आजचा अग्रलेख: पुन्हा आर्यन शाहरूख खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 07:49 AM2022-03-03T07:49:11+5:302022-03-03T07:50:44+5:30
अभिनेता शाहरूख खानचा तरुण मुलगा आर्यन पुन्हा बातम्यांमध्ये, चर्चेत आलाय.
अभिनेता शाहरूख खानचा तरुण मुलगा आर्यन पुन्हा बातम्यांमध्ये, चर्चेत आलाय. प्रकरण जुनेच आहे - गेल्या गांधी जयंतीच्या रात्री मुंबईजवळ समुद्रात कॉर्डेलिया क्रुझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या पथकाने टाकलेला छापा, त्यात सापडलेली मादक द्रव्ये, बड्या घरच्या मुलामुलींना झालेली अटक वगैरे. नंतर तीन-चार महिने ज्यांचे नाव देशात सर्वांमुखी झाले ते भारतीय महसूल सेवेतील अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वातील एनसीबीच्या पथकाने केलेल्या या कारवाईने खळबळ माजण्याचे मुख्य कारण हे होते की, आरोपींमध्ये किंग खान शाहरूखचा मुलगा होता.
सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी त्या छाप्यानंतर आठवडाभराने थेट समीर वानखेडे यांच्याविरूद्ध मोहीम उघडली. हे व असे आणखी काही छापे केवळ बदनामीचा धाक दाखवून वसुलीसाठी टाकले जातात, समीर वानखेडे यांचे जातीचे प्रमाणपत्र खोटे आहे, त्यांच्या वडिलांनी धर्म बदलला तरी त्यांची मूळ जात कायम कशी राहिली वगैरे आरोपाच्या फैरी रोज सकाळी नवाब मलिक झाडत राहिले. वातावरण तापले. एनसीबीने या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी उपमहासंचालक संजय सिंग यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथकाचे गठण केले.
चार महिन्याच्या तपासानंतर त्या कारवाईच्या अनुषंगाने आर्यनच्या विरोधात काहीही पुरावा सापडला नसल्याची बातमी आता आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने दिलीय. एकप्रकारे नवाब मलिक जे रोज सांगत होते त्यावर हे एसआयटीकडून शिक्कामोर्तब आहे. पण, तो सगळा प्रकार राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा असल्याने तसे शिक्कामोर्तब मानले नाही तरी मुंबई उच्च न्यायालयाने २८ ऑक्टोबरला आर्यनला जामीन मंजूर करताना नोंदविलेल्या निरीक्षणाच्या जवळपास जाणारी ही ताजी बातमी आहे. तिच्यानुसार, आर्यनजवळ मादक द्रव्य तर सापडले नाहीच. शिवाय मादक द्रव्याची तस्करी करणाऱ्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय टोळीशी वगैरे त्याचा संबंध नव्हता. त्याशिवाय, एनसीबीच्या कार्यपद्धतीनुसार संपूर्ण छाप्याचे चित्रीकरण करण्यात आले नाही. अनेक आरोपींकडून ड्रग्ज जप्त करण्यात आल्यानंतरही ते सर्व एकाच ठिकाणी जप्त करण्यात आल्याचे दाखविले गेले.
एसआयटी प्रमुख संजय सिंग तसेच समीर वानखेडे यांनी या बातमीचे खंडन केले आहे. तपास अजून चालूच आहे आणि आम्ही अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचलेलो नाही, असे सिंग यांचे म्हणणे आहे. अर्थात, ही बाब प्राथमिक निष्कर्षाची बातमी देताना संबंधित दैनिकानेही स्पष्ट केली आहे. त्यामुळे आणखी दोन किंवा तीन महिन्यांनंतर एसआयटीचा अहवाल एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांना सादर झाल्यानंतरच खरे काय ते स्पष्ट होईल.
आता मुद्दा इतकाच आहे, की थोडे विस्मरणात गेलेले हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. कॉर्डेलिया क्रुझवरील छाप्याभोवतीचे संशयाचे धुके अजूनही तसेच आहे. समीर वानखेडे त्यांच्या मूळ खात्यात परत गेले असले तरी त्यांच्या मागील हे छाप्याचे शुक्लकाष्ठ कायम राहणार आहे. झालेच तर किरण गोसावी, सॅम डिसुझा, मनीष भानुशाली वगैरे खासगी व्यक्ती त्या क्रुझवर एनसीबी पथकासोबत का होत्या, या प्रश्नाचे उत्तर मिळायला आणखी थोडी वाट पाहावी लागेल. पंचनाम्याच्या कोऱ्या कागदावर सह्या का घेतल्या गेल्या हा गोसावीचा सहकारी प्रभाकर साईलने विचारलेला प्रश्न अजूनही तसाच आहे.
थोडा आणखी गंभीर विचार केला तर आर्यन खान, अरबाझ मर्चंट किंवा मुनमुन धामेचा वगैरे तरूण मुलामुलींना जाळ्यात ओढायचे, ड्रग्जच्या रॅकेटमध्ये अडकवायचे कथित प्रयत्न पुन्हा होऊ नये म्हणून पालक म्हणून तुम्ही-आम्ही सगळेजण काय करणार आहोत? अनावधानाने तरूण मुलेमुली त्या मार्गाला जात असतील तर त्यांना लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे की त्यांच्या वयाचा, त्या वयात निर्माण होणाऱ्या घातक आकर्षणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करायचा? ही मोठ्या घरची मुले आहेत म्हणून त्यांना झोडपून काढायचे की समुपदेशनाच्या मार्गाने त्यांना चांगले-वाईट समजून सांगून योग्य मार्गाला लावायचे? क्रुझ प्रकरणाच्या पूर्वार्धातही समाजाने काही धडा घेतला नाही आणि आताही तो घेण्याची तयारी दिसत नाही. मुलांवर संस्कार, त्यांचा योग्य सांभाळ वगैरे मुद्यांवर खरेतर गंभीर चर्चा व्हायला हवी होती. त्याऐवजी सनसनाटी बातम्यांच्या प्रवाहात सगळे वाहवत गेले. आताही आर्यनला कथित क्लिनचिटच्या निमित्ताने तेच होण्याची शक्यता दिसते..