Aryan Khan Case: समीर रॉकेट, नवाब बॉम्ब; फटाके दोन्ही बाजूंनी फुटत राहतील, पण...

By यदू जोशी | Published: October 29, 2021 08:28 AM2021-10-29T08:28:21+5:302021-10-29T08:28:59+5:30

Aryan Khan Drugs Case : बॉलिवूडची बदनामी राज्य सरकार अंगावर घेताना दिसत आहे. आणि इकडे भाजपवालेही एनसीबीचे वकील बनले आहेत!

Aryan Khan Drugs Case : Sameer Rocket, Nawab Bomb ... Firecrackers before Diwali! | Aryan Khan Case: समीर रॉकेट, नवाब बॉम्ब; फटाके दोन्ही बाजूंनी फुटत राहतील, पण...

Aryan Khan Case: समीर रॉकेट, नवाब बॉम्ब; फटाके दोन्ही बाजूंनी फुटत राहतील, पण...

Next

- यदु जोशी
वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

दिवाळी तीन दिवसांवर आली आहे, पण त्याआधीच ‘एनसीपी विरुद्ध एनसीबी’ असा सामना रंगलाय. नवाब बॉम्ब, समीर रॉकेट असे नवे फटाके बाजारात आले आहेत. राकट, कणखर, दगडांच्या महाराष्ट्र देशाचं चित्र आता हर्बल देशा, गांजाच्या देशा असं रंगवलं जात आहे. समुद्रात क्रूझवर झालेल्या ड्रग पार्टीत आर्यन शाहरुख खान पकडला गेल्याच्या घटनेचा प्रवास ‘वानखेडे हे हिंदू की मुस्लिम?’ या वादापर्यंत येऊन पोहोचला आहे. शोले या एकाच सुपरहिट सिनेमात अनेक उपकथानकं अन् अनेक पात्रं होती. गब्बर, जय, वीरू, ठाकूर, बसंती, सांबा, कालिया, सुरमा भोपाली, जेलर अशा डझनभर कॅरेक्टर्सनी शोले गाजवला. आता ड्रग्ज प्रकरणातील आर्यनचं मूळ कथानक मागे पडलं असून, समीर आणि मलिक यांच्यात नवाबी मुकाबला सुरू झाला आहे. पिक्चर अभी बाकी है... अशा पद्धतीनं दोन्ही बाजूंनी रोजच्या रोज फैरी झडत आहेत. प्रकरणाचा पूर्ण ‘शोले’ झाला आहे. एकेक नवं कॅरेक्टर रोज समोर येत आहे. 

कोरोनाकाळात सिनेमे बंद असल्यानं मनोरंजनाचं साधन नव्हतं. आता सिनेमे सुरू झाले तरी तिथे गर्दी नाही. नवाब मलिक, एनसीबीच टीआरपी खेचत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आतापर्यंत झालेल्या बहुतेक आरोपांमध्ये भाजप आक्रमक अन् तीन पक्षांचं सरकार बॅकफूटवर असं चित्र होतं. ड्रग्ज प्रकरणात ज्यांचा जावई आठ महिने जेलमध्ये राहिला ते नवाब मलिक बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत आणि त्यांना शिवसेनेच्या संजय राऊतांची जोरदार साथ मिळत आहे. नवाब मलिक यांना मानलं पाहिजे. त्यांनी सहा महिने एखाद्या निष्णात हेरासारखं बरंच खोदकाम केलेलं असावं. ड्रग्ज प्रकरणावरून महाराष्ट्राची विनाकारण बदनामी केली जात असल्याची भूमिका घेत राज्य सरकार आक्रमक झालं आहे. केंद्राच्या राज्यांमधील अधिक्षेपावर आक्षेप घेत केंद्रीय एजन्सींच्या कारवायांना आव्हान दिलं जात आहे. 

ड्रग्जचा सगळ्यात मोठा ग्राहक बॉलिवूड आहे मग हा अड्डा उद्ध्वस्त करायचा की नाही? ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडींमागे राजकारण असल्याचा आरोप समजू शकतो, पण ड्रग्जचं साम्राज्य खोदून काढण्याच्या प्रयत्नांना बळ दिलं पाहिजे. ईडी, इन्कम टॅक्सने बऱ्याच नेत्यांना अडचणीत आणलं, पण ड्रग्जविरुद्धच्या कारवाईत तसं दिसत नाही. तरीही बचावासाठी मात्र राजकारणीच पुढे दिसतात! 

समीर वानखेडे हिंदू की मुस्लिम याचा ड्रग्ज प्रकरणाशी काही एक संबंध नाही. आतापर्यंत अब्जावधी रुपयांचे ड्रग्ज मुंबईत पकडले गेले, पण तेव्हा राजकारण्यांना त्यावर बोलावंसं वाटलं नव्हतं. ड्रग्जच्या विळख्यातून बॉलिवूडला बाहेर काढण्याची मानसिकता कोणत्याही राज्यकर्त्यांची नव्हती. आता हे प्रकरण आपल्याच गोतावळ्यातील लोकांच्या गळ्याशी आल्यावर ते बोलताहेत अशी लोकांची भावना आहे. फटाके दोन्ही बाजूंनी फुटत राहतील, कधी यांचे तर कधी त्यांचे हात पोळतील, पण आरोप-प्रत्यारोपांच्या या गदारोळात अतिवृष्टीने त्रासलेल्या, महागाईनं ग्रासलेल्या महाराष्ट्राचं काय भलं होणार? 

बॉलिवूडमधील ऐंशी टक्के लोक ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत. बॉलिवूडच्या बदनामीचं बॉलिवूड काय ते बघून घेईल, पण इथे ती बदनामी राज्य सरकार अंगावर घेताना दिसत आहे. भाजपवालेही एनसीबीचे वकील बनले आहेत. ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यननं जणू काढेचिराईत किंवा च्यवनप्राश घेतलं होतं अशा पद्धतीनं त्याचा बचाव करण्याचं चाललं आहे.  माजी गृहमंत्र्यांचा ठावठिकाणा लागत नाही अन् माजी मुंबई पोलीस आयुक्त गायब आहेत. यातून तशीच पुरती अब्रू गेली असताना ड्रग्जवरून सरकारची फरफट होत आहे.

लोहा लोहे को काटता है 
बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनचा बुरखा फाडता फाडता समीर वानखेडेही सिनेस्टाईल कारवाई करायला जातात आणि त्यातून प्रक्रियात्मक त्रुटी (प्रोसिजेरियल लॅप्सेस) ठेवतात. नेमक्या त्याच त्रुटी त्यांच्या अंगावर येताना दिसत आहेत.या त्रुटींच्या अनुषंगानेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या आरोपांना पुष्टी देणारी आणखी काही माहिती चौकशीत समोर आली तर त्यांच्या अडचणी वाढतील. त्यातच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानं त्यांची सार्वजनिक कारकीर्द झाकोळली आहे.

- सध्याच्या लढाईचा अंत काय होईल? कौन किस पे भारी पडेगा? असं लोक विचारत आहेत. दोन्ही बाजू एकमेकांच्या विरोधात कोर्टात गेल्या तर सध्या सुरू असलेल्या बिनपैशाच्या तमाशातून महाराष्ट्र मुक्त होईल.

Web Title: Aryan Khan Drugs Case : Sameer Rocket, Nawab Bomb ... Firecrackers before Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.