अस्मितेची भेळपुरी
By admin | Published: January 20, 2015 10:39 PM2015-01-20T22:39:28+5:302015-01-20T22:39:28+5:30
जालन्यात ६ वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन झाले. मराठवाड्यातील सर्व स्त्री लेखिकांची उपस्थिती हे या संमेलनाचे यश.
जालन्यात ६ वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन झाले. मराठवाड्यातील सर्व स्त्री लेखिकांची उपस्थिती हे या संमेलनाचे यश.
पी. मुरुगन या लेखकाने ‘लेखक’ म्हणून परवा आत्महत्त्या केली. यापुढे आपण साहित्यनिर्मिती करणार नाही, लेखक म्हणून आपला मृत्यू झाला आहे, असे ‘फेसबुक’वर जाहीर केले. आपल्या देशात राजकारण आणि धर्माचा पगडा एवढा वाढत चालला की, मुरुगनसारखे लेखक स्वत:हून अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारतात. त्यांच्या ‘मधोरुबागन’ या कादंबरीत कोंगुनाडू विभागातील एका प्रथेचा विषय घेतला आणि या पुस्तकाविरोधात गौंडूर समाज पेटून उठला; पण तामिळनाडूतील कोणताही राजकीय पक्ष अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभा राहिला नाही; कारण व्होट बँक. त्यामुळेच मुरुगन यांनी हा निर्णय घेतला. अशा प्रवृत्तीविरुद्ध सफदर हाश्मींनी आवाज उठविला होता. महाराष्ट्रात दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर यांनी साहित्यातील राजकारण्यांच्या हस्तक्षेपाला जाहीर आक्षेप घेण्याचे धैर्य दाखविले होते. हे सर्व आठवण्याचे कारणही तसेच आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे या वर्षी उदगीर येथे होणारे आणि आता रद्द झालेले मराठवाडा साहित्य संमेलन. आता हे संमेलन नांदेड येथे होऊ घातले आहे. उदगीरचे संमेलन रद्द होण्याचे कारण शोधले तर दुर्गा भागवत, तेंडुलकर यांची स्वर्गात (हे दोघेही स्वर्ग मानत नव्हते तरी आपण समजू या) काय प्रतिक्रिया असेल याची कल्पना न केलेली बरी. कारण त्यांनी जर हे कारण शोधले, तर आपण मराठी साहित्यिक नव्हतो असेच म्हणतील. म्हणजे मुरुगन यांच्यासारखेच. मुख्यमंत्री येणार नसल्याने उदगीरकरांनी म.सा.प.ला बोहल्यावरून उठविले आहे. अगोदर मुख्यमंत्र्यांसाठी संमेलनाची तारीख बदलली आणि आता ते संमेलनच घेणार नाहीत. त्यांचा हा निर्णय शिरोधार्ह मानून म.सा.प.ने आता नांदेडच्या मुंडावळ्या बांधल्या. एकीकडे साहित्यासाठी आपला कणा ताठ ठेवणारे साहित्यिक आणि दुसरीकडे राजकारण्यांच्या दावणीला बांधलेले साहित्यिक. उदगीरचे उदाहरण पहिलेच नाही. नाशिकला कृषी साहित्य संमेलन झाले. प्रथम अध्यक्ष होते विठ्ठल वाघ, संयोजकांनी तारीख बदलली. वाघ त्या तारखेला उपलब्ध नव्हते, तर अध्यक्षच बदलले आणि ते पद रा. रं. बोेराडेंकडे आले. त्यानंतरचे कृषी साहित्य संमेलन पैठणला झाले. अध्यक्ष होते बाबा भांड. संयोजक राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यामुळे अख्खे संमेलन राष्ट्रवादीच्या ताब्यात. व्यासपीठावर त्यांचीच गर्दी. मावळते अध्यक्ष रा. रं. बोराडे यांना बसायला जागाच नव्हती. ते समोर रांगेत बसले आणि उद्घाटनाचा कार्यक्रमही झाला; पण मावळत्या अध्यक्षांना तेथे डावलले, याची कुणालाही खंत नव्हती. तीन वर्षांपूर्वी टोरँटो येथे विश्वसाहित्य संमेलन जाहीर झाले. अध्यक्ष म्हणून ना. धों. महानोरांची घोषणा झाली; पण संमेलन अजून व्हायचे आहे. उदगीरचे संमेलन का रद्द झाले, हे म.सा.प. सांगत नाही आणि उदगीरकरसुद्धा. मराठवाड्यातील कोणत्याही साहित्यिकाने संयोजकांना याचा जाब विचारला नाही. उदगीरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते लक्ष्मीकांत देशमुख; परंतु आता नांदेड येथे होऊ घातलेल्या संमेलनाचेही तेच अध्यक्ष असतील का? देशमुखांना उदगीरऐवजी नांदेड चालणार का? किंवा ते देशमुखी बाणा दाखवून बाजूला सरकणार? खरे तर या उदगीर प्रकरणावर साहित्यिक वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया अपेक्षित होती; परंतु सारे काही चिडीचूप आहे.
हे सर्व घडत असतानाच शनिवार-रविवार असे दोन दिवस जालन्यात सहावे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन झाले. मराठवाड्यातील सर्व स्त्री लेखिकांची उपस्थिती हे या संमेलनाचे यश. संयोजनापासून ते सहभागापर्यंत महिलांचा सहभाग आणि रसिकांची दाद हे या संमेलनाचे यश मानता येईल. गंभीर विषयांच्या परिसंवादांना ओस पडणारे मंडप अनेक वेळा पाहतो; पण जालन्यात त्यालाही प्रतिसाद होता. उणीव होती एकच, की मराठवाड्यातील एकही प्रथितयश साहित्यिक इकडे फिरकला नाही. लेखिकांच्या संमेलनाला जाण्याची तसदी एकानेही घेऊ नये ही बाब धक्का देणारी आहे. सर्वच मान्यवर साहित्यिकांना निमंत्रण पाठविले होते असे संयोजक सांगतात. ते आले नाही, त्यामुळे फरक पडला नाही; पण मराठवाड्यातील एक चळवळ म्हणूनही साहित्यिकांनी या संमेलनाकडे दुर्लक्ष केले.
- सुधीर महाजन