घृणा व तिरस्काराचे मळे पिकविणाऱ्यांना सज्जड जाब विचारा!

By विजय दर्डा | Published: April 23, 2018 12:55 AM2018-04-23T00:55:38+5:302018-04-23T00:55:38+5:30

टीव्हीच्या स्क्रीनपासून सोशल मीडियापर्यंत जेथे पाहाल तेथे धार्मिक कट्टरवाद ठासून भरलेला दिसतो

Asked for the hater and hatred farmers! | घृणा व तिरस्काराचे मळे पिकविणाऱ्यांना सज्जड जाब विचारा!

घृणा व तिरस्काराचे मळे पिकविणाऱ्यांना सज्जड जाब विचारा!

googlenewsNext

मयखाने से पुछा आज
इतना सन्नाटा क्यों है?
मयखाना बोला-
लहू का दौर है साहेब
अब शराब कौन पिता है?


(मी मद्यालयास विचारले की, आज एवढी सामसूम कशी? मद्यालय म्हणाले, साहेब हल्ली रक्ताची सद्दी आहे, मद्य कोण पिणार?)
माझ्या व्हॉटसअ‍ॅपवर कुणीतरी या काव्यपंक्ती पाठविल्या आणि मी विचार करू लागलो की खरंच परिस्थिती एवढी वाईट आहे? अलीकडेच अनेकांचे बळी घेणाºया उत्तर प्रदेश व बिहारमधील दंगली माझ्या स्मृतिपटलावर तरळल्या. अनेक कुटुंबांमधील वंशाचे दिवे कायमचे विझविणारी हिंसक आंदोलने मला आठवली. कठुआच्या घटनेने तर माझे मन कमालीचे अस्वस्थ झाले व विचार आला की, बलात्कारासारख्या घटनेलाही धार्मिक रंग देण्याएवढी घृणास्पद वृत्ती कुणाची असू शकते?...आणि तेही भारतासारख्या देशात? ज्या देशात महिलांची देवीच्या रूपाने पूजा करण्याची आपली शेकडो वर्षांची परंपरा आहे. संपूर्ण जगाला कुटुंब मानून ‘वसुधैव कुटुंबकम’ हा संदेश देणाºया आपल्या या भारत देशाला घृणा आणि तिरस्काराने एवढे घट्ट का बरं जखडून टाकावे? तिरस्कार आणि द्वेषाचे बिज पेरून त्याला खतपाणी घालणारे हे आहेत तरी कोण? याचे उत्तर अगदी सरळ आहे: भारताच्या नागरिकांकडे निवडणुकीतील फक्त मते म्हणून पाहण्याची राजकीय विचारसरणीच केवळ याला जबाबदार आहे!
...आणि आपण सर्व या सर्वांमध्ये गुरफटत चाललो आहोत, हे त्याहून दुर्भाग्यपूर्ण आहे. टीव्हीच्या स्क्रीनपासून सोशल मीडियापर्यंत जेथे पाहाल तेथे धार्मिक कट्टरवाद ठासून भरलेला दिसतो. हा कट्टरवाद केवळ पाळला जातो असे नव्हे तर तो वणवा आणखी चेतविणाऱ्या शक्तीही सक्रिय आहेत. असे काही वातावरण तयार केले जाते की, मुसलमान हाती शस्त्रे घेऊन हिंसा करताहेत, ख्रिश्चन धर्मांतर करत आहेत व आता हिंदूनी सूत्रे हाती घेण्याची गरज आहे. असे करणारे धर्माच्या नावाने धर्मातच विष कालवत आहेत. सत्तेत बसलेले अशा मंडळींवर काहीच कारवाई करत नाही, हे अधिक धोकादायक आहे. आपल्या तिरस्कारपूर्ण धार्मिक ताकदीपुढे सरकारही काही करू शकत नाही, या खात्रीने हे लोक निर्ढावले आहेत. धर्माच्या नावाने फूट पाडण्याचे त्यांचे मनसुबे सफल होतात म्हणून या शक्ती मोकाट, बेताल झाल्या आहेत!
जरा शांतचित्ताने विचार करा आणि स्वत:लाच विचारा की, तुमचा धर्म, तुमची जात यावरून हा उत्पात करण्याचा अधिकार राजकारण्यांना कुणी दिला? देशाच्या भल्यासाठी राजकारण करणे हे राजकीय नेत्यांचे कर्तव्य आहे. खरे तर त्यांच्या राजकारणात भुकेल्यांना घास, बेघरांना निवारा, सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी, सर्वांसाठी उत्तम शिक्षण आणि तरुण पिढीच्या हातांना काम देण्याचे स्वप्न असायला हवे. पण या गोष्टींवर कुणी बोलतही नाही. सर्वत्र चर्चा होते धर्माची आणि जातीची! हे राजकारणी आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाहीत म्हणून ते आपल्याला निरर्थक गोष्टींमध्ये अडकवून ठेवतात आणि आपल्यापैकी बरेच जण त्या जाळ्यात अडकतातही.
मंदिर-मशिद आणि हिंदू-मुस्लीम यांच्यात तिरस्कार निर्माण होईल अशा भाषेत बोलणाºया राजकारण्यांना ‘आमच्या धर्माची चिंता तुम्ही करू नका, त्यासाठी आम्ही समर्थ आहोत’, असे आपण कधी ठणकावून सांगतो? मोहल्ल्यातील मतभेद आणि वादविवाद आमचे आम्ही सोडवू, रामनवमीची मिरवणूक कुठून काढायची आणि ईद मिलादुन्नबीचा जुलूस कोणत्या रस्त्याने न्यायचा हे आमचे आम्ही पाहून घेऊ. आमच्यातील वडीलधारी मंडळी एकत्र बसून ठरवतील, असे आपण या राजकीय नेत्यांना कधी सांगितलंय? तुम्ही तुमचे राजकारण बाजूला ठेवा सामाजिक समरसतेमध्ये त्याने गढूळपणा आणू नका, असे आपण त्यांना बजावतो? मुळीच नाही. राजकारण्यांना आपण असे फैलावर घेत नाही म्हणून ते सामान्य लोकांना मूर्ख समजतात. ज्याचा जाब त्यांना विचारायला हवा तो मात्र आपण विचारत नाही, ही आणखी एक शोकांतिका. त्यांना विचारायला हवे की, देशातील शेतकरी आत्महत्या का करत आहेत? नोटाबंदीने देशाचे काय भले झाले? एखाद्या व्यक्तीला सरकारी इस्पितळाची रुग्णवाहिका मिळत नाही म्हणून पत्नीचे प्रेत खांद्यावर घेऊन कित्येक मैल पायपिट का करावी लागते? १३ वर्षांच्या एखाद्या मुलीवर उपासमारीने टाचा घासत प्राण सोडण्याची वेळ का येते? ‘आधार’ नसेल तर धान्य का देणार नाही? देशातील बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून कुणी विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी सहीसलामत देशातून पळून कसा जाऊ शकतो? हे लोक एवढे चलाख आहेत की सरकारी यंत्रणा जाणूनबुजून दुधखुळी झाली आहे?
पण राजकारणी नेत्यांना यापैकी काहीही विचारण्यासाठी आपण तोंड उघडत नाही. गुलामीची वृत्ती आपल्या एवढी अंगवळणी पडली आहे की, असे नेते किंवा बडे अधिकारी आले की त्यांच्यापुढे गोंडा घोळण्यात जणू आपल्यात स्पर्धा लागते. नेत्याने आपल्या दिशेने पाहून नुसता हात हलविला तरी आपले जीवन धन्य झाल्याचे आपण मानतो! राजकारण्यांनी अशा चापलूस व खुशमस्कºयांच्या जणू पलटणी उभ्या केल्या आहेत. या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर कटू परंतु रास्त प्रश्न आपल्याला त्यांना विचारावेच लागतील. त्यांना सडेतोडपणे सांगावे लागेल की, आमच्या धर्म आणि जातीच्या बाबतीत तुम्ही लुडबूड करू नका. त्याऐवजी कुणाला उपाशीपोटी झोपावे लागणार नाही, सर्वांच्या डोक्यावर हक्काचे छत असेल, प्रत्येक हाताला काम मिळेल, उपचारांअभावी कुणालाही प्राण सोडावे लागू नयेत या आणि अशा गोष्टींचीच तुम्ही फक्त काळजी करा. त्यासाठीच आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे, असे या राजकारण्यांना बजावावे लागेल.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
हे लिहीत असताना मला प्रसिद्ध गीतकार गोपालदास नीरज यांच्या काही ओळी आठवल्या. त्या स्वयंस्पष्ट आहेत. तुम्हीही वाचा आणि त्यावर विचार करा...
अब तो मजहब कोई ऐसा भी चलाया जाए/ जिसमे इंसान को इंसान बनाया जाए/
प्यारका खून हुआ क्यों ये समझने के लिए/ हर अंधेरे को उजाले में बुलाया जाए/
जिस्म दो हो के भी दिल एक हो अपने ऐसे/मेरा आंसू तेरी पलकों मे उठाया जाए/
(आता असा काही धर्म शोधा ज्याने माणसात माणूसपण येईल. प्रेमाचे कलेवर का झाले हे जाणून घेण्यासाठी सर्व ठिकाणच्या अंधाराला प्रकाशात घेऊन या. देह दोन असूनही मने अशी एकरूप असू देत जणू माझे अश्रू तुझ्या पापण्यांतून टपकू देत.)

Web Title: Asked for the hater and hatred farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.