखलेलं सातत्य. प्रतिस्पर्ध्याची बलस्थानं हेरून त्यावर मात करण्यासाठी केलेले अविरत प्रयत्न. यातूनच महान खेळाडू घडतो. याला ‘शॉर्ट कट’ नाही आणि यातलं काही सोपंही नाही. म्हणून तर एखाद्याच रॉजर फेडररची नजाकत दुर्मीळ असते. महंमद अलीच्या ताकदी ठोशांची छाप मिटत नाही. रोनाल्डो-मेस्सीचं अफलातून पदलालित्य आणि तुफान वेग वेड लावतो. चित्त्यालाही मागे टाकणाऱ्या युसेन बोल्टची धाव जिवंतपणीच चमत्कार ठरते. आर्नोल्ड श्वार्झनेगरच्या संगमरवरी शरीराची छायाचित्रं नसलेली एकही जीम जगात नसते. आजवर सर्वाधिक २८ ऑलिम्पिक पदकं जिंकणारा मायकेल फेल्प्स हा जलतरणपटू ‘जादुई शार्क’ वाटायला लागतो. ‘परफेक्ट टेन’ नादिया कोमेन्सीच्या कमनीय कलात्मकतेवर जग फिदा होतं. अर्थात प्रत्येक खेळासाठी आवश्यक शारीरिक कौशल्यं वेगळी आहेत. लांबवर गोळाफेक करणारा ऑलिम्पिक विजेता क्रिकेटमध्ये ब्रेट लीच्या वेगाने चेंडू नाही फेकू शकत.

ढोबळमानानं सांगायचं तर खेळ कोणताही असो (बुद्धिबळासारख्या बैठ्या खेळाचा अपवाद वगळून) वेग, लवचीकपणा, शक्ती, तग धरण्याची दीर्घ क्षमता आणि सहनशक्ती याला पर्याय नाही. या मोजपट्टीवर पाहता शारीरिक आणि मानसिक क्षमतांची कसोटी पाहणारा फुटबॉलसारखा दुसरा खेळ नाही. त्या तुलनेत भारताचा अघोषित ‘राष्ट्रीय’ खेळ क्रिकेट फारच सोपा. म्हटलं तर एकाचवेळी तेरा जण मैदानात असतात; पण प्रत्यक्षात फार तर दोघे-तिघेच एकावेळी खेळतात. बाकीचे आठ-नऊ जण निवांत. म्हणजे गोलंदाज चेंडू फेकतो. फलंदाजानं तो फटकावला तर एखाद-दुसरा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो. फलंदाजानं चेंडू सोडला तर यष्टीरक्षक तो अडवतो. बाकीचे च्युईंग गम चघळण्यासाठी मोकळेच. एवढा निवांतपणा अपवाद वगळता इतर खेळात नाही. क्रिकेटचा जन्म झाला तोच मुळी फुटबॉलसारखे वेगवान खेळ खेळू न शकणाऱ्या मध्यमवयीनांसाठी. पण, हा झाला इतिहास. आत्ताचं क्रिकेट खूप वेगवान, स्पर्धात्मक झाल्यानं तंदुरुस्तीला कधी नव्हे इतकं महत्त्व आलंय. नव्वदीच्या दशकापर्यंत ढेरपोटे खेळाडू क्रिकेटच्या मैदानात दिसत. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांनी क्रिकेटमध्ये तंदुरुस्ती, व्यावसायिकता आणली. भारतही गेल्या दोन दशकांत त्यांच्या तोडीस तोड झालाय.

क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीचा ‘बार’ भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) आता आणखी उंचावलाय. भारतीय संघात  येणाऱ्या गोलंदाजांना दोन किलोमीटर अंतर फक्त सव्वाआठ मिनिटांत कापणं अनिवार्य केलं आहे. फिरकी गोलंदाज आणि यष्टीरक्षकाला ही  ‘टेस्ट’ साडेआठ मिनिटांत द्यावी लागेल. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या नियमांना अनुमती दिलीय. यापूर्वी ‘बीसीसीआय’नं आणलेल्या ‘यो-यो टेस्ट’मुळे भारत  इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला तितक्याच जोमानं टक्कर देऊ लागला हे वास्तव आहे. कौशल्यांबरोबरच स्टॅमिना, एन्ड्युरन्सवरही भर दिल्याने भारतीय क्रिकेट आणखी दमदार होईल. हेच ‘कल्चर’ अन्य खेळात झिरपलं तर ऑलिम्पिक पदकं भारतासाठी दुर्मीळ राहणार नाहीत.

Web Title: Article on Sports fitness, Cut two kilometers in just 8.15 minutes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.