‘आनंदयात्री’ हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:31 AM2018-05-08T04:31:29+5:302018-05-08T04:31:29+5:30
गेली ६० वर्षे मराठी भावसंगीतावर अधिराज्य गाजविणारे लोकप्रिय गायक अरुण दाते रविवारी कालवश झाले. त्यांच्या रूपाने जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे, सुधीर फडके या मराठी भावगीतांच्या सुवर्ण पर्वातील आणखी एक तारा निखळून पडला आहे. दाते यांचे वैशिष्ट्य असे की, ते मराठी असले, तरी मराठी भाषक नव्हते.
गेली ६० वर्षे मराठी भावसंगीतावर अधिराज्य गाजविणारे लोकप्रिय गायक अरुण दाते रविवारी कालवश झाले. त्यांच्या रूपाने जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे, सुधीर फडके या मराठी भावगीतांच्या सुवर्ण पर्वातील आणखी एक तारा निखळून पडला आहे. दाते यांचे वैशिष्ट्य असे की, ते मराठी असले, तरी मराठी भाषक नव्हते. त्यांच्या घरात रसिकतेची परंपरा असली, तरी गायनाची परंपरा नव्हती. मात्र, अरुण दातेंचे भाग्य एवढे थोर होते की, त्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिले गाणे खुद्द कुमार गंधर्वांनी शिकविले. एकदा कुमार त्यांना म्हणाले, तू फार छान गुणगुणतोस, तुझा आवाजही चांगला आहे. चल मी तुला गाणे शिकवितो. कुमारांनी त्यांना उर्दू गझल म्हणायला शिकविली. आयुष्यात त्यांनी गायलेली ती पहिली गझल. बिरला समूहातील बड्या कंपनीच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळीत असताना, त्यांनी भावगीत गायनाचे अनोखे पर्व साकार केले होते. जेव्हा नोकरी की भावगीत गायन, असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय तत्काळ घेऊन टाकला आणि नोकरीतून मिळणाऱ्या दरमहा ३० हजार रुपये पगाराच्या अनेक पटीने अधिक पैसा आपल्या गायनाच्या कार्यक्रमातून सातत्याने मिळविला. त्यांनी कधीही दुसºया गायकाची गाणी गायली नाहीत, हे त्यांचे अनोखे वैशिष्ट्य होते. कमालीची कृतज्ञता आणि नम्रता हा त्यांचा स्थायी भाव होता. जी. एन. जोशी यांनी मराठी भावगीताची परंपरा निर्माण केली, तिच्यामुळेच आपण यशस्वी ठरलो, या कृतज्ञभावापोटी त्यांनी पदरचे ८५ हजार रुपये खर्चून, जोशी यांचा ८५वा वाढदिवस साजरा केला होता. बिरला समूहातील उपाध्यक्षपदाची नोकरी सोडल्यानंतर, मिळालेल्या पीएफ आणि गॅ्रच्युईटीच्या घसघशीत रकमेतून गीतकार पाडगावकर आणि संगीतकार श्रीनिवास खळे व यशवंत देव यांना, एक-एक लाख रुपये कृतज्ञतेपोटी घरी जाऊन अर्पण करण्याचे दातृत्व केवळ दातेच दाखवू शकत होते. मराठी भावगीतात दोनच गायक उच्च विद्या विभूषित होते. एक अरुण दाते, जे मॅकेनिकल इंजिनीअर व्हिजेटीआयमधून झाले होते आणि दुसरे श्रीधर फडके. गेली काही वर्षे अरुण दाते यांना स्मृतिभं्रशाच्या विकाराने ग्रासले होते. त्यामुळे ते रुग्णशय्येला खिळलेले होते. आयुष्यात सगळी सुखे त्यांनी प्राप्त केली होती. त्यांचे आयुष्य तृप्ततेने भरलेले होते. त्यामुळेच निद्रावस्थेतच त्यांना मृत्यू आला. कलावंताचे शालीनतेचे व सुसंस्कृत असे आयुष्य कसे असावे, याचा वस्तुपाठ म्हणजे
त्यांचे आयुष्य होते. त्यांच्यासारखा भावगीत गायक पुन्हा
होणार नाही.