असहिष्णुतेच्या विळख्यात ‘असांज’

By admin | Published: February 14, 2016 02:46 AM2016-02-14T02:46:05+5:302016-02-14T02:46:05+5:30

गेली तीन वर्षे विकिलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांज हा लंडनमधील इक्वाडोरच्या वकिलातीमध्ये राजाश्रय घेऊन जगतो आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी हक्क समितीने त्याला

'Ashenz' as a result of intolerance | असहिष्णुतेच्या विळख्यात ‘असांज’

असहिष्णुतेच्या विळख्यात ‘असांज’

Next

(सोळा आणेे सच)

- विनायक पात्रुडकर

गेली तीन वर्षे विकिलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांज हा लंडनमधील इक्वाडोरच्या वकिलातीमध्ये राजाश्रय घेऊन जगतो आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी हक्क समितीने त्याला मुक्त आयुष्य जगू द्यावे, असे निर्देश दिले आहेत. तरीही असांजचा गुंता सुटलेला नाही.

सध्या आपल्याकडे ‘सहिष्णुता’ हा सर्वांत चर्चेचा विषय बनलेला आहे. आचार, उच्चार आणि विचार स्वातंत्र्याबाबत बंधने असल्याची बोंब ठोकत देशभर असहिष्णुतेचे वातावरण निर्माण होत असल्याची टीका प्रसारमाध्यमातून होताना दिसते आहे. सहिष्णुतेच्या मुद्द्यावरून अगदी थेट दोन गट पडल्याचे चित्रही पाहायला मिळते. आपल्याकडे पाच आंधळे आणि हत्तीची गोष्ट आहे. ज्या आंधळ्यांना जसा हत्ती भावतो तसे त्याचे वर्णन करतात आणि मत बनवितात. तीच गोष्ट सहिष्णुतेबाबत म्हणता येईल. काही गंभीर चर्चा करणाऱ्या ‘व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप’वरही सहिष्णुतेची टोकाची चर्चा वाचायला मिळते.
ज्याला जशी अनुभवायला आली ती सहिष्णुता खरी. असा मताचा आटापिटा होताना दिसतो. तरीही या विषयावर टोकाची मते मांडताना दुसऱ्या टोकाची मतेही तितक्याच गांभीर्याने वाचली जाताहेत. हे खरेतर लोकशाहीतील ‘खऱ्या सहिष्णु’तेचे लक्षण म्हणायला हवे. आपल्या देशात एकीकडे हे वातावरण आहे आणि जगभरच्या असहिष्णू वातावरणाकडे पाहायला आपल्याला वेळ नाही किंवा त्याचे गांभीर्य नाही असे चित्र आहे.
विकिलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांज याच्या खळबळजनक बातम्यांनी काही वर्षांपूर्वी अख्खे जग ढवळून निघाले होते. गेली तीन वर्षे तो लंडनमधील इक्वाडोर देशाच्या वकिलातीमध्ये राहतो आहे. त्याच्याविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीसही जारी केली आहे. मूळचा आॅस्ट्रेलियन नागरिक असणारा ज्युलियन असांज हा पूर्वी ‘कॉम्प्युटर हॅकर’ म्हणून प्रसिद्ध होता. संगणकाच्या जाळ्यात शिरून तो हवी ती माहिती शोधून काढत होता. २००६मध्ये त्याने ‘विकिलीक्स’ नावाने साइट सुरू केली. त्या साइटवर त्याने निष्पाप इराकी नागरिकांवर अमेरिकेच्या सैनिकांनी कसे हल्ले केले ते चित्रणच दिले. त्यात इराक आणि अफगाणिस्तानमध्ये मानवी हक्काची अमेरिकेने कशी पायमल्ली केली याबाबतीतल्या अडीच लाख फायलींची लिंक देण्यात आली होती. यानंतर विकिलीक्स आणि असांज यांचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.
अमेरिकेचे परराष्ट्र धोरण कसे विनाशकारी आहे, याचीच चर्चा जगभर सुरू झाली. त्यानंतर ज्युलियन असांज याने केनयातील न्यायदानातील त्रुटी, ‘द फिफ्थ इस्टेट’ चित्रपटातील त्रुटीवर डॉक्युमेंटरी, त्यानंतर विविध व्यवस्थेतील भ्रष्ट यंत्रणा, त्याची कार्यपद्धती यांना विकिलीक्सवरून उघडे पाडले. विकिलीक्सवर त्यासंदर्भातील कागदपत्रेच प्रसिद्ध करत असल्याने जगभरातील प्रसारमाध्यमे त्याच्या या वेबसाइटला ‘फॉलो’ करू लागली. बघता बघता ज्युलियन असांज सर्वसामान्यांच्या गळ्यातला ताईत बनला. भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या सर्व संस्थाच्या दृष्टीने तो ‘हीरो’ ठरत होता. जगभर त्याची भाषणे होत होती. विकिलीक्सची तो माहिती देत असे.
२०१०मध्ये स्विडनमध्ये त्याने एका परिसंवादात सहभाग घेतला होता. तेथे त्याची दोन महिलांसोबत भेट झाली. नंतर त्या महिलांनी असांजविरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्या वेळी असांजची चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले. असांजने या आरोपाचा इन्कार केला. स्विडन सोडून गेल्यानंतर असांजविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली. असांजने कोर्टापुढे शरण येऊन जामिनावर सुटका करून घेतली. त्यानंतर लंडनच्या कोर्टात हा खटला तब्बल दोन वर्षे सुरू होता. स्विडनच्या वकिलांनी असांजला स्विडनच्या ताब्यात देण्याची मागणी केली. इंग्लंड-स्विडनमध्ये मानवी प्रत्यार्पणाचा करार असल्याने त्याअंतर्गत असांजला स्विडनच्या ताब्यात देण्याची मागणी होती. परंतु स्विडन सरकार असांजला अमेरिकेच्या ताब्यात देईल अशी भीती होती. विकिलीक्समधून अमेरिकेची सर्वाधिक बेअब्रू झाल्याने अमेरिका असांजचा छळ करेल, अशी त्यालाही भीती वाटत होती. त्यामुळे त्याने लंडनमधील इक्वाडोर देशाच्या वकिलातीत राजाश्रय देण्याची त्या देशाला विनंती केली.
इक्वाडोरने त्याला राजाश्रय दिला; परंतु ब्रिटन पोलिसांनी इक्वाडोरच्या वकिलातीला वेढा घातला. असांजने बाहेर एक पाऊल जरी टाकले तर त्याची थेट उचलबांगडी करून स्विडनच्या ताब्यात दिले जाईल, असे सांगितले. तेव्हापासून असांज जवळपास तीन वर्षे त्याच इमारतीत वास्तव्य करून आहे. त्याला तिथे आतमध्ये येऊन मान्यवर भेटतात. तो चर्चाही करतो. त्याला प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधीही भेटतात. मुलाखती छापल्या जातात. मात्र हे सगळे इमारतीच्या आतमध्ये घडते. बाहेरच्या लोकांशी किंवा इतर माध्यमांशी बोलताना तो खिडकीत उभा राहतो. गेली तीन वर्षे हा खेळ सुरू आहे.
गेल्याच आठवड्यात संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क समितीने एक ठराव पास करून असांजला मुक्तपणे वावरू देण्याचे निर्देश दिले आहेत. पण लंडनच्या प्रशासनाने त्याला भीक घातलेली नाही. खरेतर, इंग्लंड आणि स्विडनमधील करार हा फक्त राजकीय लोकांपुरता आहे. असांजविरोधात थेट कुठलाही गुन्हा दाखल नाही. पण स्विडनच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. असांज बाहेर आला तर अमेरिकेची गुप्तचर संस्था त्याला मारून टाकेल अशी त्याची भीती आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपानंतरही असांजच्या मुक्त विहाराच्या मूलभूत हक्काची गदा तशीच आहे.
त्यामुळे सहिष्णुतेवर चर्चा करणाऱ्यांनी याकडेही डोळेझाक करता कामा नये. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राने केलेल्या मानवी मूल्याची धूळधाण असांजने जगापुढे आणली. त्याची किंमत तो तीन वर्षे मोजतो आहे. शेवटी सहिष्णुता ही सापेक्ष असते. आंधळ्यांचा जसा हत्ती तशीच आपली सहिष्णुता. दुसरे काय?

(लेखक मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)

Web Title: 'Ashenz' as a result of intolerance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.