निवडणूक प्रभावासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 06:29 AM2019-04-09T06:29:39+5:302019-04-09T06:29:48+5:30
भारतात सिंहासन कुणाचे याची लढाई निवडणुकीच्या माध्यमातून होत असते. आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे.
भारतात सिंहासन कुणाचे याची लढाई निवडणुकीच्या माध्यमातून होत असते. आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाकडून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत असताना निवडणुका कशाप्रकारे जिंकल्या जातील? भविष्यातील निवडणुका कशाप्रकरे लढल्या जातील? आजच्या निवडणुकीच्या पद्धती तंत्रज्ञानाने उधळून लावल्या जातील. पण त्यामुळे जनप्रतिनिधींच्या लोकसंबंधावर परिणाम होईल का? पूर्वीची निवडणुकीची पद्धत लांबलचक व कंटाळवाणी होती. त्या दृष्टीने आजची पद्धत अधिक सुटसुटीत झाली आहे. पण त्यामुळे माणसाच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. दर पाच वर्षांनी दोन महिन्यांसाठी निवडणुकीच्या कार्यक्रमात कोट्यवधी लोक सहभागी होत असतात. पूर्वी मतपत्रिका मतपेटीत टाकावी लागायची. आता मतपेटीची जागा मतदान यंत्राने घेतली आहे. आता पुढचा टप्पा कोणता असेल? आधार कार्ड व तंत्रज्ञान यांचा वापर करून नागरिकांना कुठेही मतदान करता येईल का? मग लोकांनी मतदान केंद्रावर जाण्याची गरजच काय? त्या परिस्थितीत १०० टक्के मतदान होऊ शकते व आपल्या देशाच्या लोकशाहीचा दर्जाही उंचावेल.
आधुनिक इतिहासात राजकीय पक्षांसाठी तसेच उमेदवारांसाठी मर्यादित पारंपरिक साधने होती. पण आता मोठ्या प्रमाणात माहिती व त्या माहितीचे पृथक्करण उपलब्ध असते. त्यामुळे निवडणूक प्रचाराची परिणामकारकता वाढली आहे. त्यामुळे हृदय आणि मन एकत्र येऊन शासन करू लागले आहे. आज होणाऱ्या निवडणुकासुद्धा माहिती व माहितीचे पृथक्करण यामुळे प्रभावित झाल्या आहेत. व्यापाराच्या क्षेत्रात गोरिला मार्केटिंगने जाहिरातीचे धोरण ठरविले जाते. अधिक परिणामकारकतेसाठी कमी खर्चाचे अपारंपरिक तंत्र वापरण्यात येते. सोशल मीडिया हा गोरिला मार्केटिंगसारखाच आहे. त्यामुळे लोकांचे मतपरिवर्तन मोठ्या प्रमाणावर घडून त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात पाहावयास मिळू लागला आहे. सोशल मीडियाचा वापर करण्याऐवजी माहितीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. माहितीमुळे टार्गेट निश्चित करणे सोपे जाते व त्यामुळे देशभर मतदारांचा कलसुद्धा निश्चित करता येतो.
नवे उत्पादन जेव्हा बाजारात आणण्यात येते तेव्हा ग्राहकांकडून त्याचा स्वीकार कसा होतो याकडे जसे लक्ष देण्यात येते, त्याचप्रमाणे डावपेच तज्ज्ञांकडून लोकापर्यंत विशिष्ट संदेश पोहोचविण्याचे काम केले जाते. भविष्यातील प्रचारात व्यक्तीला लक्ष्य करताना त्यांच्या आवडीनिवडीकडेही लक्ष पुरविले जाईल. आगामी पंतप्रधान हा माहिती आणि सोशल मीडिया यांच्या बेरजेतून निश्चित केला जाऊ शकतो. या माहितीकेंद्रित प्रचारामुळे राजकीय पक्षांना प्रचाराची दिशा ठरविता येईल. तसेच निवडणुकीचे फलित काय असेल याविषयी अंदाज वर्तवणे शक्य होईल. नव्या तंत्रज्ञानामुळे हॅशटॅग टार्गेटिंगच्या माध्यमातून स्मार्ट फोन आणि संगणकाचा वापर पेड मीडियाप्रमाणे करता येईल. एखाद्या राजकीय पक्षाच्या माहितीची पाने फेसबुकवरून काढून टाकल्याने होणारा परिणाम मर्यादित असेल आणि ते लोकांच्या दबावाखाली करण्यात आल्याचे आरोपही होतील.
आज सोशल मीडियावरून माहितीचे आदानप्रदान मोठ्या प्रमाणावर होत आहे. आपण जगात कुठेही आपला मोबाइल आपल्या सोबत नेतो तेव्हा ही माहितीसुद्धा सोबत नेत असतो. अशा स्थितीत प्रचार मोहिमा चालविणाऱ्याकडून ग्राहकांना माहिती पुरविण्यासाठी नवीन मार्ग शोधले जातील. सध्या संगणक, मोबाइल आणि टॅब्लेट यांचा वापर होतच आहे. पण यांत्रिक शिक्षणामुळे सांख्यिकीच्या आधाराने डेटा समजून घेण्याचे कार्य आपोआप होणार आहे. त्यांच्यामुळे निवडणूक निकषाचे भाकीत करता येईल. तसेच मतदारांनासुद्धा त्यामुळे महत्त्वाचे विषय कोणते आहेत हे जाणून घेता येईल. त्यादृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता ही केकवरील आयसिंगसारखी वाटेल. वास्तविक कृत्रिम बुद्धिमत्ता ही मतदार आणि निवडणूक निकालांना प्रभावित करू शकेल. २०१६ च्या अमेरिकेच्या अध्यक्षाने निवडणुकीत ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ या डेटाचे पृथक्करण करणाºया संस्थेने मतदारांना प्रभावित करण्यासाठी जाहिरात मोहीम चालविली होती. त्याची अजूनही चौकशी सुरू आहे.
अशा स्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता ही निवडणुकीसाठी वाईट असे समजण्याचे कारण नाही. जी यंत्रणा लोकांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्यासाठी वापरली जाते तीच यंत्रणा लोकशाहीच्या भल्यासाठीसुद्धा वापरली जाऊ शकते. रोबोट्सचा वापर चुकीची माहिती व खोट्या बातम्या देणे थांबविण्यासाठीही केला जाऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता त्यांच्याकडील माहितीचे पृथक्करण करून बातमी खोटी का असावी हे सांगू शकेल. तसेच एखाद्या उमेदवाराच्या राजकीय चारित्र्याचे पृथक्करण करून तो उमेदवार किंवा त्याचा पक्ष कसा विश्वासार्ह नाही हे कृत्रिम बुद्धिमत्ता सांगू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा राजकारणासाठी होणारा वापर योग्य तºहेने व्हायला हवा. मतदारांना बहकवण्यासाठी तो केला तर त्याने लोकशाही डावलली जाईल. दुर्दैवाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग लोकांकडून हत्यारासारखा केला जात असून लोक हे भावनाप्रधान असतात. भविष्यातील निवडणुका या स्टार वॉर्स तर ठरणार नाहीत ना?
- डॉ. एस. एस. मंठा
माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू