धनुष्यबाणाचा अश्वमेध यज्ञ !
By सचिन जवळकोटे | Published: June 21, 2018 12:53 AM2018-06-21T00:53:01+5:302018-06-21T00:53:01+5:30
‘मातोश्री’वर भलतीच लगबग सुरू झालेली. अनेक उपसरदार अन् उप-उपसरदारांची ये-जा होऊ लागलेली.
‘मातोश्री’वर भलतीच लगबग सुरू झालेली. अनेक उपसरदार अन् उप-उपसरदारांची ये-जा होऊ लागलेली. महालाच्या खिडक्यांमधून धूर बाहेर पडू लागलेला. खरंतर, ‘मातोश्री’लगतच्या शेजाऱ्यांना गेल्या चार वर्षांत धूर तसा नवीन नव्हता. तिकडं ‘नमों’चा उदो-उदो झाला की इकडं म्हणे ‘धूर’ अधिकच सुटायचा. जळायचा वास पसरायचा. मात्र आजचा धूर सुगंधी होता. उत्साहित करणारा होता.
आतल्या खास गृहामध्ये चक्क यज्ञ पेटविण्यात आलेला. समोर मंचकावर चक्रवर्ती नरेश ऊर्फ ‘उद्धो’ महाराज बसलेले. त्यांच्या शेजारी छोटे ‘आदित्य’ राजेही. ‘जय पिताऽऽ जय पुत्रऽऽ’च्या मंत्रघोषात अनेकांच्या नेतृत्वाची ‘आहुती’ देण्यात येऊ लागलेली. यात नाशिकची ‘स्ट्राँग आर्म’वाली फळं होती. कोकणातल्या कणकवलीचा ‘नारायण नागबळी’ही देण्यात आलेला. हे सारं कमी पडलं की काय म्हणून, ‘कृष्णकुंज’वर कधीकाळी ‘शिशिर’ ॠतूत फुललेली फळंही बाजूला काढून ठेवलेली.
या यज्ञाचं नाव होतं ‘अश्वमेध’... होय. स्वबळाचा नारा देत अवघं जग जिंकण्याची भीष्मप्रतिज्ञा होती. ‘देशभरात पिताश्रींची पताका फडकावी,’ हे ‘मातोश्री’वरील ‘आदित्य’ राजेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘उद्धो’ महाराजांनी सोडलेला महान संकल्प होता. ‘पंतप्रधान न होताही देशाचं सक्षम नेतृत्व करण्यासाठी काय-काय करायला हवं,’ याची अनुभवी टीप त्यांनी ‘राहुलबाबां’कडून घेतलेली... खरंतर हा सल्ला त्यांना ‘थोरले काका बारामतीकर’ यांच्याकडून घ्यायचा होता. मात्र, अलीकडच्या काळात ‘काका’ म्हणे ‘मला तसं म्हणायचं नव्हतं!’ ही कादंबरी लिहिण्यात मश्गुल होते. कदाचित ‘पुणेरी पगडी’ प्रकरणाचा ‘इम्पॅक्ट’ असावा. गेल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीतील त्यांच्या शेकडो बुद्धिभेदी संवादाचा उल्लेख म्हणे या पुस्तकात होणार होता. असो.
‘उद्धों’नी टाळी वाजवून सरदारांना जवळ बोलाविलं, ‘मोडकी-तोडकी का होईना; परंतु इतर सरदारांपेक्षा संजयराव चांगली हिंदी बोलतात. तेव्हा एक घोडा घेऊन त्यांनी दिल्लीकडं कूच करावी. उत्तरेतील प्रत्येक गावात आपली शाखा स्थापन करावी. किमान वेशीवर बोर्ड तरी लावावेत.’ असा आदेश दिला... कारण ‘रौतांची लेखणी अन् बानुगडेंची वाणी’ ही दोन हुकुमी शस्त्रं होती त्यांची. त्यानंतर मुंबई महापालिकेतल्या ‘विश्वनाथ अण्णां’ना दक्षिणेकडं कर्नाटकात जाऊन जुन्या नातलगांचा शोध घेण्याचा आदेश त्यांनी दिला. भविष्यात कुमारस्वामींशी तह करण्यासाठी म्हणे तिथंही फौजेची गरज होती. ‘दिवाकररावऽऽ तुमच्या शिवशाही अन् शिवनेरीसोबत दोन-चार घोडेही उधळू द्या.’ असं महाराजांनी सांगताच सरदार गडबडले; कारण ताफ्यातल्या किती भंगार गाड्या बंद अन् किती कर्मचारी संपात, याचा ताळमेळ अजूनही लागला नव्हता.
...एवढ्यात धाकट्या महाराजांनी बानुगडेंच्या नितीनबापूंना फर्मावलं, ‘पक्षाच्या जगज्जेतेपदाची द्वाही तुम्ही तुमच्या भाषणातून देशोदेशी फिरवा. शक्य झाल्यास अवघ्या ब्रह्मांडावर आपलं राज्य निर्माण करा.’ तेव्हा डोकं खाजवत नितीनबापू हळूच पुटपुटले, ‘अगोदर माझ्या सातारी राजधानीत तरी किमान एक-दोन मेंबर निवडून आणू द्या. जिल्ह्यात पक्षाचे जेवढे प्रमुख, तेवढे सदस्यही नाहीत झेडपीत.’